
पणजी: वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या गोव्याच्या जलटॅक्सी प्रकल्पाला आता अखेर गती मिळण्याची शक्यता आहे. कोची मेट्रो रेल लिमिटेडचे एक तांत्रिक पथक पुढील महिन्यात गोव्यात भेट देणार असून, प्रस्तावित जलमेट्रो वाहतूक प्रणालीसाठी सविस्तर सवाधिक्यता (फिजिबिलिटी) अभ्यास करणार आहे.
भेटीचा उद्देश गोव्याच्या अंतर्गत जलमार्गांवर जलटॅक्सी सेवा सुरू करण्याच्या शक्यतेचे मूल्यांकन करणे हा आहे. त्यांच्या दौऱ्यादरम्यान, कोची मेट्रोचे तज्ज्ञ मार्गांची व्यवहार्यता, पायाभूत सुविधांची गरज आणि कार्यप्रणाली यासारख्या विविध घटकांचा अभ्यास करतील.
सध्या चार मार्गांवर ही सेवा उपलब्ध करण्याचा विचार आहे. या अभ्यासानंतर किंवा भविष्यातील मागणीनुसार आणखी मार्गांचा समावेश केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकल्पाच्या समन्वयासाठी गोवा सरकारने नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजे भोसले यांची कोची मेट्रो पथकासाठीनोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या अभ्यासात सर्वात व्यवहार्य नदी मार्ग, संभाव्य चढ-उतार स्थानके, तसेच जलवाहनांसाठी तांत्रिक बाबींची अचूकता ठरवली जाणार आहे.
हा उपक्रम केंद्र सरकारच्या देशभरातील १८ ठिकाणी जलआधारित वाहतूक प्रणाली उभारण्याच्या व्यापक दृष्टीकोनाचा एक भाग आहे. कोची वॉटर मेट्रोसाठी नावाजलेली कोची मेट्रो संस्था या प्रस्तावित प्रकल्पांसाठी प्राथमिक अहवाल तयार करत आहे.
“बोटी सौरऊर्जेवर चालतील का, प्रवासी क्षमता किती असेल, आणि कार्यप्रणाली कशी असेल यासारखे तपशील या अभ्यासाच्या निष्कर्षांनंतर ठरवले जातील,” असे सूत्रांनी सांगितले. “कोची मॉडेल हे इतर शहरांसाठी अनुकरणीय चौकट म्हणून पाहिले जात आहे.”
मूलतः २०१९-२० मध्ये पणजी आणि वेल्हा गोवा दरम्यान जलटॅक्सी संकल्पना मांडण्यात आली होती, परंतु त्यानंतर प्रकल्प रखडला होता. मात्र, अलीकडील वित्त आयोगाच्या बैठकीदरम्यान राज्याच्या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या मदतीने हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला आहे.
गोव्यासोबतच गुवाहाटी (ब्रम्हपुत्रा नदी), दल सरोवर (जम्मू-काश्मीर), अंदमान व लक्षद्वीप बेटे, तसेच अहमदाबाद, सूरत, मंगळुरू, अयोध्या, कोलकाता, प्रयागराज, वाराणसी आणि मुंबई यांसारख्या शहरी भागांमध्येही जलटॅक्सी प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास, गोव्यातील दळणवळणाची पद्धत बदलण्याची शक्यता आहे. हा पर्याय टिकाऊ, निसर्गरम्य आणि कार्यक्षम असून, पर्यटन वाढवण्याबरोबरच रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासही मदत करेल असे सूत्रांचे म्हणणे आहे.
पणजी – दिवाडी – गोवा वेल्हा
पणजी – चोडण
वास्को – मडगाव – कुठ्ठाळी
कळंगुट – बागा – कांदोळी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.