
समाजाला राष्ट्रवादात गुंफणे सुरू झाले की, कस लागतो तो अल्पसंख्याकांचा. हीच वेळ गोव्यातील ख्रिश्चन समाजावरही आली आहे. गोमंतकीय ख्रिस्ती समाजाची श्रद्धा निश्चितपणे पोर्तुगीज वसाहतवादी चर्चशी होती, त्यासोबतच त्यांची निष्ठा या देशाशी, आपल्या गोमंतभूमीशी होती. पेशाने वकील, डॉक्टर, पत्रकार, शिक्षक, व्यावसायिक असलेले अनेक गोमंतकीय ख्रिश्चन स्वातंत्र्यसैनिक म्हणून गोवा मुक्तीलढ्यात सहभागी झाले. चर्चकडून बहिष्कृत होण्याचे व पोर्तुगीज राजसत्तेकडून तुरुंगवास, मृत्यूदंड मिळण्याचे भय असूनही ख्रिश्चन स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. पोर्तुगिजांसाठी चर्च व राज्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या सामर्थ्यशाली लोकांसाठी वर्चस्ववाद हे एक अत्यावश्यक साधन आहे. सामाजिक संरचनेत आणि संस्कृतीत वर्चस्व स्थापन करून दुर्बल घटकांवर राज्य केले जाते. गोव्यात 1510 ते 1961 पर्यंत सुमारे 400 वर्षे पोर्तुगीजांनी हाच वर्चस्ववाद लादला. याची सर्वाधिक झळ धर्मांतरित झालेल्या ख्रिश्चन समाजालाच बसली.
गोव्याच्या ऐतिहासिक अभिलेखागारात जतन केलेल्या लष्करी न्यायाधिकरणाच्या नोंदी, वैयक्तिक मुलाखती तसेच ’हूज हू ऑफ फ्रीडम फायटर्स ऑफ गोवा’ या पुस्तकातील दस्तऐवज, तसेच त्या काळातील ‘गोमंतक’, ‘गोवन ट्रिब्यून’ आणि ‘फ्री गोवा’ यांसारख्या वर्तमानपत्रांच्या कात्रणांमधून गोमंतकीय ख्रिश्चनांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभा ठळकपणे समोर येतो. अँटोनियो ऑलिव्हेरा सालाझारच्या फॅसिस्ट राजवटीविरुद्ध हिंदूंसोबत खांद्याला खांदा लावून लढणारे ख्रिश्चन पानापानांत आढळतात. राजकीय कैद्यांचा पंथ कोणता आहे, याला तुरुंगात काहीच महत्त्व नसते. अनेकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन दीर्घकालीन तुरुंगवासामुळे संपुष्टात आले. कमावता कुटुंबप्रमुख तुरुंगात खितपत पडल्यामुळे सर्व कुटुंबीयांची फरफट होत असे. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी चर्चमध्ये लग्न करण्यास नकार दिला. काहींनी बाप्तिस्म्यास नकार दिला व आपल्या मुलांची नावे भारतीय पठडीची ठेवली. काहींनी कुर्ता, पायजामा आणि गांधी टोपी घालण्यास सुरुवात केली. स्वदेशी कपड्यांचा स्वीकार केला. महिलांनी कुंकू लावण्यास, केसांत फुले माळण्यास आणि साडी नेसण्यास प्रारंभ केला. या सर्व गोष्टी 1736 साली चर्चने दिलेल्या आदेशाचे सरळसरळ उल्लंघन होते. धर्मांतरानंतर गोव्यातील कॅथलिकांना त्यांच्या सांस्कृतिक परंपरा अचानक बंद कराव्या लागल्या. ज्या प्रथा त्यांनी परंपरेने जपून ठेवल्या होत्या, त्यांचा त्याग करणे शक्य नव्हते आणि नवीन प्रथा एकदम स्वीकारणेही शक्य नव्हते.
मुंबईत मुलांसाठी असलेल्या सेंट सेबेस्टियन शाळेत आणि मुंबईतील दाभोळमधील मुलींसाठी असलेल्या सेंट अॅन्स स्कूल या कॅथलिक शाळांमध्ये शिकलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची अनेक मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्यांचा बाप्तिस्मा झाला नाही, ख्रिस्ती नावे नसूनही बिगर-ख्रिश्चन समाजाने त्यांना स्वीकारले नाही! गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांसोबत मार्च 1961 मध्ये दिल्लीत पंडित नेहरूंना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात फादर एच. ओ. मास्कारेन्हस यांच्यासारखे संस्कृतचे पंडित असलेले गोमंतकीय पाद्री होते.
ज्युलियाओ मिनेझिससारखे काही कॅथलिक स्वातंत्र्यसैनिक गोमंतक प्रजा मंडळाचे सदस्य होते. त्याकाळी या मिनेझिसना चर्च, ‘कम्युनिस्ट’ म्हणून हिणवत असे. कॅथलिक पंथाबद्दल आणि चर्चबद्दल 1930 च्या उत्तरार्धात त्यांनी प्रसिद्ध केलेले त्यांचे विचार सध्या सर्वांसाठी उपलब्ध आहेत. त्यांचे विचार त्यांनी ‘गोमंतक’मध्ये आणि ‘गोव्याचा स्वातंत्र्यलढा’ या त्यांच्या पुस्तकात प्रखरपणे मांडले आहेत. जानेवारी 1939 मध्ये लुईस डी मेनेझेस ब्रागांझा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांवर व आदर्शांवर चालणाऱ्या गोमंतक प्रजा मंडळाची स्थापना करण्यात आली. मिनेझीस यांनी सुरू केलेल्या ‘द क्लब जुवेनिल दे असोळ्णा‘ (असोळ्णा युवक मंडळ) या संस्थेला एक राजकीय संस्था असे म्हणत असोळ्णातील चर्चने संशयाने पाहिले. असोळ्णा चर्चच्या पाद्—यांनी बिशप यांना लिहिलेल्या पत्रात, ‘असोळ्णा युवक मंडळाचे सदस्य क्रॉसला अपवित्र करत आहेत.’ अशी तक्रार केली आहे. हे पत्र पणजीमधील आर्चबिशपच्या राजवाड्याच्या संग्रहात जतन केले गेले आहे. ‘स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित कुठलीही गोष्ट चर्चवर हल्ला आहे’असे समजण्याच्या काळात स्वातंत्र्यासाठी ख्रिश्चनांनी चर्चचा विरोध पत्करणे ही फारच धाडसाची गोष्ट होती.
व्हॉईसरॉय किंवा गव्हर्नरचे निधन झाल्यास आणि लिस्बनहून त्या जागी नवीन व्यक्ती रुजू होण्यास लागणाऱ्या कालावधीत राज्याची सूत्रे मुख्य बिशप आपल्या हाती घेत असत. आणि यांच्याशी त्यांचा संबंध नसता, तर ज्याने गोव्यातील स्वातंत्र्य चळवळीच्या शेवटच्या टप्प्याला गतिमान करणारी डॉ. राम मनोहर लोहियांनी चालवलेली 1946 ची सविनय कायदेभंग चळवळ, जर लोहियांचा संबंध ज्युलियाओ मिनेझिस यांच्याशी नसता, तर कधीच एवढी तीव्र झाली नसती. ‘मुव्हमेंतो दे रुआ’ (रस्ता आंदोलन) म्हणून पोर्तुगीजांनी हिणवलेल्या या चळवळीने चारशे वर्षांत पहिल्यांदाच पोर्तुगिजांना विचार करायला भाग पाडले. या चळवळीचा परिणाम म्हणून हजारो ख्रिश्चन आणि हिंदू गोमंतकीयांना तुरुंगवासाची व हद्दपारीची शिक्षा भोगावी लागली. टी.बी.कुन्हा यांच्या खटल्यात न्यायालयापासून ते रस्त्यापर्यंत होत असलेली गर्दी पोर्तुगिजांना विस्मयचकित करत होती. अशी व्यापक जागृती त्यांनी आधी पाहिली नव्हती. तोपर्यंत पोर्तुगिजांना विरोध करण्याचे धाडस गोमंतकीयांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात केले नव्हते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (गोवा)ची स्थापना करण्यात आणि 1928 साली राष्ट्रीय काँग्रेसशी संलग्न करण्यात टी. बी. कुन्हा यांची मोठी भूमिका होती. त्यांच्या विचारांची ओळख त्यांच्या ‘डीनॅशनलायझेशन ऑफ गोवा’ या पुस्तकातून होते. चर्चने कुन्हा यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव दफन करण्यास जागा नाकारली हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे, त्यांचे पार्थिव शिवडी येथील महापालिकेच्या स्मशानभूमीत दफन करावे लागले.
‘चर्चची शिकवण येशू ख्रिस्ताच्या शिकवणीशी प्रामाणिक नाही.’, असे त्यांचे स्पष्ट मत होते. चर्चविरुद्धचे त्यांचे मत राजद्रोह म्हणून गणले गेले. स्वातंत्र्यसैनिक म्हणून चर्चने धिकारलेल्या एका ख्रिश्चन व्यक्तीने ख्रिस्तपंथाचा त्याग त्यांच्या मृत्यूपर्यंत केला नाही, ही गोष्ट लक्षांत घेणे महत्त्वाचे आहे. मरणोपरांत आपल्या पार्थिवाचा अंत्यविधी ख्रिश्चन पद्धतीने व्हावा, अशी इच्छा अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी जिवंतपणी व्यक्त केली होती. 1800 च्या उत्तरार्धात बर्नार्डो पेरेस दा सिल्वा यांनी अशी मागणी पहिल्यांदा केली होती. त्यांच्या पार्थिवाची राख एका कलशात भरून तो कलश लिस्बनमधील सेमेटेरियो डी प्राक्सेरेसमध्ये जतन करण्यात आला. खरे तर गोव्याच्या इतिहासावरील कोणत्याही पुस्तकात याचा उल्लेख नाही. जेव्हा मी त्यांच्या थडग्याजवळ आदरांजली वाहण्यासाठी गेले, तेव्हा ही गोष्ट मला समजली. स्मशानभूमीच्या नोंदीवरून कळले की त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बर्था मिनेझिस ब्रागांसा यांच्या पार्थिवावरही त्यांच्या अंतिम इच्छेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अस्थी चांदोर स्मशानभूमीतील कौटुंबिक कबरीत पुरण्यात आल्या. अॅड. ज्योकिम डायस यांच्या पार्थिवावरही पणजीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
1950 च्या दशकाच्या सुरुवातीला आझाद गोमंतक दल, गोवा लिबरेशन आर्मी, गोवा युथ लीगचे अनेक सदस्य ख्रिश्चन होते. बहुसंख्य ख्रिश्चन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. यांपैकी बहुतेकांना मुंबईत निर्वासितांचे जीवन जगावे लागले आणि डिसेंबर 1961 नंतर ते गोव्यात आले. जुझे इनासिओ लोयोला, डॉ. टेलो मास्करेन्हस, डॉ. जुझे फ्रान्सिस्को मार्टिन, लॅम्बर्ट मास्करेन्हास, अॅड. लुईस मेंडिस, अलॉयसियस सोरेस, रोके सँताना फर्नांडिस, डॉ. युक्लिटो डीसोझा, अँथनी फुर्तादो, बर्था मिनेझिस ब्रागांझा, कार्लिस्टा अरावजो, लिबी लोबो सरदेसाई आणि इतर असंख्य लोक या द्वितीय संघर्षाचे बळी ठरले होते. चर्चने त्यांच्याकडे, ‘ख्रिश्चन पंथाला आचरणात न आणणारे’ म्हणून पाहिले. पोर्तुगीज सरकारने तुरुंगात टाकण्याची सतत भीती त्यांनी बाळगली. त्याशिवाय त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाने, त्यांच्या गावाने त्यांना वाळीत टाकले. त्यांच्याच समुदायानेे त्यांना जवळजवळ बहिष्कृत केले. असे दुहेरी वार सहन करून आपल्या हृदयात राष्ट्रपेमाची ज्योत तेवत ठेवणाऱ्यांच्या राष्ट्रनिष्ठेविषयी शंका घेणे किंवा त्यांचा सहभागच नाकारणे यासारखा घृतघ्नपणा, नतद्रष्टपणा दुसरा नसेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.