सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांचे प्रशासन तसे चांगले असते. आता हेच पाहा, शिरोड्यातील सहकार सप्ताह कार्यक्रमात सुभाष भाऊंनी शिरोडा उत्कृष्ट सहकार ग्राम करण्याची घोषणा केली.
त्यासाठी गोमंतकीय व इतर वस्तूंना योग्य मागणी मिळण्याबरोबरच छोट्या ग्रामीण घटकांना रोजगार उपलब्ध व्हावा अशी कल्पना केली. अशाप्रकारची कल्पना अन्य कुणा सहकारमंत्र्याने यापूर्वी केली नव्हती. त्यामुळे इतरांनाही ती ‘अपील’ झाली. शेवटी अनुभव हा महत्त्वाचा असतो नाही का...!
खड्डे कधी बुजणार?
गोव्यातील रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी जाहीररीत्या सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झालेले दिसत नाही! शिवाय, अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांची वाताहत झाली आहे! मुळात सरकारने मूलभूत सुविधा चांगल्या द्याव्यात इतकी माफक मागणी जनतेची आपल्या सरकारकडून अपेक्षित असते. मात्र, त्याची पूर्तता होताना काही दिसत नाही.
पाणी असो किंवा रस्त्यांचा विषय, जोवर लोक थेट रस्त्यावर उतरून सरकारला जागे करीत नाहीत, तोवर प्रशासन खडबडून जागे होत नाही ही वस्तुस्थिती! आता रस्त्यांवरील हे खड्डे खरेच बुजणार की ती घोषणा हवेत विरली असे लोकांनी मानून चालावे!
महामंडळांवर डोळा
हल्लीच भाजपात दाखल झालेल्या आठ काँग्रेस आमदारांच्या आशा पुन्हा पल्लवीत झालेल्या आहेत. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकांत ही मंडळी आपणाला न्याय मिळाला नसल्याची तक्रार केल्यावर त्यांना म्हणे विविध सबबी सांगितल्या जात असत, पण आता त्या ऐकून घेण्यास ते तयार नसावेत.
त्यांना देण्यासाठी वजनदार महामंडळे नाहीत असे त्यांना ऐकवण्यात आले, तेव्हा म्हणे त्यांनी एक व्यक्ती एक पद या तत्त्वानुसार मंत्र्यांकडे असलेली महामंडळे काढून घ्या व ती द्या अशी मागणी केली व मुख्यमंत्र्यांसह सगळेच अवाक् झाले. आता बोला!
‘रेड कार्पेट’वर दामूंची ‘एन्ट्री’
खूप दिवसांपासून दामू नाईक तसे खास चर्चेत नाहीत. आज मात्र ते चक्क ‘चंदेरी दुनिये’त झळकले. इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यास दामू नाईक यांनी रेड कार्पेटवरून ‘एन्ट्री’ केली तीही खासदारसाहेबांसमवेत. दामूंना पाहून इफ्फीच्या आयोजकांनाही आनंद झाला.
दामूंचा ती ‘राम राम’ करण्याची स्टाईल अभिनेत्यांनाही आवडली म्हणे... अभिनेत्यांसमवेत दामूंनी बातचीत केली. आता नेत्या आणि अभिनेत्यांच्या चर्चेत काय असते ते न विचारलेले बरे... एकंदरीत दामूंची इफ्फीतील एन्ट्री एखाद्या चित्रपटातील असावी अशीच होती...
भाजप मंडळाला दिले ‘पास’!
इफ्फीच्या उद्घाटन आणि समारोपाचे पास हा इफ्फी दरम्यानचा सर्वात मोठा चर्चेचा विषय असतो. कोणाला ते मिळतात आणि कोणाला मिळत नाहीत. म्हणूनच भाजपने यंदा नामी शक्कल लढवत आपल्या भाजप मंडळांकडून यादी मागवून ती इएसजीला सादर करून तेवढे एकगठ्ठा पास पळविले आणि त्याचे वितरण पक्षाच्या कार्यालयातून केले गेले. हा सत्तेचा उपभोग की लाभ असे म्हणत काँग्रेसवाले बोटे मोडत होते.
ढवळीकरांची घोषणा संपेना...
सुदिन ढवळीकर सध्या विविध गावांचा दौरा करताना दिसतायेत. प्रत्येक गावात ते वीज प्रश्नावर बोलतात. लवकरच 400 कोटींची कामे केली जातील, अशी घोषणा आता ढवळीकर नक्की करतील याचा अंदाज संबधित ग्रामस्थानांही आला आहे.
त्यामुळे ढवळीकर येणार... म्हणजे 400 कोटींचा आकडा पुन्हा ऐकायला मिळणार... हे जणू समिकरणच झाले. घोषणा करा पण, ती प्रत्यक्षात कधी आणणार हेही सांगा, अशी चर्चा लोक करीत आहेत. भूमिगत वीजवाहिन्यांचे काम अर्धवट आहे. बऱ्याच गावात अजूनही सुरळीत वीजपुरवठा होत नाही.
त्यांना अंधारातून प्रकाशाकडे न्या... मगच 400 कोटींची घोषणा करा... नाहीतर दुसऱ्या घोषणेची तयारी तरी करा, असा टोमणा ग्रामस्थ लगावत आहेत. त्यामुळे वीजमंत्र्यांच्या नव्या घोषणेकडे लक्ष असेलच...
कारागृह कर्मचारी धास्तावले
कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहाचा ताबा पोलिस अधिकाऱ्यांकडे दिल्याने या खात्यातील कर्मचारी व कैद्यांचेही धाबे दणाणले आहेत. पोलिस खात्यामध्ये कैद्यांना चौकशीत ज्याप्रकारे हाताळले जाते तसेच हे नवे अधिकारी कार्यपद्धती अवलंबिणार काय अशी भीती निर्माण झाली आहे.
आयपीएस पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची गणना केली जाते. कोणतेही गैरप्रकार ते खपवून घेत नाहीत. त्यांनी ताबा घेतला त्या दिवसांपासूनच खात्याच्या कर्मचाऱ्यांना संकेत दिले आहेत. त्यामुळे इतके दिवस कारागृहातील कैद्यांशी साटेलोटे असलेल्या एका तुरुंग अधिकाऱ्याच्या पोटात गोळा आला आहे.
त्याने तुरुंगातील कैद्यांना पाठिंबा देऊन त्यांची कृत्ये त्यांच्याकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभामुळे लपवत होता. आता कारागृहातील सुरू असलेल्या पार्ट्या तसेच गुंडागिरीवर नियंत्रण येणार आहे. या कारागृहातील लागेबांधे मोडून काढण्यासाठी त्यांनी व्यूहरचना आखली आहे.
जो कोणी दोषी सापडेल त्याची गय केली जाणार नाही अशी तंबी दिल्यानेच कर्मचारी वर्गही कामाला लागला आहे. हे अधिकारी कधीही कारागृहात छापा मारू शकतात याचा अंदाज कैद्यांना असल्याने तेसुद्धा सावध झाले आहेत.
गट अध्यक्ष मिळेनात
आठ आमदारांनी भाजपाची कास धरल्यानंतर अडचणीत आलेल्या काँग्रेसने तडकाफडकी चाळीसही मतदारसंघातील गट समित्या बरखास्त करून टाकल्या. आता तेथे नव्या समित्या नियुक्त करण्याचे काम सुरू केलेले असले, तरी वस्तुस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी त्या पक्षाला तळमळीने काम करणारे उमेदवारच मिळत नाहीत.
मडगाव, कुडतरी, नुवे येथे प्रामुख्याने ही समस्या उद्भवली आहे. यापूर्वी 2012 मधील निवडणुकीपूर्वी फातोर्ड्यात व 2018 मध्ये दहा आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर दहा मतदारसंघात त्या पक्षावर हीच स्थिती ओढवली होती. आता पक्षातच पाटकर व चोडणकर असे दोन गट तयार झाल्याने सांगायचे कोणाला असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्याला पडला तर नवल नाही.
‘पासेस’चा काळाबाजार
नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे दरवर्षी इफ्फी येतो आणि त्याच्या उद्घाटन व समारोपाचे पासेस नक्की कोठे जातात ही मोठी अकलनीय गोष्ट आहे. या पासेसचा काळाबाजार होतो की काय? इतकी शंका येण्याइतपत हे पास महागडे बनले आहेत आणि प्रत्यक्ष सोहळ्यात भलतेच प्रेक्षक गर्दी करून असतात.
त्यांना ना उद्घाटन सोहळ्यात रस असतो, ना मंत्र्यांच्या भाषणात. मग इफ्फीच्या सोहळ्याचा नेमके कोण आनंद लुटतात हे आयोजकांनी आता शोधावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.