Ranji Trophy Cricket: उपेंद्र, सूरजमुळे रेल्वे संघ रुळावर

Ranji Trophy Cricket: गोव्याविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 9 बाद 293
Ranji Trophy Cricket
Ranji Trophy CricketDainik Gomantak

Ranji Trophy Cricket: गोव्याच्या गोलंदाजांनी रणजी करंडक क्रिकेट सामन्यात ठराविक अंतराने धक्के दिल्यानंतरही रेल्वे संघ रुळावरून साफ घसरला नाही.

शतक नऊ धावांनी हुकलेला कर्णधार उपेंद्र यादव आणि सलामीचा सूरज आहुजा यांच्या शानदार अर्धशतकांमुळे त्यांनी तीनशे धावांच्या जवळ मजल मारली.

सूरत येथील लालभाई काँट्रेक्टर स्टेडियमवर एलिट क गट सामन्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी खेळ थांबला तेव्हा रेल्वेने ९ बाद २९३ धावा केल्या होत्या.

सलामीच्या सूरज आहुजा याने ८१ धावा केल्या. त्याने १६७ चेंडूंतील खेळीत १२ चौकार मारले. भारत अ संघातून खेळलेल्या उपेंद्रने ९१ धावांची खेळी केली.

त्याने ११७ चेंडूंतील खेळीत ११ चौकार व १ षटकार मारला. दिवसातील अंतिमपूर्व षटकात दीपराज गावकरच्या गोलंदाजीवर त्याचा फटका चुकला आणि रेल्वेच्या कर्णधाराचे शतक थोडक्यात हुकले.

गोव्यातर्फे मध्यमगती दीपराज गावकरने शानदार मारा करताना २६ धावांत ३ गडी टिपले. गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ याने नाणेफेक जिंकून रेल्वेला प्रथम फलंदाजीस पाचारण केले होते. गोव्याने संघात तीन बदल केले. फेलिक्स आलेमाव, अमोघ देसाई, स्नेहल कवठणकर यांनी पुनरागमन केले.

उपेंद्रची कर्णधारास साजेशी खेळी

रेल्वेचा कर्णधार २७ वर्षीय उपेंद्र यादव याने कर्णधारास साजेशी फलंदाजी करत गोव्याच्या गोलंदाजांचे वर्चस्व झुगारून लावले. दिवसातील दुसऱ्या सत्रात दीपराज गावकर व कर्णधार दर्शन मिसाळ यांनी एकत्रित चार गडी टिपले.

त्यामुळे चहापानाला खेळ थांबला तेव्हा रेल्वेची ६ बाद १९८ अशी स्थिती झाली. प्रतिकुल परिस्थितीत उपेंद्रने तळाच्या फलंदाजांसह खिंड लढविली.

त्याला युवराज सिंग (२२) व आकाश पांडे (२६) यांनी मोलाची साथ दिली, त्यामुळे रेल्वेला पहिल्या डावात आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. उपेंद्रने युवराजसह सातव्या विकेटसाठी ५९ धावांची, तर आकाशसह आठव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली.

दुसऱ्या नव्या चेंडूवर यश

गोव्याने ८६व्या षटकानंतर डावातील दुसरा नवा चेंडू घेतला आणि जम बसलेली जोडी फुटली. हेरंब परबच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याचा आकाशचा प्रयत्न चुकला आणि लक्षय गर्गने झेल पकडला.

दोन धावांनंतर दीपराजने उपेंद्रला चकविले. दिवसातील अखेरच्या चार षटकांत जम बसलेले दोन गडी बाद केल्यामुळे रेल्वेला तीनशे धावांच्या आत गुंडाळण्याची संधी गोव्याला प्राप्त झाली आहे.

संक्षिप्त धावफलक

रेल्वे, पहिला डाव ः ९० षटकांत ९ बाद २९३ (सूरज आहुजा ८१, विवेक सिंग १५, प्रथम सिंग ५, महंमद सैफ १६, उपेंद्र यादव ९१, साहब युवराज सिंग ०, आशुतोष शर्मा १७, युवराज सिंग २२, आकाश पांडे २६, आदर्श सिंग नाबाद ०, हिमांशू संगवान नाबाद ०, लक्षय गर्ग ९-१-२८-०, हेरंब परब ११-४-१८-१, फेलिक्स आलेमाव १३-१-५४-१, दीपराज गावकर १६-५-२६-३, मोहित रेडकर १७-०-६५-१, दर्शन मिसाळ २२-१-८१-२, अमोघ देसाई १-०-३-०, सुयश प्रभुदेसाई १-०-५-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com