Goa News: कोरोना महामारीमुळे बऱ्याच लोकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. याला परदेशात किंवा खलाशी म्हणून काम करणारे युवकही अपवाद नाहीत. केळशी येथील लेस्ली परेरा यानेही खलाशाची नोकरी गेल्याने हताश न होता, मधुमक्षिका पालनाच्या व्यवसायातून बेरोजगारीवर मात केली आहे.
आता खादी ग्रामोद्योग महामंडळाने लेस्लीची दक्षिण गोवा क्षेत्र सहाय्यक म्हणून त्यांची निवड केली असून दक्षिण गोव्यातील मधमाशी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सरकारने सोपवल्याचे त्याने सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून लेस्लीने केळशी येथील कुळागरात मधमाशी पालन व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायातून उपजीविका चालवीत असल्याचे त्याने सांगितले. आपल्याकडे आतापर्यंत 18 पेट्या असून एका पेटीतून सहसा 4 ते 5 किलो मध गोळा करता येते. सध्या 1800 रु. प्रतिकिलो दराने मधाची विक्री होत आहे. सरकार (ग्रामोद्योग आयोग) 90 टक्के अनुदान देते. मागणी आहे, पण पुरवठा कमी असल्याने या व्यवसायात संधी आहे, असे लेस्लीने सांगितले.
आपण सुरवातीला केळशीतील स्थानिक मध व्यावसायिकांकडून माहिती घेतली. त्यानंतर मडगाव येथील कृषी विज्ञान केंद्रानेही याबद्दल माहिती देऊन मदत केली. पुणे येथे रितसर प्रशिक्षण घेतले, असे लेस्लीने सांगितले.
मधमाशीचे विषही उपयुक्त !
या व्यवसायास आवश्यक सर्व सामग्रीसह या व्यवसायात उतरायला पाहिजे. माश्या तसेच पेट्या तयार केल्या आणि आवश्यक वातावरण निर्माण केल्यावर मधमाशी आपले काम करते. शिवाय मधमाशीचे विष संधिवात, रक्त पुरवठा इत्यादीसाठी उपचार म्हणूनही वापरले जाते, असेही लेस्लीने सांगितले.
‘त्यांच्या’कडून होऊ शकते फसगत!
सध्या बऱ्याच ठिकाणी रस्त्यालगत परप्रांतीय लोक मध विकताना दिसतात,अशांकडून कधीही मध घेऊ नका. कारण मधाच्या नावाखाली गुळाचे पाणी मिसळून लोकांना ठगण्याचे काम ते करतात.ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात मध निर्मिती होत नसल्याने तर या लोकांकडून मध घेऊच नये. घ्यायचेच झाल्यास ओळखीच्या लोकांकडून घ्यावे, असे आवाहनही लेस्लीने केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.