Goa Tourism: आवर्जून पहावा असा निसर्ग संपन्नतेने साकारलेला समुद्रापलीकडचा गोवा

Goa Tourism: गोव्याची निसर्गरम्य यात्रा: अभयारण्ये, धबधबे आणि ऐतिहासिक स्थळांची सफर
Wildlife
Wildlife Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism: गोवा म्हणजे फेसाळता समुद्र, गजबजणारे विस्तीर्ण सागरकिनारे, किनाऱ्यालगतचे सावलीत उभारलेले शॅक, भव्य जहाजे, मच्छीमारी होड्या, कॅसिनोमधलं नाईट लाईफ, पबमध्ये डीजेच्या तालावर थिरकत अनुभवता येणारी मौजमजा असंच काहीसं चित्र पर्यटनासाठी येणाऱ्याच्या मनात उभारलेलं असतं. मात्र या सगळ्याच्याही पलीकडचा एक वेगळा गोवा आहे. हो, निश्चितच आहे.

गोव्यात सर्व भागात भव्य-दिव्य अशी मंदिरे उभारलेली आहेत; पण मंदिरांच्या मांदियाळीतील गोव्यापेक्षा जैव विविधतेने संपन्न असलेला, जंगलाने व्यापलेला एक एक सुंदर 'गोवा' गोव्यामध्येच आहे. महावीर अभयारण्य, मोले राष्ट्रीय उद्यान, बोंडला अभयारण्य, खोतीगाव अभयारण्य, दूधसागर धबधबा अशा विविध स्थळी गेल्यावर तुम्हाला निसर्गाचा अनोखा अविष्कार पाहायला मिळतो.

  • भगवान महावीर वन्य जीव अभयारण्य व मोले राष्ट्रीय उद्यान-

गोव्याच्या ईशान्य सीमेकडे अंदाजे 60-70 किलोमीटरचा प्रवास केल्यावर भगवान महावीर वन्य जीव अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यालगतच गोवा- बेळगाव राष्ट्रीय महामार्ग आहे.

त्या बाजूनेही गोव्यात प्रवेश करून जंगलात जाता येते. महावीर अभयारण्याने 240 कि.मी.चा प्रदेश व्यापलेला असून पश्चिम घाटाच्या सुंदर वळणांनी दऱ्याखोऱ्याचे दर्शन घेत या घनदाट अभयारण्यातून भटकंती करता येते.

गोव्याची वैशिष्ट्ये सांगणाऱ्या विविध वनस्पती, अनेक प्रकारची फुले, पशू-पक्षी यांच्या शिवाय या जंगलात अनेक भौगोलिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची स्थळेही आहेत. या निसर्गसंपन्न भागालगतच तांबडी सुर्ल हे ऐतिहासिक महत्व लाभलेलं गाव आहे. हेमाडपंथी बांधकामाचा आणि स्थापत्यशास्त्राचा अनोखा संगम म्हणून या मंदिराकडे पहिले जाते.

  • दूधसागर धबधबा-

सौंदर्याचा मानबिंदू म्हणून मिरवणारा दूधसागर धबधबा मोल्याच्या जंगलात आहे. कुळे गावातून एक तासाच्या अंतरावर असलेल्या दूधसागर धबधब्याला जायला कुळ्यातूनच वाहनाची सोय आहे.

इथून रेल्वेही जात असून खिडकीच्या बाहेरून दूधासारखा कोसळत असलेल्या दूधसागराचे आपण दर्शन घेऊ शकतो. पण दूधसागरच्या विराट रूपाचे दर्शन घ्यायचे असेल, तर पदभ्रमंतीच हवी.

तसेच निसर्गाचा आणखी एक अविष्कार याच ठिकाणी आपल्याला पहायला मिळतो. 'देवचाराची कोंड' नावाचा डोह ज्याला 'द डेव्हिल्स कॅनियन' जवळच असून ही जागाही आवर्जून पाहण्यासारखी आहे. हा डोह नयनरम्य असला तरी तो पाहताना सावधगिरी बाळगणेही महत्वाचे आहे. हा डोह खोल असून पर्यटकांच्या अतिउत्सहीपणामुळे दुर्दैवी घटना देखील घडल्या आहेत.

  • खोतीगाव अभयारण्य-

दक्षिण गोव्यातील काणकोण हा अत्यंत निसर्गरम्य भाग आहे. पणजीपासून काणकोण तालुका अंदाजे 80 कि.मी. अंतरावर सुरू होतो. तिथून 3 कि.मी. अंतरावर खोतीगाव अभयारण्य लागते. पणजी- मंगळूर राष्ट्रीय मार्गावरूनही या ठिकाणी आपल्याला जाता येते.

खोतीगाव अभयारण्य हे गोव्यातील सगळ्यात घनदाट मानले जाते. सदाहरित आणि निमहरित अशा दोन्ही प्रकारचे हे जंगल आहे, असंख्य प्रजातींची झाडे, लहान-मोठ्या वनस्पती, किड्यापासून वाघापर्यंतचे अनेक प्राण्यांच्या प्रजातींनी हे जंगल समृद्ध बनले आहे.

  • बोंडला अभयारण्य-

बोंडला हे अभयारण्य पणजीपासून 50 कि.मी. अंतरावर फोंड्यापासून जवळ आहे. गोव्यातील तीन अभयारण्यांपैकी हे एक लहान आहे. या अभयारण्यात प्रवेश करतानाच हरणांचे, रानडुकरांचे कळप दिसायला लागतात.

बिबट्यांची जोडी, अजगर, सर्प, मगरी, रानडुकरं, नीलगायी, मोर, साळिंदर, मांजराच्या काही जाती, मोर, वानरे असे वन्यजीव आपल्याला इथे पाहायला मिळतात.

  • डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य-

पणजीच्या जवळच मांडवी नदीच्या पात्रातील चोडण बेटावर तयार झालेले डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य हे पक्षी निरीक्षकांचे नंदनवनच होय. मँग्रोव्हच्या वृक्षांनी हे अरण्य व्यापलेले आहे.

असंख्य स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या किलबिलाटाने हे अवघे अरण्य साद घालत असते. पणजीकडून जुन्या गोव्याकडे जाण्याच्या रस्त्यावर रायबंदर येथून फेरी बोटीने नदीचे पात्र ओलांडून अभयारण्यात जाता येते.

(सदर माहिती ही गोव्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून संकलित केली असून यातून गोव्याचे सकारात्मक आणि आदर्श चित्र उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.)

Edited by:- गणेशप्रसाद गोगटे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com