गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी रविवारी कुडचडे येथे लोकांशी संवाद साधण्याचा जो कार्यक्रम ठेवला आहे, त्याकडे सर्वजण कुतूहलाने पाहात असतानाच काँग्रेस गोटात मात्र त्यामुळे चलबिचल निर्माण झाली आहे. कॉंग्रेस नेते मोरेन रिबेलो यांनी या कार्यक्रमाला आक्षेप घेतल्याने काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कार्यक्रमाची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना दिलेली नाही, असा दावा करीत काँग्रेसचे मोरेन रिबेलो यांनी या कार्यक्रमाला आक्षेप घेतला आहे. मात्र, मी कुठेही कार्यक्रम घेण्यास मुक्त आहे. यापुढे मी कुठे कार्यक्रम करावा, यासाठी अमित पाटकर आणि मोरेन रिबेलो यांची परवानगी घ्यायला पाहिजे का, असा संतप्त सवाल विजय सरदेसाई यांनी केला आहे.
काँग्रेस कार्यकर्ते कुडचडेचे माजी नगराध्यक्ष पिंटी होडारकर यांच्या आमंत्रणावरूनच सरदेसाई यांनी 11 ऑगस्ट रोजी कुडचडे येथे संवादाचा कार्यक्रम ठेवला आहे. मात्र, गोवा फॉरवर्डने कुडचडेत मुसंडी मारण्याचा हा प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जाते.
त्यामुळेच काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मोरेन रिबेलो यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांना या कार्यक्रमाची कुणीही माहिती दिलेली नाही. सुरुवातीला आम्हाला हा सरदेसाई यांचा वैयक्तिक कार्यक्रम असावा, असे वाटले. पण आता त्याहीमागे काहीतरी राजकारण आहे असे वाटते, असे सांगत त्यांनी या कार्यक्रमाला आक्षेप घेतला आहे.
यावर विजय सरदेसाई यांची प्रतिक्रिया विचारली असता, कुडचडेच्या लोकांनी त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी मला बोलावले तर मी तिथे जायचे नाही का? की त्यासाठीही मला पाटकर आणि मोरेन यांची परवानगी घ्यावी लागेल, असा प्रतिप्रश्न सरदेसाई यांनी केला आहे.
विजय सरदेसाई यांच्या रविवारच्या कार्यक्रमाबाबत मला काहीच माहिती नाही. कुडचडेतील स्थानिक नेत्याने या कार्यक्रमाविषयी काही मत व्यक्त केले आहे. मात्र, ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.