म्हादईचा भाजप आणि कॉंग्रेसने मतांसाठी आणि राजकारणासाठी सौदा केला, असा आरोप रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी गुरुवारी (ता.15) येथे पत्रकार परिषदेत केले.
यावेळी त्यांच्यासोबत आमदार वीरेश बोरकर व अन्य पदाधिकारी होते. त्यांनी 10 मुद्यांचा पक्षाचा लोकसभा निवडणूक जाहीरनामा यावेळी प्रकाशित केला.
परब म्हणाले, भाजपने म्हादईसाठी आंदोलन केले, कॉंग्रेसनेही आंदोलन केले होते. कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार आले आणि कॉंग्रेसवाले थंडावले. आमचे खासदार संसदेत म्हादईच्या प्रश्नावर गोमंतकीय जनतेचा आवाज बुलंद करतील. गोव्याची जमीन संरक्षित करण्यासाठी पक्ष प्रयत्न करेल. उद्यापासून घरोघर प्रचार केला जाणार आहे.
उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतलेल्या रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित करण्यातही आघाडी घेतली आहे. यामुळे निवडणूक निकालापर्यंत ते ही आघाडी टिकवतील का, याविषयी उत्सुकता आहे. लोकांची स्पंदने टिपणारा पक्ष अशी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या ‘आरजी’ या पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात गोमंतकीयांना दुहेरी नागरिकत्व मिळवून देण्याचे अभिवचन दिले आहे.
पक्षाचे प्रमुख मनोज परब हे उत्तर गोव्यातून तर रुबर्ट परेरा हे ‘आरजी’तर्फे दक्षिण गोव्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. कॉंग्रेस स्थापन करत असलेल्या ‘इंडिया’ आघाडीचा या पक्षाला घटक पक्ष व्हायचे होते. यासाठी आघाडीकडून चर्चेला बोलावणे येईल यासाठी काही काळ या पक्षाने वाट पाहिलीही होती. मात्र, पक्षाचे उमेदवार घराघरांत पोहोचण्यास उशीर होईल म्हणून त्यांनी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
मूळ गोमंतकीयांनाच सारे सरकारी लाभ आणि नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, अशी आग्रही भूमिका या पक्षाने घेतली आहे. त्यासाठी त्या पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकर यांनी विधानसभेत विधेयक सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.
ते विधेयक कायदा खात्याच्या विचारार्थ पाठवण्यात आले आहे. ते विधेयक चर्चेला येणार नाही याची खात्री पटल्यानेच की काय आरजीने लोकसभा निवडणुकीत पोगो (पर्सन ऑफ गोवन ओरिजीन) या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्याचे आश्वासन दिले आहे.
गोमंतकीयांसाठी लढा!
म्हादईप्रश्नी कठोर भूमिका घेण्याचे सुतोवाच पक्षाकडून करण्यात आले आहे. म्हादईचे पाणी कर्नाटकाला वळवू न देण्यासाठी न्यायालयात आणि न्यायालयाबाहेरही लढा देण्याची ‘आरजी’ची तयारी या जाहीरनाम्यातून प्रतिबिंबित झाली आहे.
आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण, गोव्यात आणखीन स्थलांतरितांनी बस्तान बसवू नये यासाठी कायदेशीर तरतूद तसेच गोमंतकीयांची जमीन बिगर गोमंतकीयांना घेण्यावर बंदी घालण्यासाठी कायदा, असे विषयही या पक्षाने जाहीरनाम्यात हाताळले आहेत.गोमंतकीयांना घेण्यावर बंदी घालण्यासाठी कायदा, असे विषयही या पक्षाने जाहीरनाम्यात हाताळले आहेत.
प्रचाराला करणार सुरुवात!
‘आरजी’ उद्यापासून राज्यात घरोघरी प्रचार करणार असल्याचे पक्षप्रमुख मनोज परब यांनी जाहीर केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार वीरेश बोरकर होते. राज्यात असलेल्या केंद्र सरकारच्या आस्थापनांत, कार्यालयांत स्थानिकांनाच रोजगार मिळाला पाहिजे, हा मुद्दा लावून धरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.