Goa Police : ‘सिंघमगिरी’ आली गोवा पोलिसांच्या अंगलट! अधिकाऱ्यांना नोटिसा

Goa Police : न्यायालयाचा अवमान आरोपींसोबतचे फोटो टाकले समाज माध्यमांवर;
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police :

पणजी, उच्च न्यायालयाचे निर्देश डावलून आरोपींसोबत फोटो काढून ते प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध करून आरोपींची ओळख उघड केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सोमवारी काही पोलिस अधिकाऱ्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली आहे.

या पोलिस अधिकाऱ्यांना आता या नोटिशीला उत्तर द्यावे लागणार असून हे प्रकरण १५ एप्रिल रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.

प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही पोलिसांनी केलेल्या ‘सिंघमगिरी’चा त्यांना हा फटका बसला आहे. काही पोलिस अधिकारी आरोपींची छायाचित्रे काढून त्यांची ओळख उघड करत आहेत आणि नंतर ही छायाचित्रे वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यासाठी देत होते, या प्रकरणाची उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे.

या प्रकाशित छायाचित्रांमध्ये आरोपी व्यक्तींसोबत पोज देताना दिसत असलेल्या काही अधिकाऱ्यांना न्यायालयाने सोमवारी ‘न्यायालयाचा अवमान’ केल्याची नोटीस बजावली आहे.

ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले, की काही वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने एक निकाल दिला होता आणि पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींची छायाचित्रे काढून ती प्रसिद्धीसाठी देऊन त्यांची ओळख उघड करू नये, असे निर्देश दिले होते. पोलिस महासंचालकांनीही त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना असे करण्यास मनाईची नोटीस बजावली होती.

Goa Police
Flight To Goa: भारतातील सर्वात मोठ्या आदिवासी भागातून गोव्यासाठी सुरु होणार थेट विमानसेवा

न्यायालयाच्या निदर्शनास ७० प्रकरणे

पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींची छायाचित्रे काढून ती प्रसिद्धीसाठी देऊन त्यांची ओळख उघड करू नये असे निर्देश न्यायालयाने देऊनसुद्धा काही पोलिस अधिकाऱ्यांनी छायाचित्रे काढून प्रसिद्धीसाठी पाठवून प्रसिद्धी घेणे सुरूच ठेवले होते.

त्यामुळे न्यायालयाने सोमवारी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अशा प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या काही पोलिस अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. अशी सुमारे ७० प्रकरणे न्यायालयाला आढळून आली आहेत. या नोटिशीला पोलिस अधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com