'नरकासुरी प्रवृत्तींचे' दहन करण्याची वेळ आलीय

Goa News: नरकासूर स्पर्धेच्या या महागडबडीत बिचारा श्रीकृष्ण मात्र कुठेतरी अंग चोरून राहिलेला असतो. अनेकांना तर त्याची आठवणसुद्धा नसते. एरवी आपली संस्कृती वगैरे गप्पा करणाऱ्यांनाही याचे काहीच पडून गेलेले नसते.
Goa News: नरकासूर स्पर्धेच्या या महागडबडीत बिचारा श्रीकृष्ण मात्र कुठेतरी अंग चोरून राहिलेला असतो. अनेकांना तर त्याची आठवणसुद्धा नसते. एरवी आपली संस्कृती वगैरे गप्पा करणाऱ्यांनाही याचे काहीच पडून गेलेले नसते.
Goa Narakasur Dahan Canva
Published on
Updated on

प्रमोद प्रभुगावकर

दसरा उलटला अन् आता दिव्यांचा उत्सव गणली जाणारी दिवाळी दारांत येऊन ठेपली आहे. दिवाळीनिमित्त घरोघरी दिव्यांची आरास केली जाते. हा उत्सव जरी पाच दिवसांचा असला तरी दीपोत्सव मात्र तब्बल पंधरवडाभर म्हणजे तुळशी विवाह ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत चालतो. दसरा असो वा दिवाळी, त्यामागील कथा सांगितली जाते ती रावण वा नरकासूर या राक्षसांच्या निर्दालनाची. त्यांच्या वधानंतरच या सणांच्या माध्यमांतून हे आनंदोत्सव साजरे केले जातात.

राम-रावण युद्ध नऊ दिवस चालले ते नवरात्रांत व दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याला रामाने रावणाचा वध केला. नंतर तो तेथून सीतेसह अयोध्येत परतला तो दिवाळीला व म्हणून अयोध्येतील लोकांनी दीपोत्सव केला अशीही कथा आहे. तर श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांची त्रासातून सुटका केली तो दिवाळीचा दिवस दिवे लावून तेथील प्रजेने साजरा केला अशी आणखी एक कथा सांगते. ते काहीही असो.

आमच्या भारतीय संस्कृतींतील बहुतेक उत्सव वा सणांमागे अशाच वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. वास्तविक रावण, नरकासुर वा शिशुपालासारखे खरेच अस्तित्वात होते की त्या भ्रामक कल्पना वा प्रतीके हासुद्धा एक प्रश्न आहे. पण त्यावर चर्चा करणे म्हणजे नसते वाद ओढवून घेणे होय व म्हणून ती न केलेली बरी. पण रावण असो वा नरकासुर ती एक अति वाईट प्रवृत्ती आहे व ती नष्ट करणे -तिचे निर्दालन करणे यासाठीच हे उत्सव साजरे केलेले असू शकतात. या उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी जरी अशा प्रवृत्तींचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा केली वा त्या दिशेने पावले उचलली तरी बरेच काही होऊ शकते.

गोव्यात पूर्वी दिवाळीत आजच्याप्रमाणे नरकासुरांचे म्हणजे नरकासुर प्रतिमा स्पर्धांचे प्रस्थ नव्हते. गावांत जास्तकरून छोटेखानी नरकासुर करून ते जाळले जात, आजच्याप्रमाणे त्यांच्या मिरवणुका वा स्पर्धा होत नव्हत्या. पण आज नरकासुराच्या नावाने जे काय चालते त्याला नेमके काय म्हणावे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

अगडबंब प्रतिमा, त्यांच्या कर्णकर्कश आवाजाच्या गोंधळात निघणाऱ्या मिरवणुका, दारादारांत व चौकाचौकांत धांगडधिंगा याला कोणताच सुमार नसतो, आपल्या या गोंधळामुळे वयस्क लोकांची झोपमोड होते, त्यांना त्रास होतो याची कोणालाच पर्वा नसते. मध्यरात्रीपर्यंत नव्हे तर पहाटेपर्यंत हे सारे चालते ते कोणी तरी दिलेल्या देणग्यांमुळे वा हा उत्सव प्रायोजित केल्यामुळे. सरकारी यंत्रणा हे सारे डोळे बंद करून पाहत असते.

काही ठिकाणी तर पोलिस अधिकारीच या कार्यक्रमात पाहुणे असतात, मग पोलिस यंत्रणा तरी काय करणार. हा सारा गोंधळ संपेपर्यंत पहाट होत असते व ती आटोपून घरी परतलेली मंडळी झोपतात व त्यामुळे पहाटेचे अभ्यंगस्नान वगैरे सगळे विसरून गेलेले असतात.

नरकासूर स्पर्धेच्या या महागडबडीत बिचारा श्रीकृष्ण मात्र कुठेतरी अंग चोरून राहिलेला असतो. अनेकांना तर त्याची आठवणसुद्धा नसते. एरवी आपली संस्कृती वगैरे गप्पा करणाऱ्यांनाही याचे काहीच पडून गेलेले नसते. काहींनी यापूर्वी नरकासुराचा उदो उदो करण्याच्या प्रकारांविरुद्ध अवश्य आवाज उठविला होता पण मडगावातील बॉम्बस्फोट घटनेनंतर तो विरोध मावळला खरा.

आपल्या देशांत, खुद्द गोव्यातसुद्धा अशा अनेक दुष्प्रवृत्ती आहेत व त्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. त्याचा त्रास लोकांना मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. चिंतेची बाब म्हणजे सज्जनतेचा आव आणणारेच एक प्रकारे या प्रवृत्तींना प्रोत्साहन देतात; एवढेच नव्हे तर त्यांना पाठीशीही घालतात. म्हणून त्या अधिकाधिक प्रमाणात फोफावतात. या दिवसांत उघडकीस आलेले विविध प्रकार या प्रवृत्तींत मोडणारेच आहेत.

अनेक शिक्षण संस्थांत झालेले प्रकार तर लाजेने मान खाली घालायला लावणारे आहेत, कारण त्यांत शिक्षकांचा हात आहे. मग ती विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाण असो वा शारीरिक अत्याचार असो. सरकारी नोकरी देण्याच्या मिषाने झालेली फसवणूक, जमिनीचे प्रचंड प्रमाणातील घोटाळे, पर्यावरण उद्ध्वस्त करण्याच्या घटना, विकासकामांना विशेषतः पायाभूत सुविधा प्रकल्पांना राजकीय हेतूने केला जाणारा विरोध, लोकांना धार्मिक निमित्त पुढे करून दिली जाणारी चिथावणी, सरकारी कार्यालयात सर्वसामान्यांची होणारी अडवणूक हे सगळे याच प्रवृत्तींतील आहेत.

Goa News: नरकासूर स्पर्धेच्या या महागडबडीत बिचारा श्रीकृष्ण मात्र कुठेतरी अंग चोरून राहिलेला असतो. अनेकांना तर त्याची आठवणसुद्धा नसते. एरवी आपली संस्कृती वगैरे गप्पा करणाऱ्यांनाही याचे काहीच पडून गेलेले नसते.
Mega Projects in Goa: गोव्यात का होतोय 'मेगा प्रोजेक्ट्स'ना विरोध? 'गावपण' गमावण्याची भीती की सरकारी 'यंत्रणेवर' अविश्वास?

खरे तर या सर्वांविरुद्ध जनमत तयार व्हायला हवे व त्याचा एक दिलाने धिक्कार व्हायला हवा. पण तसे होताना दिसत नाही व ती चिंतेची बाब आहे. कचरा ही राज्यांतील गंभीर समस्या बनलेली आहे. सरकारने त्यासाठी अनेक उपाय केले, पण कचरारूपी भस्मासुर मागे हटण्याची चिन्हे दिसत नाहीत. गोव्याच्या, गोमंतकीयांच्या हिताच्या गोष्टी अनेकजण करतात पण प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की पाय मागे घेतात हा अनुभव आहे. धर्म, भाषा , प्रांत हे आपले कमकुवत मुद्दे तर नाहीत ना असा प्रश्न त्यामुळे पडतो.

मुक्तीनंतरच्या काळात गोव्यात अनेक मुद्दे उपस्थित झाले पण त्यांतून गोवेकर काही शिकला का, असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच येईल. त्याहून महत्त्वाचे म्हणजे जुने वाद आपण किती काळ उगाळत बसणार, हाही मुद्दा आहे. गोव्यासमोर आज बेकारी, गोव्याचे अस्तित्व टिकवून ठेवणे यांसारखे अनेक मुद्दे आहेत. त्यावर उपाय योजण्यासाठी राज्यकर्त्यांवर लोकांनी दबाव आणायला हवा. पण तसे काहीच होताना दिसत नाही. राज्यकर्तेही तात्कालिक लाभावर नजर ठेवून पावले उचलत आहेत, तर विरोधक केवळ आरोप करून आपल्या तोंडाची खाज भागवताना दिसत आहेत. या एकंदर प्रकारात स्थानिक नागरिकांची मात्र ससेहोलपट होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने या सर्वांचा विचार होईल का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com