
Goa Festival: येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) संस्थेतर्फे 18 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय पुस्तक सप्ताह विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. 18 रोजी संध्याकाळी 4 वाजता संस्थेच्या सभागृहात पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
त्यात गोव्यातील पंधरा पुस्तकविक्रेते व प्रकाशन संस्था सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात विविध विषयांवरील अनेक वाङ्ममय प्रकारांतील पुस्तके उपलब्ध असतील. संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब आणि सदस्य सचिव अशोक परब यांनी साप्ताहाचा तपशीलवार कार्यक्रम आज बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला.
यादरम्यान गोमंतकीय तैलचित्रकार, शिल्पकार तथा पोर्ट्रेट आर्टिस्ट संजय हरमलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिचित्र कार्यशाळा घेण्यात येईल. त्यात विविध क्षेत्रांतील नामवंत गोमंतकीयांची व्यक्तिचित्रे त्यांना मॉडेल म्हणून पाचारण करून बनविली जातील.
22 रोजी पुस्तकावर चर्चा, दशावतारी नाटकाचा प्रयोग
दि. 22 रोजी संध्याकाळी 4 वा. ‘ओरेबियन’ या गजानन देसाई यांच्या पुस्तकावर चर्चात्मक कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे असतील. समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत, साहित्यिक नारायण महाले हेसुद्धा चर्चेत सहभागी होतील.
23 रोजी संध्याकाळी 3.30 वा. गुळेली येथील कलावैभव दशावतारी मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. 24 रोजी संध्या. 4 वा. संस्थेचा स्थापनादिवस व समारोप सोहळा होईल. संस्थेच्या कार्याची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात येईल. तसेच प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांचे ‘वाचन संस्कृती’ विषयावर व्याख्यान होणार आहे.
२१ रोजी कविसंमेलन
21 रोजी संध्याकाळी 4 वा. कवी पांडुरंग गावकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. त्यात दयाराम पाडलोस्कर, गौतमी चोर्लेकर, प्रियांका नाईक, पौर्णिमा केरकर, शोभा फुलकर, ॲड. सलेस्था, ग्वादालोप डायस, डॉ. हनुमंत चोपडेकर, सुनीता फडणीस, सारिका आडविलकर,डॉ. सोनिया सिरसाट, स्मिता भांडारी, अपूर्वा ग्रामोपाध्ये, शिल्पा परब, मानसी धावसकर कविता सादर करतील.
संगीत नाटकाचा इतिहास
दि. 19 व 20 रोजी संध्याकाळी 3.30 वाजता ‘संगीत नाटकाचा इतिहास आणि नाट्यसंगीत सादरीकरण’ असा कार्यक्रम होईल. त्यात नामवंत गायक पं. विजय कोपरकर(पुणे) हे खास निमंत्रित म्हणून सहभागी होणार आहेत.
गोमंतकीय युवा कलाकार प्रवीण शिलकर, अनुष्का थळी, हृषिकेश ढवळीकर, ऊर्वी फडके, मंदार केळकर, सिद्धी मलिक, दत्तू गावस व साथी कलाकार प्रदीप शिलकर, दत्तराज सुर्लकर, दयानिधेश कोसंबे व रोहिदास परब सहभागी होतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.