Nestle Workers Protest: "न्‍याय द्या, अन्‍यथा आमरण उपोषण" नेस्ले'च्या कामगारांचा इशारा; 30 जणांवर उपासमारीची वेळ

Goa labour Protest: चालू महिन्याच्या अखेरपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा सज्जड इशारा कामावरून काढून टाकलेल्या कंत्राटी कामगारांनी दिला आहे.
Nestle Workers Protest
Nestle Workers ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: चालू महिन्याच्या अखेरपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आमच्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्‍‍न सुटला नाही तर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा सज्जड इशारा कामावरून काढून टाकलेल्या म्हावळिंगे येथील ‘नेस्ले’च्या कंत्राटी कामगारांनी दिला आहे.

‘आम्‍हाला कामावर घ्‍या’ अशी मागणी करत राष्ट्रीय मूळनिवासी बहुजन कर्मचारी संघ या कामगार संघटनेच्या बॅनरखाली पंधरा दिवसांपूर्वी (ता. ३१ मार्च) या कामगारांनी कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आता माघार नाही. न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार, असेही बेकारीची कुऱ्हाड कोसळलेल्या या कामगारांनी बुधवारी (ता. १६) आपली कैफियत मांडताना स्पष्ट केले.‘नेस्ले’ कंपनीने जवळपास ३० कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकल्याने या कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कामावरून कमी केल्यानंतर कामगार संघर्ष करत आहेत.

मात्र त्यांच्या मागणीकडे कोणीच लक्ष देत नसल्याने या कामगारांनी आंदोलनाचे अस्त्र हाती घेतले आहे. काढून टाकलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे यासाठी कंपनी व्यवस्थापनासह संबंधित यंत्रणेकडे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. काढून टाकलेले कामगार जरी कंत्राटी असले तरी ते कंपनीशी संलग्न असल्‍याचे असे समजते. मिळालेल्या माहितीनुसार ‘तिरुमल्ला सर्व्हिसिस’ या कंत्राटी कंपनींतर्गत हे कामगार सेवेत होते.

सांगा, आम्ही करायचे तरी काय? कंपनीने दिले वाऱ्यावर सोडून

भवितव्याच्या आशेने आम्ही कंत्राटी पद्धतीवर सेवेत रुजू झालो होतो. दहा-बारा वर्षे काम करूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. आता तर कंपनीने आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. आमच्या भविष्याची कोणालाच काळजी नाही. बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने आता आम्ही कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे? आम्ही जगायचे कसे? अशी कैफियत धरणे आंदोलनाला बसलेल्या कामगारांनी मांडली आहे. सरकारने याप्रश्नी लक्ष घालून आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी या कामगारांनी केली आहे.

कामगारांना धमकावण्याचा प्रकार

कामगारांना अचानक कामावरून काढून टाकण्याचा हा प्रकार अन्यायकारक आहे. कंपनी व्यवस्थापन मजूर आयुक्त आणि अन्य संबंधित घटकांशी पत्रव्यवहार करूनसुद्धा कोणतीच यंत्रणा कामगारप्रश्नी गंभीर नाही. उलट धरणे आंदोलन करणाऱ्या कामगारांना कंपनी व्यवस्थापनाकडून धमकावण्यात येत आहे, असा आरोप राष्ट्रीय मूळनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या गोवा विभागाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी केला आहे.

कामगारांच्या भवितव्याचे कोणालाच काहीच पडलेले नाही, असे आनंद शिरोडकर यांनी सांगून शेवटचा पर्याय म्हणून आता आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com