शिरोडा : शिरोडा मतदारसंघात (Shiroda Constituency) ग्रामीण भागात आवश्यक साधनसुविधांचा अजूनही अभाव आहे. वीजपुरवठा सुरळीत करणे, नियमित पाणीपुरवठा (Water supply) तसेच इंटरनेट, मोबाईल नेटवर्कची समस्या सोडवण्याला प्राधान्य द्यायला हवे. काराय - शिरोडा आणि राय - राशोल या जलमार्गावर पूल उभारणे तसेच इनडोअर स्टेडियमचे (Indore Stadium) काम अजूनही मार्गी लागलेले नाहीत.
शिरोडा विधानसभा मतदारसंघात बोरी, शिरोडा, पंचवाडी आणि बेतोडा, निरंकाल, कोनशे, कोडार हे चार मोठ्या क्षेत्रफळाचे आणि जास्त लोकंसख्येचे गाव येतात. पूर्वी या मतदारसंघात वाडी तळावली आणि दुर्भाट हे गाव येत होते. परंतु, नंतर ते या मतदार संघातून वगळण्यात आले.
आमदारांकडून विकासकामे
विद्यमान आमदार सुभाष शिरोडकर हे १९८४ ते २००२ असे सलग पाचवेळा काँग्रेसमधून निवडून आले. त्यानंतर २००७ ते २०१२ या दोन निवडणूकांत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर महादेव नाईक हे निवडून आले. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर सुभाष शिरोडकर हे पुन्हा निवडून आले. त्यानंतर २०१९च्या पोटनिवडणुकीत सातव्यांदा भाजपच्या उमेदवारीवर शिरोडकर हे निवडून आले.
या मतदारसंघात गोवा मुक्तीनंतर झालेल्या व होऊन गेलेल्या आमदारांनी व ज्यांना मंत्रिपदे मिळाली, त्यांनी मतदारसंघात विकासकामे केली.
जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे भागवली तहान
या मतदारसंघातील मोठा प्रकल्प म्हणजे पंचवाडीचे म्हैसाळ धरण. अलीकडच्या काळात सुमारे ५५ कोटी रुपये खर्चून त्यावर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून पंचवाडी आणि शिरोडा गावात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. काराय येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. बेतोडा येथे अद्ययावत माध्यमिक शाळेसाठी वास्तू उभारली गेली. गावात सार्वजनिक स्मशानभूमी बांधल्या गेल्या. शिरोड्यात औद्योगिक वसाहत तसेच बेतोडा येथे औद्योगिक वसाहत उभारली गेली व यात अनेक सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी व्यवसायाची संधी मिळाली. अंतर्गत भागात रसस्त्यांचे जाळे विणले गेले आहे. शासनाच्या योजनेतून संगीत वर्ग, महिलांसाठी शिलाई व अन्य वर्ग, गृहउद्योग, प्रशिक्षण देऊन घरबसल्या उद्योग व्यवसाय उभारण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली.
रखडलेले प्रकल्प
लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मतदारसंघात होऊन गेलेल्या आमदारांनी कार्य केलेले आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि तत्कालीन मंत्री महादेव नाईक यांनी काराय - शिरोडा आणि राय राशोल या जलमार्गावर पूल बांधण्यासाठी ७० कोटी खर्चाची योजना आखली होती. तसेच शिरोड्यात इंडोअर स्टेडियम उभारण्यासाठी साडे आठ कोटी खर्चाची योजना आखली होती. ही दोन मोठी कामे अद्याप बाकी राहिली आहेत.
टेक्निकल स्कूल इमारत ३५ वर्षे वापराविना
विकासाच्या बाबतीत हा मतदारसंघ आघाडीवर असला, तरी बोरी गावातील बेतकी येथील टेक्निकल स्कूलची इमारत गेली ३५ वर्षे वापराविना आहे. अशा सरकारी प्रकल्पाचा वापर व्हायला हवा. बोरीचा पूल आता ३५ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे समांतर पूल बांधायला हवा. बेतोडा गावातील अंतर्गत रस्त्यांच्या बाजूला दाटीवाटीने असलेली झुडपे व झाडे तोडून रस्ते मोकळे करणे गरजेचे आहेत. मतदारसंघात चांगले रस्ते असले तरी धोकादायक वळणे कापणे आणि रस्ता रुंदीकरण करण्याला प्राधान्य द्यायला हवे.
खंडित वीजसमस्येवर हवा तोडगा
बोरी, शिरोडा, पंचवाडी, बेतोडा, निरंकाल कोनशे, कोडार या गावात वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्यावर उपाय काढायला हवा. ऑनलाईन शिक्षण सध्या काळाची गरज बनली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विशेषत: उडेन, पाज, पंचवाडी, निरंकाल आदी भागात मोबाईल टॉवर उभारून सोय करायला हवी. अंतर्गत भागात आवश्यक साधनसुविधा निर्माण केल्या, तर हा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत अग्रेसर ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.