Goa News Update 28 December 2023 : गोव्यातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

तिळारीचे पाणी ओव्हरफ्लो; पिलींबी परिसरात पाणीच पाणी
Goa Live Update 28 December 2023 | Goa Breaking News
Goa Live Update 28 December 2023 | Goa Breaking NewsDainik Gomantak

सत्तरी शेतकरी संघटनेची सरकारवर टीका 

म्हादई वाईल्ड लाईफ सेंच्यूरी अंतिम करण्याची प्रक्रिया सरकारने हाती घेतली आहे. त्यात सत्तरीच्या जनतेचे नुकसान होणार आहे. आता तर सरकारने लोकांनाच जमिनींचे दाखले द्यावेत, असा आदेश काढून ६० दिवसांची मुदत दिली आहे.

ती मुदत १७ जानेवारी रोजी संपणार आहे. मुळात लोकांना मालकी हक्कच मिळालेला नाही. वन हक्क अंतर्गत जमिनी मिळालेल्या नाहीत. असे असताना सरकार लोकांकडे जमिनींचे पुरावे मागत आहे. ही निव्वळ जनतेची फसवणूक असून भूमीपुत्रांची थट्टाच चालविली आहे अशी टीका वाळपई येथे आज पत्रकार परिषदेत सत्तरी शेतकरी संघटनेने केली आहे.

सनबर्न फेस्टिव्हलला पहिल्याच दिवशी गोवा पोलिसांचा झटका; ध्वनी मर्यादा ओलांडल्याने एक स्टेज केले बंद

सनबर्न फेस्टिव्हलला गोव्यातील वागातोर येथे आज, गुरूवारपासून सुरवात झाली. पण, पहिल्याच दिवशी संध्याकाळी ध्वनी मर्यादा ओलांडल्याने पोलिसांनी कारवाई करत कार्यक्रम बंद पाडला. डीवायएसपी जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने ही कारवाई केली.

सनबर्नमध्ये आवाजाची 65 ते 75 डेसिबल मर्यादा निश्चित केली आहे. त्यासाठी प्रवेशद्वारावर एक विशेष ध्वनी मॉनिटरिंग उपकरण उभे केले आहे. त्याच्या स्क्रीनवर आवाजाची तीव्रता कळते.

मुरगाव नागरिक शिगमोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार कृष्णा साळकर

गोवा पर्यटन विभाग यांच्या सौजन्याने आयोजित मुरगाव नागरिक शिगमोत्सव समिती २०२४ च्या अध्यक्षपदी वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

समितीचे सरचिटणीस म्हणून संतोष खोर्जुवेकर तर खजिनदार म्हणून चंद्रकांत गावस यांची निवड करण्यात आली. शिगमोत्सवाची बैठक मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

तुये पाणी प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन कनेक्शन देऊ नका- आ. जीत आरोलकर

जो पर्यंत तुये येथील नवीन पाणी प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत मांद्रे मतदारसंघात व्यावसायिकांना नवीन पाणी कनेक्शन देवू नये, अशी मागणी आमदार जीत आरोलकर यांनी केली. त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना याबाबतचे निवेदन दिले.

खोर्जुवे पुलावर 2 दुचाकींची धडक; दोघे जखमी, एक जण गंभीर

खोर्जुवे येथील पुलावर दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन अपघात झाला. यात खोर्जुवे आणि नास्नोळा येथील दोघेजण जखमी झाले आहेत. त्यातील एक जण गंभीर आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वास्को कामगार खून प्रकरण; साक्षीदाराने जबाब फिरवल्याने संशयिताची निर्दोष मुक्तता

किरकोळ वादानंतर रागाच्या भरात लाकडी दंडुक्याने मारहाण केल्यामुळे वास्‍को येथे रमेश चौहान या कामगाराचा खून झाला होता. मात्र या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने आपला जबाब फिरविल्यामुळे न्यायालयाने संशयित पृथ्वी नंदलाल चौहान याची निर्दोष सुटका केली.

याबाबतचा निवाडा काल मडगाव येथील दक्षिण गोवा व सत्र न्यायालयाचे न्या. शमा जोशी यांनी दिला. लाकडी दंडुक्यावर सापडलेले रक्तगट संशयिताचे नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने या निवाड्यात नोंदविले आहे.

तिळारीचे पाणी ओव्हरफ्लो; पिलींबी परिसरात पाणीच पाणी

तिळारीचे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने सडयें पंचायत क्षेत्रातील पिलींबीं परिसरात पाणीच पाणी झाले आहे. हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. तसेच घराघरांत कचरायुक्त पाणी घुसले आहे. अचानक पाणी आल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.

शेल्डे तलावात तन्मार प्रकल्पाचा वीज खांब उभारण्यास स्थानिकांचा विरोध

कुडचडे येथील शेल्डे तलावात तन्मार प्रकल्पाचा वीज खांब उभारण्यास स्थानिक लोकांनी विरोध करून शेल्डे तळ्याजवळ धरणे आंदोलन केल्याने अखेर हा खांब दुसऱ्या जागी हलविण्यात येणार असल्याचे स्थानिक आमदार निलेश काब्राल यांनी सांगितले आहे.

माझ्याकडे पोर्तुगीज पोसपोर्ट नाही - सिक्वेरा

माझ्याकडे पोर्तुगीज पोसपोर्ट नाही, त्यामुळे चिंतेचे कारण नाही. मिकी पाशेको यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिले आहे.

रामतळे येथील एमआरएफ शेडचे बांधकाम तत्काळ थांबविण्याचे निर्देश

कोमुनिदाद प्रशासनाने हळदोणा पांचयीतला रामतळे येथील एमआरएफ शेडचे बांधकाम तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिलेत. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या २ जानेवारी २०२४ रोजी होणार. शेडच्या उभारणीविरोधात सध्या ग्रामस्थांनी आंदोलन छेडले असून स्थानिक व पंचायतीमध्ये संघर्ष सुरू आहे.

बाणस्तारी येथे दुचाकीची पादचाऱ्याला धडक

बाणस्तारी येथे दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिली यात दुचाकीवर मागे बसलेली शकिब सय्यद (24, म्हार्दोळ) गंभीर जखमी झाला आहे.

किर्लपाल पंचायत बनावट पावत्या घोटाळा चौकशीसाठी युवकाची तक्रार

किर्लपाल पंचायत मध्ये झालेल्या बनावट पावत्यामुळे झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी धारबांदोडा गट विकास अधिकाऱ्याच्या कार्यालयात प्रताप देसाई या युवकांने केली तक्रार.

नंबर प्लेटवर 'माफिया' लिहीलेल्या कारवर पणजी वाहतूक पोलिसांची कारवाई

नंबर प्लेटवर 'माफिया' असं लिहीलेल्या कारवर पणजी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. कारचा परवाना महाराष्ट्रातील आहे. वाहतूक पोलीस निरीक्षक चेतन सावलेकर यांनी ही धडक कारवाई केली.

कोणाच्या आदेशाने गोव्यात अमली पदार्थ येतायेत याचे पोलीस महासंचालकांनी उत्तर द्यावे- पाटकर

"पोर्टेबल मशीन तैनात करुन उत्तर गोवा पोलीस अधीक्षक गोव्यात अमली पदार्थ उपलब्ध असल्याचे सांगतायेत का? भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली गोवा ड्रग्ज डेस्टिनेशन होत असल्याचा हा पुरावा आहे. कोणाच्या आदेशाने गोव्यात अमली पदार्थ येतायेत याचे पोलीस महासंचालकांनी उत्तर द्यावे," असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

काँग्रेस आणि भाजप सोडता इतर पक्षांना लोकसभेत जिंकण्याची 1 टक्का सुद्धा संधी नाही - फ्रान्सिस सार्दिन

काँग्रेस आणि भाजप सोडले तर इतर पक्षांना लोकसभेत जिंकण्याची 1 टक्का सुद्धा संधी नाही. विधानसभा नव्हे तर ही लोकसभेची निवडणूक आहे हे इतर पक्षांनी लक्षात घ्यावे. लोकसभेसाठी उभे राहिलेले इतर पक्षांचे उमेदवार हे भाजपाचीच बी टीम असल्याची टीका, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केली.

कोंकणी जपण्यात तियात्रची भूमिका महत्त्वाची - मुख्यमंत्री

कोंकणी संस्कृती जपण्यात तियात्रची भूमिका महत्त्वाची असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. युवा सृजन पुरस्कार सोहळ्यात बुधवारी ते बोलत होते.

निवडणुकीच्या काळात लोकांना तियात्रांमध्ये खूप रस असतो नंतर तो कमी होतो, असेही सावंत यावेळी म्हणाले.

बांध, ताळगाव येथे कार आणि दुचाकीचा अपघात

बांध, ताळगाव येथे कार आणि दुचाकीचा अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

फोंड्यात 7 लाख रुपये किंमतीचे दागिने चोरीला

फोंड्यात महिलेच्या बॅगमधून सात लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी केल्याचे समोर आले आहे. महिला फोंड्यातून मोलेमार्गे विजापूरला जात होती. कर्नाटकच्या प्रवासी बसमध्ये अनमोड घाटात हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com