'सुंभ जळाला तरी पीळ तसाच उरतो'

पूर्वजांच्या संस्कृतीच्या वारशाचा अभिमान वाटू लागला, आणि पोर्तुगीजांच्या अन्याय- अत्याचारा विरुद्ध त्यांच्या मनात राग उत्पन्न व्हायला लागला
Goa Liberation Day

Goa Liberation Day

Dainik Gomantak

एकोणीसावे शतक हे संपूर्ण जगाच्या आधुनिकरणाच्या सर्व बाबतीतील महत्त्वाचे शतक. युरोपांत वाफेचे इंजीन व संदेश वहनाचे तारायंत्र इत्यादी महत्त्वाचे आधुनिक शोध लागून संपूर्ण मानवी जीवनाचा चेहरा मोहरा बदलून गेला. या आधुनिकीकरणात इंग्लंड आणि फ्रान्स ही राष्ट्रे युरोपांत अग्रेसर राहिली. आधुनिक वाफेचे इंजीन, तारायंत्र, रेल्वे यांच्या जोरावर संपूर्ण भारतावर इंग्रजी सत्तेची पकड मजबूत झाली. संपूर्ण भारतखंड इंग्रजांनी ताब्यात घेतल्यावर भारतातील गोव्यासह पोर्तुगीजांच्या वसाहती इंग्रजांना ताब्यात घेणे सहज शक्य होते. परंतु हुशार मुत्सद्दी इंग्रजांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आणि अर्थकारणाचा फायदा जाणून पोर्तुगीजांशी संघर्ष टाकला.

एके काळी सोळाव्या शतकात युरोपीयन देशांना संपूर्ण जगाच्या व्यापाराची द्वारे धाडसी पोर्तुगीज दर्यावर्दींनी खुली करून दिली होती. स्वतःला जगाच्या समुद्रसत्तेचे बादशहा म्हणवून घेणारे पोर्तुगाल मात्र कडवट धार्मिक धोरणामुळे एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत दयनीय अवस्थेंत पोहोचले. अठराव्या शतकात पोर्तुगीजांच्या कडवट धार्मिक धोरणामुळे मराठा राजसत्तेने वसई मोहिमेद्वारे पोर्तुगीजांच्या राजकीय आणि धार्मिक सत्तेचा कणाच मोडून टाकला होता. तरीही सुंभ जळाला तरी पीळ तसाच उरतो या म्हणीप्रमाणे पोर्तुगीजांनी गोव्यातील जुन्या काबिजादींत म्हणजे बार्देश, तिसवाडी आणि साष्टीत आपले धार्मिक धोरण पूर्वीप्रमाणेच चालू ठेवले होते.

एकोणिसावे शतक उजाडेपर्यंत संपूर्ण भारत इंग्रजांच्या अधीन झाला. इंग्रज पोर्तुगीजांप्रमाणेच धाडसी दर्यावर्दी होते, पण पोर्तुगीजांप्रमाणे कडवट धार्मिक नव्हते. इंग्रज चलाख, मुत्सद्दी आणि डावपेचाला महत्त्व देणारे होते. या गुणामुळेच इंग्रजांच्या साम्राज्यावरील सूर्य कधीच मावळत नव्हता.

<div class="paragraphs"><p>Goa Liberation Day </p></div>
'गोव्याचा खरा विकास 2014 पासून झाला': प्रमोद सावंत

इंग्रजांच्या भारतातील प्रभावामुळे पोर्तुगीजांना (Portuguese) गोव्यातील आपल्या धार्मिक धोरणाला नाईलाजाने आणि अगतिकपणे बदलावे लागले. एकोणिसाव्या शतकात पोर्तुगीजांनी इंग्रजांच्या सहाय्याने रेल्वे, तारायंत्र इत्यादी आधुनिक सुविधा गोव्यात सुरू केल्या. मुंबई शहर इंग्रजांच्या व्यापाराचे आणि औद्योगिकरणाचे मुख्यालय बनले. इंग्रजांच्या व्यापारी कंपन्या आणि भारतातील पारशी आणि गुजराती व्यापाऱ्यांचा हा सुगीचा काळ होता. या सर्व व्यापाऱ्यांना त्याच्या कार्यालयात काम करण्यासाठी इंग्रजी भाषेची किंवा रोमन लिपीची तोंडओळख असलेल्या स्थानिक कारकुनांची प्रचंड गरज होती. ही गरज भागवली गेली ती पोर्तुगीजांच्या राज्यातून अर्थांत गोव्यातून.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला फार मोठ्या प्रमाणात गोव्यातील कॅथोलिक तरुण फक्त रोमन लिपीच्या शिक्षणाच्या पात्रतेमुळे कामासाठी गोव्यातून (goa) पहिल्यांदा बाहेर पडला. भारतातील मुंबई, कराची, कलकत्ता या बंदराच्या शहरात व्यापारी पेढ्यांवर कामाला लागला. पुढे आफ्रिका, अमेरिका खंड, ऑस्ट्रेलिया असे जेथे कोठे युरोपीयन इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, स्पेनीश लोकांच्या वसाहती होत्या तेथे गोवेकर कॅथोलिक पोहचला. परंतु भारतीय गोवेकर म्हणून नव्हे तर चक्क राजाहून राजनिष्ठ पोर्तुगीज बनून.

जुन्या काबीजादींवर पोर्तुगीजांनी ताबा मिळवून झाला होता. पोर्तुगीजांनी इथे केलेल्या धार्मिक जुलुम जबरदस्तीने येथील स्थानिक जनतेच्या मनावर पोर्तुगीजांबद्दल जबरदस्त भयगंड निर्माण झाला होता. पोर्तुगीजांनी गोव्यातील स्थानिक हिंदूंना सोळाव्या शतकात जबरदस्तीने धर्मांतरित केले तेव्हा हिंदू त्यांच्या जातीसह धर्मांतरित झाले. धर्मांतरितांमध्ये पूर्वीच्या जातीचे वर्ग तसेच राहिले. उच्चवर्णीय कॅथोलिक पोर्तुगीजांच्या प्रशासनात, लष्करात नोकऱ्या करू लागले. हा समाज नखशिखांत पोर्तुगीज होण्यात धन्यता मानू लागला.

अशाच समाजाचे नवशिक्षित तरुण शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने गोव्याबाहेर पडू लागले. एकोणिसाव्या शतकात फ्रान्स हा देश नवविचार, आधुनिक शिक्षण, कला या सर्वांचे माहेरघर म्हणून जगभरात लौकिक बाळगून होता. फ्रेंच भाषा अवगत करून फ्रेंच साहित्य, कला यांचा अभ्यास असणे हे उच्चवर्गीय युरोपीयनांमध्ये (Europe) फार प्रतिष्ठेच असे. त्यामुळेच गोव्यातील उच्चवर्गातील कॅथोलिक तरुणांचा शिक्षणासाठी फ्रान्सकडे ओढा अधिक असे. त्याशिवाय युरोपातील ब्रिटन, जर्मनी या देशामध्येही हे तरुण शिक्षणासाठी जाऊ लागले.

<div class="paragraphs"><p>Goa Liberation Day </p></div>
हे महान देशभक्त कुटुंब आणि त्यांचे दोन शूर सैनिक आपल्याला आठवतात का?

गोव्यातून युरोपात शिक्षणासाठी जाणारे हे नवतरुण येथील भयगंडातून निर्माण झालेल्या संस्कारांमुळे नखशिखान्त पोर्तुगीज बनून जात. परंतु युरोपीयन विद्यापीठांत त्यांच्या रंग-रूपावरून त्यांना तेथील युरोपीयन भारतीय म्हणूनच संबोधत. तेव्हा हे तरुण आपली ओळख पोर्तुगीज नागरिक म्हणूनच करून देत. तेव्हा मात्र तेथील जाणकार मंडळी तुम्ही पोर्तुगीज नसून तुम्ही भारतीय आहात, पोर्तुगीजांच्या रांगड्या संस्कृतीपेक्षा (Culture) भारतीय साहित्य कला, भाषा, अध्यात्म इत्यादी सांस्कृतिक गोष्टी किती तरी महान आहेत; अशी जाणीव करून देत.

गोव्यातील उच्चवर्गीय पोर्तुगीजधार्जिण्या वातावरणात वाढलेल्या गोव्यातील या नवतरुणांना युरोपातील मोकळ्या विचारांच्या वातावरणामुळे आपल्या भारतीयत्वाचा साक्षात्कार होऊ लागला. आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीच्या वारशाचा अभिमान वाटू लागला, आणि पोर्तुगीजांच्या अन्याय- अत्याचारा विरुद्ध त्यांच्या मनात राग उत्पन्न व्हायला लागला.

मिनेझीस ब्रागांझा, टी. बी. कुन्हा, तेलु माश्कारेन्यश, डॉ ज्युलियांव मिनेझीस, आल्फ्रेड आफांसो या अग्रणी नावांखेरीज फेर्नांदू द कॉश्ता, आंतोनियू नोरान्यु, आयरिश ग्रासियश अशा गोमंतकीय नवयुवकांना भारतीयत्वाने झपाटून टाकले. यातील तेलू माश्कारेन्यश यानी आपले उपेंद्रराज असे नामकरण केले तर फेर्नांदू द कॉश्त यानी राम गोखले असे नाव स्वीकारले. माश्कारेन्यश यांचे ज्वलंत राष्ट्रीय विचार त्यांच्या लेखणीतून दिसू लागले. 'ख्रिश्चन समाजाच्या मनावर ठसवण्यात येणारी खोटी मूल्ये नष्ट करायला हवीत. ते आम्हाला जो ख्राइस्टचा धर्म शिकवतात तो आशिया खंडात जन्माला आला. युरोपने त्याचे सर्व अधिकार आपणाकडे घेतले आहेत, ते धर्माच्या नावाने रानटी कृत्य करण्यासाठीच.

हे पोर्तुगीज लोक हिंदुस्थानात पोहचण्यापूर्वी येथे हा धर्म नांदत होता. पोर्तुगाल हा आमचा देश असून आम्ही पोर्तुगीज आहोत असे आम्हाला शिकवले जात आहे मात्र हिंदुस्थान आमची खरी व एकमेव मातृभूमी आहे....' अशा अनेक राष्ट्रीय विचारांची पेरणी हे नवतरुण गोव्याच्या शिक्षित समाजात करू लागले. टी.बी. कुन्हासारख्या राष्ट्रीय नेत्यांचे भारतीयत्वाबद्दलचे विचार हे असेच जळजळीत आणि स्फोटक म्हणून प्रसिद्ध आहेत.

भारतीयत्वाने भारावलेल्या या सर्व नवतरुणांना पोर्तुगीज शासनाच्या न्यायव्यवस्थेने कडक शिक्षा ठोठावल्या, परंतु धर्मव्यवस्थेने त्यांच्या मरणानंतरही त्यांचा सूड उगवला. मिनेझीस ब्रागांझांच्या मुत्युनंतर त्यांच्या चांदर गावच्या दफनभूमीत त्यांच्या पार्थिवाचे दफन करण्यास धर्माधिकाऱ्यांनी नकार दिला तर टी. बी. कुन्हासारख्या विद्वान राष्ट्रवादी नेत्याला मुंबईत मृत्यू आला. तेव्हा मुंबईतील कॅथोलिक धर्माधिकाऱ्यांनी कॅथोलिक चर्चच्या दफनभूमीत अंत्यसंस्कार नाकारले. पोर्तुगीज धर्मसंस्थेने या भारतीयत्त्वाचा साक्षात्कार आलेल्या आपल्याच धर्मबांधवांवर त्यांच्या मृत्युनंतरही सूड उगवून ख्रिस्ताच्या दया व करुणा या तत्त्वांना काळिमा फासली. अशा अगणित स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानामुळे गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला व भारतात विलीन झाला.

गोव्यातील उच्चवर्गीय पोर्तुगीजधार्जिण्या वातावरणात वाढलेल्या गोव्यातील नवतरुणांना युरोपातील मोकळ्या विचारांच्या वातावरणामुळे आपल्या भारतीयत्वाचा साक्षात्कार होऊ लागला. आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीच्या वारशाचा अभिमान वाटू लागला आणि पोर्तुगीजांच्या अन्याय- अत्याचाराविरुद्ध त्यांच्या मनात राग उत्पन्न व्हायला लागला.

भारतीयत्वाचा साक्षात्कार

- सचिन मदगे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com