Kala Academy Goa: सहनशक्तीची परीक्षा घेणारे ‘दोन फुल आनी शीतकडी’

Kala Academy Goa: सर्व आघाड्यांवर अपेक्षाभंग: नाट्यरसिकांची स्थिती ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’
Drama
Drama Dainik Gomantak

Kala Academy Goa: हौशी रंगभूमीवर चपखलपणे बसू शकणारे हे नाटक स्पर्धात्मक रंगभूमीवर पाहून ‘मेरे ॲंगने में तुम्हारा क्या काम है’ यातला प्रकार वाटला. काल सादर झालेले ‘निमणो पेलो’ या नाटकाने आपले करमणुकीचे उद्दिष्ट तरी बऱ्याच अंशी जसे साध्य केले होते.

तसेही या नाटकाच्या बाबतीत घडलेले दिसले नाही. लेखक वसंत सावंत यांचे या स्पर्धेतील हे चौथे नाटक. पहिली तीन नाटके त्यांनी अनुवादित केली होती, तर आजचे नाटक ही त्यांची स्वतंत्र संहिता होती.

मात्र ही संहिता त्यांनी राज्यात होणाऱ्या उत्सवातील नाटकाचे प्रयोग डोळ्यांसमोर ठेवून लिहिली असावी, असे वाटले. नाटकाची सुरुवात होती ती व्यवसायाने बिल्डर असलेला जगन एका बाजूला व त्याची बायको सरला दुसऱ्या बाजूला बोलतात या दृश्याने.

नंतर हाच जगन फोनवरून फुलवा नावाच्या एका मुलीला डान्स ऑडिशन करता आपल्या बंगल्यात रात्री अकरा वाजता बोलवतो. नंतर एन्ट्री होते चंद्रू व त्याच्या बायकोची. चंद्रू हा एक चोर असतो.

आणि आता आपल्या आयुष्यातील शेवटची चोरी करण्याकरता तो जगनच्या बंगल्यावर जाणार असतो. त्याला जगन ने या बंगल्यात बराच पैसा ठेवला आहे हे माहित असते. आणि त्यामुळे त्याने हा प्लॅन रचलेला असतो. त्याची बायको वासंतीही त्याला याबाबतीत प्रोत्साहन देत असते.

Drama
Goa Electricity: डबल इंजिन सरकारमुळेच सत्तरीच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना

त्यांच्या या चोरीच्या मिशनचे नाव असते ‘दोन फुल आणि शीतकडी’. अन तेच नाटकाचे नाव ठरते. ठरल्याप्रमाणे चंद्रू जगनच्या बंगल्यात शिरतो. तिथे जगन ने बोलावल्याप्रमाणे फुलवा येते. नंतर जगनही येतो.

जगन ची बायको सरलाही दाखल होते. तिला आपले फुलवा बरोबरचे संबंध कळू नये म्हणून जगन चंद्रूला २५ लाख रुपये देतो. तेवढ्यात सरलाचा प्रियकर अनिकेत येतो. तो नंतर फुलवाचाही प्रियकर असल्याचे कळते.

आपल्या अफेयरची माहिती जगनला कळू नये म्हणून सरला चंद्रूला आपले दागिने देऊ पाहते. जगन ने चोरीची तक्रार दिलेली असल्यामुळे एक बोबडे बोलणारा हवालदारही येतो. त्याच्या बोलण्यातून विनोद निर्मितीचे प्रयत्न केले जातात.

शेवटी मग मोहिनी नावाची एक तरुणी येते. आणि तिचं अनिकेत व फुलवाचे जगनच्या घरात येऊन त्याला लुटण्याचे कारस्थान असल्याचे ‘रहस्य’ उघडे झाल्यानंतर ‘ऑल इज वेल’ असल्याचे दाखवित नाटक एकदाचे संपते.

ही कथा म्हणजे ‘ट ला ट’ जोडणाऱ्या प्रकारातली. त्यात परत कथेचा जीव लहान असूनही ती अडीच तासापर्यंत ताणल्यामुळे प्रयोग अधिकच फरपटत गेला आहे.

पात्रांचे उगाच इकडून तिकडे जाणे, मध्ये मध्ये मोठ्याने ओरडणे, चंद्रू ने परत परत आपला मागचा इतिहास उकळणे यामुळे नाटकाला गतीच प्राप्त होऊ शकली नाही.

कोण कधी येतो कोण कधी जातो, हेच कळत नव्हते. आता अशा नाटकात अभिनयाबद्दल लिहिणार तरी काय? आवर्जून उल्लेख करण्यासारखा असा कोणाचाही अभिनय आढळला नाही. थोडाफार अपवाद म्हणून चंद्रूच्या भूमिकेतील गोपाळ भांगी यांचे नाव घ्यावे लागेल.

संपूर्ण नाटक त्यांच्यावरच असल्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. आणि काही प्रसंगात विनोदाचे योग्य टायमिंग साधून त्यांनी ही जबाबदारी बऱ्यापैकी निभावली, असे म्हणता येईल. पण दिग्दर्शक म्हणून मात्र त्यांना आपली जबाबदारी निभावता आली नाही.

पात्रावर नियंत्रण ठेवणे त्यांना न जमल्यामुळे नाटकाचा प्रवास दिशाहीन झाला. तांत्रिक बाबतीत ही नाटक कमी पडले. नेपथ्यात तर काहीच नाविन्य नव्हते.

ध्वनी संकलन, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत सगळे काही एकदम सामान्य वाटत होते. एकंदरीत सर्वच आघाडीवर अपेक्षाभंग केलेले हे नाटक अनेक प्रश्न उभे करून गेले एवढे नक्की.

स्पर्धेच्या दर्जाबाबत चर्चा

प्रस्तुत नाटक स्पर्धेच्या दृष्टीने अगदी बाळबोध वळणाचे ठरल्यामुळे स्पर्धेच्या दर्जाबाबत मध्यंतरात कला मंदिरात चर्चा सुरू होती.

पूर्वी कला अकादमीच्या मराठी ‘अ’ गट नाट्य स्पर्धेत एखाद्या संस्थेला ३५ पेक्षा कमी गुण पडल्यास त्या संस्थेला पुढील तीन वर्षे ‘अ’ गट नाट्य स्पर्धेत भाग घेऊ दिले जात नसे, असे एका ज्येष्ठ रंगकर्मीने सांगितले.

याच धर्तीवर कोकणी नाट्य स्पर्धेतही कला अकादमीने असा एखादा निर्णय घ्यायला हवा असे त्यांचे म्हणणे पडले. पण आता नाट्य क्षेत्रातही क्रिकेटसारखी ‘आयपीएल सिस्टम’ प्रवेश करायला लागली आहे.

कोणतीही संस्था कोणत्याही कलाकाराला घेऊन नाटक सादर करायला लागल्यामुळे आजचे कलाकार पूर्वीसारखे एखाद्या संस्थेशी बांधील असतातच असे नाही.

त्यामुळे नाटक दर्जाहीन ठरल्यास संस्थेला स्पर्धेतून काही वर्षाकरता बाद करूनही विशेष काही साध्य होईल, असे वाटत नाही.

तरीही स्पर्धेची लाज राखण्याकरता व दर्जा अबाधित ठेवण्याकरता कला अकादमीने राज्यातील ज्येष्ठ रंगकर्मीना विश्वासात घेऊन याबाबतीत योग्य निर्णय घ्यायला हवा एवढे मात्र निश्चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com