

Shilpa Shetty Goa Club Controversy : 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर गोवा सरकारने राज्यातील बेकायदेशीर क्लब्स आणि हॉटेलवर मोठी कारवाई सुरू केली. मात्र, या कारवाईदरम्यान बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या 'बास्टियन रिव्हिएरा' या नवीन क्लबला मिळणाऱ्या कथित सवलतीवरून मोठा वाद निर्माण झालाय.
मोरजी येथील समुद्रकिनाऱ्यावर आणि 'सीआरझेड' (CRZ) क्षेत्रात असूनही या क्लबवर अद्याप कोणतीही कठोर कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला जातोय.
गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने ७ ऑक्टोबर रोजी बास्टियन रिव्हिएराच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत पाडकामाचे आदेश दिले होते. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या आदेशाची अंमलबजावणी उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून झालीच नाही.
उलट, काही दिवसांनंतर प्राधिकरणानेच 'प्रशासकीय त्रुटी' असल्याचे सांगत हा आदेश मागे घेतला. संबंधित पक्षाला नोटिसा वेळेत मिळाल्या नाहीत, असे कारण देऊन आता ८ जानेवारी २०२६ रोजी नवी सुनावणी ठेवली आहे. यामुळे सरकार सेलिब्रिटींच्या क्लबला पाठिशी घालत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी करत आहेत.
'इंडिया टुडे टीव्ही'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये बास्टियनच्या व्यवस्थापकाने आणि सुरक्षा रक्षकाने केलेली विधाने धक्कादायक आहेत. "गोव्यातील १०,००० रेस्टॉरंट्स बेकायदेशीर आहेत, मग आमचे नाव आल्यावर काय फरक पडतो? शिल्पा शेट्टी मालक असल्याने आमचे काम सुरूच राहील," असे विधान व्यवस्थापकाने केले.
तर सुरक्षा रक्षकाने थेट पोलीस आणि पंचायतीवर लाचखोरीचे आरोप केले आहेत. "हे मोठे लोक आहेत, मुंबईचे आहेत, त्यामुळे त्यांना परवानग्या मिळतात. गोमंतकीय हे करू शकत नाहीत," असे त्याचे विधान प्रशासकीय भ्रष्टाचारावर बोट ठेवणारे आहे.
दुसरीकडे, बास्टियनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत बिंद्रा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "आम्ही सर्व नियम पाळून आणि कायदेशीर परवानग्या घेऊनच बांधकाम केले आहे. आमच्याकडे अग्निशमन दल आणि प्रदूषणाबाबतचे सर्व 'एनओसी' आहेत.
पाडकामाचे आदेश मागे घेण्यात आले कारण आम्ही नियमांचे पालन केले आहे," असा दावा त्यांनी केला. तसेच मोरजीमध्ये तयार होत असलेली जेटी ही 'कॅप्टन ऑफ पोर्ट्स'च्या परवानगीनेच बांधली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.