सध्या गोव्यात ‘आवो, जावो घर तुम्हारा’ अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधी निद्रिस्त आणि प्रशासन सुस्त असल्याने कोणीही येतो, इथल्या खुल्या जागेवर घर बांधतो आणि सुखेनैव राहतो. याचे उदाहरण म्हणजे म्हापशात हटविलेली बेकायदा अतिक्रमणे. हे अतिक्रमण करणारा संशयित आरोपी सिद्दीकी ऊर्फ सुलेमान मोहम्मद खान हा अट्टल गुन्हेगार असून अनेक मालमत्ता फसवणुकीच्या प्रकारात तसेच इतर काही गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. सध्या तो फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. सुलेमान याच्यावर काही ठिकाणच्या पोलिस स्थानकांमध्ये मालमत्ता फसवणुकीचे गुन्हे प्रलंबित आहेत. त्यामुळे गुन्हेगार येथे येऊन गुन्हे करतात, बेकायदा घरे बांधून राहतात, तोपर्यंत प्रशासन काय करते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ∙∙∙
सुभाष वेलिंगकर यांचा निषेध करण्यासाठी परवा मडगाव येथे झालेल्या आंदोलनात सामान्यांना वेठीस धरण्यात आले. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सोसावा लागला. या घटनेशी साधारण साम्य दाखवणारी अशीच घटना १९८६ साली घडली होती. त्यावेळी कोकणी - मराठी वादात मडगाव पेटले होते. अनेक मराठीवाद्यांना त्याची झळ भोगावी लागली होती आणि अशावेळी मदतीला धावून आले होते ते फोंड्यातून प्रथमच म. गो. पक्षातून निवडून आलेले आमदार रवी नाईक. त्यांच्या मडगावला झालेल्या आगमनामुळे शहरातील वातावरण तणावमुक्त झाले होते. परवा फोंड्यात अनेकांनी या जुन्या घटनेची आठवण काढली. नाहीतरी राज्यात कोठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडली की लोकांना हमखास रवींची आठवण यायला लागतेच नाही का? ∙∙∙
कुंकळ्ळीचे आमदार जेव्हा जेव्हा कुंकळ्ळीत येतात, तेव्हा तेव्हा कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या प्रदूषणावर पोटतिडकीने बोलतात. सरकारवर तोफही डागतात. सरकार प्रदूषणकारी कारखानदारांना मदत करीत असल्याचे आरोप करतात. आपण प्रदूषणाच्या विरोधात न्यायालयात जाणार, हरित लवादाकडे जाणार असे इशारे देतात. एवढेच नव्हे, तर प्रदूषण थांबले नाही, तर आपण जनतेला घेऊन रस्त्यावर उतरणार असे इशारेही देतात. काल युरी एका फुटबॉल मैदानाच्या भूमिपूजन कार्यक्रमास आले होते, तेथेही त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. यावेळी फक्त एक वाक्य अधिक जोडले, जर प्रदूषणविरोधी आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली, तर आम्हाला जबाबदार धरू नका. युरीबाब आता किती इशारे देणार? आपण इशारे देत रहा, प्रदूषणात मात्र भरडत राहणार आम जनता. ∙∙∙
मागच्या शनिवारी सुभाष वेलिंगकर यांना अटक करा ही मागणी घेऊन लोक रस्त्यावर आल्यानंतर फातोर्डा पोलिसांनी प्रतिमा कुतिन्हो आणि सावियो कुतिन्हो या दोन नेत्यांसह सुमारे ५०० जणांवर गुन्हा नोंद केला असून आता गुन्हा नोंद झालेल्यांच्या नावाची यादीही तयार केली जात आहे. जे लोक रस्त्यावर आले होते, त्यात भाजपचे मडगावचे नगरसेवक कामिल बार्रेटो आणि मिलाग्रीन डायस याही होत्या. आता हे भाजपचे नगरसेवक असल्यामुळे पोलिस त्यांना आरोपीच्या यादीतून वगळतात की त्यांचीही नावे या ५०० कार्यकर्त्यांमध्ये समाविष्ट करतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. काहीजण तर पोलिस स्थानकात जाऊन या यादीत कुणा कुणाची नावे आहेत हेही पाहू लागले आहेत. ∙∙∙
गोवा पोलिसात अधिक सतर्कता यावी यासाठी पोलिस महासंचालकांनी मोठ्या प्रमाणावर बदल्या सुरू केल्या. त्यामुळे कित्येकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. मडगाव पोलिस स्थानकात काहीजण १५ ते २० वर्षे एकाच जागी ठाण मांडून असल्याने लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली असताना कोलवा पोलिस स्थानकावर एक शिपाई मागची आठ वर्षे तिथेच चिकटून असल्याचे दिसून आले आहे. आत्ताच्या बदल्यांत या पोलिस शिपायाची बदली सांगेमध्ये झाली तरी या शिपायावर वरिष्ठांची भलतीच मर्जी असल्यामुळे त्याला अजून कोलव्यातून मोकळे केले जात नाही. साहेबांची माया एकत्र करण्याचे काम म्हणे हाच शिपाई करतो. त्यामुळेच त्याला हलवले जात नाही असे सांगितले जाते. अशी कोणती बरे मडगाव आणि कोलवा पोलिस स्थानकात गुळाची ढेप आहे, ज्यामुळे हे मुंगळे तिथेच चिकटून राहू पाहात आहेत? ∙∙∙
सेंट झेवियर यांच्या अवशेषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांच्या दडपणामुळे पोलिसांनी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी शोध मोहीम राबवली. कायदेशीर सर्व प्रक्रिया करत नोटीस बजावली व ते चौकशीस आले नसल्याने प्रक्रियेनुसार त्यांच्या अटकेसाठी न्यायालयाला अर्ज केला नाही. त्यामुळे पोलिसांनी जाणूनबुजून या तपासकामात त्यांना संधी मिळण्यासाठी चूक केली का असाच प्रश्न निर्माण होतो. त्यांना अटकेसाठी पोलिस सक्रिय होते असे जरी दाखवण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात त्यांना अटक करण्यास पोलिस राजी होते का याबाबतच संशय आहे. उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर वेलिंगकर कोणताही वेळ न दवडता तत्परतेने पोलिसांत दाखल झाले. वरिष्ठ पोलिसांनीही ते चौकशीला उत्तरे देऊन सहकार्य करत असल्याचे सांगितले आहे. आज दुसऱ्यांदा चौकशीस बोलावल्यानंतर ते पत्रकारांना सामोरे गेले. पोलिसांना सहकार्य करत आहे असे सांगून कोणतेही वक्तव्य केले नाही. पोलिसांच्या सुरामध्ये वेलिंगकर यांनीही सूर मिळवून तपासकामात सहकार्य करतोय असे ठामपणे सांगितले. ∙∙∙
‘जेव्हा पाणी डोक्याच्या वर पोहोचते, तेव्हा आपल्याला कळायला हवे की आता मार्ग बदलण्याची वेळ आली आहे.’ या वाक्याने कुंकळ्ळीतील एका दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या दहावीच्या स्वाध्यायाची सुरवात केली. या विद्यार्थ्याने आपल्या गावाच्या पर्यावरण व प्रदूषणावर छान कार्यकलाप तयार केला आहे म्हणे. यात त्याने लिहिले आहे की, ‘माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सर व माननीय आमदार युरी आलेमाव सर, आपण आमच्या यातना एकदा तरी अनुभवा. मुख्यमंत्री सर आपण एक रात्र कुंकळ्ळीत राहून पाहा, बघा कसला उग्र वास आम्ही नेहमी सहन करतो. युरी सर आपण आमदार बनण्यासाठी कुंकळळीत घर घेतले होते. आपण तेथे रहात नाही. कृपा करा आणि एक रात्र तुमच्याच मतदारसंघातील घरात काढून दाखवा आणि शक्य असल्यास त्या पर्यावरणमंत्र्यांना, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांना व मासळी कारखानदारांनाही सोबत घ्या. कृपा करा आणि एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावाच... आता या विद्यार्थ्यांचे बोल मुख्यमंत्री व आमदाराकडे कोण पोचविणार? आम्ही म्हटले ‘भिवापाची गरज ना, ‘खरी कुजबुज’ आहे ना’! ∙∙∙
मडगाव नगरपालिकेत गहाळ होणाऱ्या फाइलींवर लिहावयाचे झाले, तर ती एक दीर्घकथा होईल असे त्या प्रकाराची झळ बसलेले सांगतात. मध्यंतरी हे प्रकार टाळण्यासाठी कोणा मुख्याधिकाऱ्याने तेथे फाईल ट्रॅकींग व्यवस्थाही लागू केली होती, पण कर्मचारी इतके चलाख, की त्यांनी त्यावरही उतारा शोधून काढला व त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या फाइलीही तेथे गहाळ होत आहेत. या विषयाची आठवण होण्याचे कारण म्हणजे नगराध्यक्ष दामू यांच्या वाढदिवशी केक कापताना मडगावच्या बाबांनी यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही म्हणून दिलेला इशारा. बाबा गेली २५-३० वर्षे मडगावचे प्रतिनिधित्व करतात व विशेष म्हणजे पालिकाही त्यांच्याच ताब्यात आहे. त्यांना या फाइली गहाळ होण्याच्या प्रकरणाची पुरेपूर माहिती असायला हवी होती, पण आजवर ते त्याबाबत कधीच बोललेले वा त्यांनी नाराजी व्यक्त केलेली दिसून आले नाही. मग आत्ताच त्यांनी हा इशारा देण्याचे कारण काय? अशी चर्चा नगरपालिका परिसरात सुरू आहे. खुद्द पालिका कर्मचारीच त्याबाबत अचंबित झालेले आहेत. केवळ फाईल गहाळ होणेच नव्हे, तर मडगाव पालिकेचे असे अनेक किस्से आहेत. फेस्त फेरीतील सोपो वसुलीची लाखोंची रक्कम घेऊन बेपत्ता झालेला कारकून हा त्यातीलच एक किस्सा आहे . बाबा त्याबाबत गप्प का असा सवालही मडगावात केला जात आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.