Governor P.S. Sridharan Pillai अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय आणि महिलांना राजकीय आरक्षण देण्यासाठी राज्यात ताबडतोब सर्वेक्षण करावे. तीन महिन्यांत असे सर्वेक्षण करणे शक्य आहे.
त्याशिवाय राज्यातील धार्मिक सलोखा जपण्यासाठी पावले टाकण्याची सूचना सरकारला करावी, अशी मागणी करणारे निवेदन विरोधी आमदारांनी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी (ता.३) राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांना सादर केले. याविषयावर आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू, असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत आमदार एल्टन डिकॉस्ता, वीरेश बोरकर, क्रुझ सिल्वा, व्हेन्झी व्हिएगस, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर, शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत आदी होते.
राज्यपालांशी केलेल्या चर्चेवेळी धार्मिक सलोखा वारंवार धोक्यात आणला जात असल्याचा मुद्दा होता. निवेदनातही त्याविषयी सविस्तरपणे लिहिले आहे असे सांगून आलेमाव म्हणाले की, निवडणूक जवळ आल्यावर असे मुद्दे समोर येतात.
आता मात्र सर्व मर्यादा पार केल्यात जात आहेत. असे करणाऱ्या प्रवृत्ती विधानसभा संकुलात दिसून आल्या होत्या. केवळ काळे कोटवाले नव्हेत तर अशा प्रवृत्तीही तेथे होत्या, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे.
राज्यपालांनी अशा प्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी सरकारला सूचना करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. त्याला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सरदेसाईंची अनुपस्थिती
1 संयुक्त विरोधी पक्षांच्या या शिष्टमंडळात गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांचा समावेश का नाही, त्यांना या राज्यपाल भेटीची कल्पनाच दिली गेली नव्हती का, याकडे पत्रकारांनी आलेमाव यांचे लक्ष वेधले असता व्हेन्झी व्हिएगस यांनी सर्वजण एकत्र असल्याचा दावा केला.
2 आलेमाव म्हणाले, ही वेळ सर्वांनी एकत्र येण्याची आहे. सर्वांनी एकत्र येण्यातच भले आहे, हे सर्व विरोधी पक्षांना समजले आहे. म्हणून सारेजण आज एकत्र आले आहेत. मात्र, अखेरपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही सरदेसाई यांना या भेटीची कल्पना दिली होती किंवा नाही याचे सरळ उत्तर दिले नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.