Ganesh Idol Making In Goa: पर्यावरणपूरक मूर्तींना प्रोत्साहन! भक्तांची वाढती मागणी

नैसर्गिक रंग : म्हापशातील सुहास जोशी जपतात मूर्तीतील देवपण
Ganesh Idol
Ganesh Idol Dainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Idol Making In Goa अलीकडच्या काळात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करण्याचा ट्रेंड वाढत आहे. कारण, प्रदूषणाच्या दुष्परिणामांची जाणीव आता नागरिकांना हळूहळू होऊ लागली असून घरगुती मूर्तींसाठी भाविक सध्या पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) श्रींच्या मूर्तींकडे वळत आहेत.

अशातच, म्हापशातील मूर्तीकलाकार तथा गोवा पोलिस खात्यात पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले सुहास जोशी यांनीही घरगुती ‘इको-फ्रेंडली’ मूर्तींचे वेगळेपण जपले आहे.

मागील पन्नास वर्षे अन्साभाट-म्हापसा येथील सुहास जोशींच्या कुटुंबीयांचा गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी आजवर कधीच पीओपी मूर्तींना प्रोत्साहन दिलेले नाही. ते नेहमीच चिकण-शाडू मातीच्या मूर्ती बनवतात.

तर, गेल्या चार वर्षांपासून जोशी यांनी पूर्णतः ‘इको-फ्रेंडली’ मूर्तींवर भर दिला आहे. ही मूर्ती सजविण्यास भात, गवत, हळद तसेच विविध कडधान्ये तसेच वॉटर कलरचा वापर होतो.

स्व. लक्ष्मण जोशी यांची चित्रशाळा गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत आहे. लक्ष्मण जोशी यांच्या निधनानंतर आता सुहास जोशी हे आपला वडिलोपार्जित गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय सांभाळत आहेत.

त्यांना देवेंद्र, अरविंद या बंधूंचे तसेच मित्रपरिवारांचे सहकार्य लाभते. गणेशोत्सवाच्या काळात सुहास हे महिनाभर रजा टाकून या व्यवसायाकडे लक्ष देतात. सकाळी ९ ते रात्री १ वाजेपर्यंत त्यांचे मूर्ती बनविण्याचे काम चालते. जवळपास दीडशे गणेशमूर्ती ते साकारतात.

आपल्या व्यवसायाविषयी सुहास जोशी म्हणाले की, आम्ही फक्त पर्यावरणपूरकच मूर्ती बनवतो. यासाठी चिकण व शाडूच्या मातीचाच वापर करतो. तर रंगकामासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करतो. तर मागील पाच वर्षांपासून इको-फ्रेंडली हीच संकल्पना जनमानसांत रूढ होत गेल्यापासून आम्ही त्या मूर्तींवर अधिक भर दिलाय.

मूर्तीच्या नक्षीकामापासून रंगकाम हे नैसर्गिक रंग म्हणजे हळद-कुंकू, वॉटर कलरचे असते. तर सजावट ही तांदूळ, रवा, गहू, डाळ, मूग अशा कडधान्यांची असते. ही इको फ्रेंडली मूर्ती बनविण्याची संकल्पना मांद्रे येथील संकेत मांद्रेकर यांच्याकडून मिळाल्याचे सुहास जोशी सांगतात.

सबसिडीत वाढ करण्याची मागणी

महागाई वाढल्याने सरकारने मूर्तीकलाकारांच्या सबसिडीत वाढ करावी. मूर्तीमागे किमान तीनशे ते पाचशे रुपये मानधन मिळावे. तसेच सर्व मूर्तीकलाकारांना मातीचे मिश्रण करण्यासाठी मोल्डिंग मशीन उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी स्थानिक मूर्तीकलाकारांनी सरकारकडे केली आहे.

सजावटीत घरगुती साहित्याचा वापर

इको फ्रेंडली मूर्तींची खासियत म्हणजे बाप्पाचे आसन, फेटा, सोवळे, झालर, कंबरपट्टा, श्रींसमोरील उंदीर आदींच्या सजावटीस घरगुती साहित्याचा वापर होतो. यात ऑईल पेंटचा वापर केला जात नाही. या मूर्तींना सत्तरी, काणकोण तालुक्यापासून महाराष्ट्रामध्येही मागणी असते.

Ganesh Idol
Goa Agriculture Department: डिचोलीत 25 हेक्टर भातशेती पाण्यात ! शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी अर्ज

मूर्तींचे पाण्यात लवकर विघटन

या मूर्ती दोन फुटांपासून सहा फुटापर्यंत असतात. त्या तयार करण्यासाठी चिकण-शाडूच्या मातीचा वापर होतो. मूर्तीसाठी कागदाचा लगदा, मेथी पावडर, शाबू-रताळ्याची खळ, खायचा डिंक व आयुर्वेदिक रंग यांचाच वापर होतो. या मूर्ती लवकर पाण्यात विरघळतात. विशेष म्हणजे, या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती पूर्णपणे बनविण्यास पाच-सहा दिवस लागतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com