Goa Diwali 2022: मातीपासून तयार केलेल्या पणत्या बनविण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. पणती तयार करण्यासाठी माती तुडवावी लागते, त्यानंतर हाताने किंवा चाकाच्या साहाय्याने या पणत्या बनवून त्या भट्टीत घालून भाजाव्या लागतात. त्यावर रंगरंगोटी करून नंतर त्या बाजारात विकाव्या लागतात.
दरम्यान, तेव्हा कुठे घर प्रकाशमय होते. अशा प्रकारचे काबाड-कष्ट करून आजही आपला परंपरागत व्यवसाय अनेक कुंभार समाजातील नागरिक जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैकीच एक परशुराम कुंभार हा कारागिर आहे.
दीपावली हा प्रकाशाचा उत्सव. अंधाराकडून प्रकाशाकडे मार्गक्रमण करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा प्रदान करणारा सण. दीपावली म्हटले की आकाशकंदील, पणत्या, मेणबत्त्या, समयी आदी लावून आपले घर प्रकाशमय करणे ही आपली परंपरा. ज्यावेळी आपण परंपरा असे संबोधतो, त्यावेळी दीपावलीनिमित्त प्रत्येकाच्या घरी पणत्यांची आरास प्रामुख्याने केलेली पाहायला मिळते.
तसेच, यासाठी पणती तयार करणाऱ्या कारागिराचे कष्ट मोठे आहेत.परशुराम हे मूळचे खानापूरचे. तेथे पणती बनवून ते पणजी शहरात 1993 पासून विकतात. ते गोव्यात वेर्णा येथे कामाला आहेत, मात्र दिवाळी सणात आपला परंपरागत व्यवसाय करतात. पणजीत विविध प्रकारच्या पणती व इतर कलाकृती ते विकत असतात.
पणतीचे विविध प्रकार
पणतीचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. एक हाताने बनविलेल्या, दुसऱ्या चाकावर बनविलेल्या तर तिसऱ्या नवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने मशीनच्या मदतीने बनविलेल्या पणती. या तिन्ही प्रकारच्या पणती बनविल्या जातात. मशीनच्या साहाय्याने बनविलेल्या पणती दिसण्यास अधिक चांगल्या असतात. रंगकाम केलेल्या पणतींना देखील अधिक मागणी असल्याचे परशुराम सांगतात.
छोट्या पणतींना मागणी
पूर्वी केवळ मध्यम व मोठ्या आकाराच्या पणती बनविल्या जायच्या, मात्र आता आकाराने लहान, सुबक रंगकाम केलेल्या पणतींना अधिक पसंती दिली जाते. भाविकांना अलीकडच्या काळात आकर्षक पणती हव्यात. त्यासाठी काळानुसार पणतीतही बदल होत आहेत, असे कुंभार म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.