देशभरात पाळीव कुत्रा म्हणून पाळण्यास बंदी असलेल्या क्रूर स्वभावाच्या ‘पीटबुल’ जातीच्या कुत्र्याने हणजूण येथे प्रभास कळंगुटकर (वय ९ वर्षे) या निष्पाप बालकाचा आईसमोरच फडशा पाडला. त्याच्या गळ्याला आणि अंगावर अनेक ठिकाणी चावे घेतल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याची प्राणज्योत मालवली.
ही दुर्दैवी घटना गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मोंतेरोवाडा-हणजूण येथे घडली. प्रभास हा हणजूण येथील सिक्रेट हार्ट प्राथमिक शाळेचा विद्यार्थी होता. हणजूण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोतेंरोवाडा येथे वास्तव्यास असलेल्या एका विदेशी महिलेच्या घरात प्रभासची आई मोलकरीण म्हणून काम करते.
अधूनमधून ती प्रभासलाही कामावर सोबत आणायची. गुरुवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे आई प्रभाससोबत कामावर रुजू झाली असता, आईची नजर चुकवून प्रभास ‘पीटबुल’च्या संपर्कात आला आणि क्षणाचाही विलंब न लावता ‘पीटबुल’ने आईसमोरच प्रभासचा अक्षरश: फडशा पाडला. प्रभासच्या किंचाळ्यांमुळे त्याची आई धावत आली आणि तिने शरीरातील पूर्ण बळ एकवटून प्रभासला ‘पीटबुल’च्या तोंडातून खेचून बाहेर काढले; परंतु तोपर्यंत बराच वेळ झाला होता.
गुरुवारी हणजूण येथे चावा घेऊन निष्पाप प्रभासचा बळी घेणाऱ्या त्या ‘पीटबुल’ने यापूर्वी गोमंतकीय मालकाच्या मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. या घटनेमुळे घाबरलेल्या त्या गोमंतकीय मालकाने हा ‘पीटबुल’ जवळच राहणाऱ्या एका विदेशी महिलेला विकला. तथापि, गुरुवारी घडलेल्या या भयंकर घटनेने ती विदेशी महिला बिलकुल विचलीत झालेली दिसत नव्हती, असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले.
भटकी कुत्री आणि मोकाट गुरांसाठी आम्ही धोरण आणणार आहोत. पाळीव कुत्र्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी करणार आहोत. हणजूण येथील प्रकरणात पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
याप्रकरणी हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक सूरज गावस तपास करीत असून त्या ‘पीटबुल’च्या मालकावर गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात कोणावरही कारवाई करण्यात आलेली नव्हती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.