
पणजी: राज्यातील सहकारी सोसायट्यांची आर्थिक उलाढाल अवघ्या एका वर्षात सुमारे चार हजार कोटींनी वाढल्याचे सांगत, यंदाचा सहकार सप्ताह १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
पर्वरी येथील मंत्रालयात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत सहकार सचिव यतिंद्र मरळकर यांच्यासह खात्याचे इतर अधिकारी उपस्थित होते. राज्यात सद्यस्थितीत सुमारे २,५०० सहकारी सोसायट्या आहेत. त्यापैकी एक हजार सोसायट्या सक्रिय आहेत.
या सोसायट्यांनी २०२२-२३ या वर्षात ९,९२३ कोटींची आर्थिक उलाढाल केलेली होती. २०२३-२४ मध्ये ही उलाढाल १३,५३५ कोटींवर गेली. यातूनच अवघ्या एका वर्षात या सोसायट्यांची आर्थिक उलाढाल ३,६१२ कोटींनी वाढल्याचे स्पष्ट होते, असे मंत्री शिरोडकर म्हणाले. सहकारी सोसायट्या या ग्रामीण आणि शहरी भागांतील नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे प्रयत्न करीत असतात.
त्यामुळे गावागावांत अशा सोसायट्या सुरू करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केलेले आहेत. ज्या ठिकाणी अशा सोसायट्या नाहीत, त्या ठिकाणी पुढील काळात अशा सोसायट्या स्थापन केल्या जातील. यंदाचा सहकार सप्ताह १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ असे या सप्ताहाचे ब्रीद असेल, असेही त्यांनी नमूद केले.
सहकाराच्या माध्यमातून कृषी, मत्स्योद्योग, पर्यटन आदींसारख्या खात्यांना सोबत घेऊन जनतेचा विकास साधण्याचे प्रयत्न खात्याकडून सुरू आहेत. पुढील काळात दोन हजार चौरस मीटर पडिक जमीन ताब्यात घेऊन ती सहकारी तत्त्वावर कसण्याचाही विचार खात्याने सुरू केलेला आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा लाभ घेऊन आणि त्याआधारे इतर खात्यांमार्फत प्रकल्प राबवून जनतेचा विकास साधण्यात येईल, असेही मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले.
राज्यात सहकार पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार करून सरकारने त्रिभुवन विद्यापीठाशी सामंजस्य करार केलेला आहे. सहकार क्षेत्राची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठामार्फत सहकार पदवी तसेच प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. त्यासाठी सहा महिने, एक वर्ष, तीन वर्षे अशा कालावधींसाठीचे कोर्सही सुरू करण्यात येतील, असेही मंत्री शिरोडकर यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.