लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून, उमेदवारांची नावे निश्चित करण्यात व्यस्त आहेत. काँग्रेसमध्ये सध्या उमेदवारांबाबत विचारमंथन सुरू आहे.
पक्षाने आतापर्यंत लोकसभा उमेदवारांच्या सात याद्या जाहीर केल्या असून त्यात 195 उमेदवारांना तिकीट दिले आहे. पक्षाची सध्या आठव्या यादीबाबतही चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी (27 मार्च) महत्वाची बैठक होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तामिळनाडू आणि गोव्यातील उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
बैठकीत सुमारे 40 जागांवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.
या बैठकीत गोव्यातील जागांवर देखील चर्चा होणार असल्याने राज्यातील नेत्यांना पक्षश्रेष्ठींकडून पाचारण करण्यात आले आहे. बैठकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, ॲड. रमाकांत खलप आणि विजय भिके दिल्लीला रवाना झाले आहेत.
गोव्यातील लोकसभा उमेदवाराच्या नावावर सायंकाळपर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेसाठी विलंब होत असल्याने राज्यातील आघाडीचे घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपने दोन्ही उमेदवार जाहीर करुन प्रचाराचा नारळ देखील फोडल्याने काँग्रेसच्या उमेदवारांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, राज्यातील दोन्ही उमेदवारांच्या नावाची घोषणा आज (बुधवारी) होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.