Goa Politics: खरी कुजबुज, बाबूशना राग का आला?

Khari Kujbuj Political Satire: टॅक्सीवाल्यांचा कोणताही विषय असला की त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार मायकल लोबो पुढे सरसावतात. मंत्रिपदी असतानाही त्यांच्या या भूमिकेत बदल झालेला नव्हता.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

बाबूशना राग का आला?

महसूल मंत्री असलेले पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी अचानकपणे ‘रेंट अ कार’ व बाईक विरुध्द घेतलेल्या पवित्र्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावणे साहजिकच आहे. त्यांनी पाटो वरील पार्किंग क्षेत्रात ही वाहने मोठ्या प्रमाणात आढळतात, असा दावा करताना वाहतूक खात्याची यंत्रणा काय करते, असा थेट सवाल केला आहे. मात्र त्यांचा राग या वाहनांवर आहे की वाहतूक खात्यावर आहे, असा प्रश्‍न त्यामुळे अनेकांना पडला. कारण वस्तुस्थिती अशी आहे, की कोणीही आमदार त्यांतही सत्ताधारी आमदार वा मंत्री या ‘रेंट अ कार’ वा बाईक विरुध्द सहसा आवाज करत नाही. उलट त्यांची वा टॅक्सीवाल्यांची बाजू घेऊन सरकारलाच सुनावत असतो. त्यामुळे बाबूश एकाएकी या वाहनांवर का चिडले, असा प्रश्‍न अनेकांना पडला. केवळ पाटोवरच नव्हे तर गोव्यात सरसकट सर्वत्रच लोक या रेंट वाल्या वाहनांविरुध्द बोलत असतात.आता एक मंत्रीच बोलू लागल्यावर तरी सरकार या वाहनांवर बंदी आणेल का, असा प्रश्‍न उद्‍भवलाय खरा.

मायकल का रागावले?

टॅक्सीवाल्यांचा कोणताही विषय असला की त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार मायकल लोबो पुढे सरसावतात. मंत्रिपदी असतानाही त्यांच्या या भूमिकेत बदल झालेला नव्हता. टॅक्सीवाल्यांचे किती प्रश्न सुटले ते टॅक्सीवालेच सांगू शकतील. पण लोबो यांचे नेतृत्व त्यांना लाभत आहे, हेही तितकेच खरे आहे. टॅक्सीवाले संपले तर लोबोही संपतील, असे बैठकीत म्हणताच लोबो यांना ते अपमानास्पद वाटले. त्यांनी आपण यापुढे सोबत येणार नाही, असे तावातावाने सांगितले. त्यानंतर त्यांनी थोडी सबुरीचे भूमिका घेतली असली तरी आता बदल अपरिहार्य आहे हे त्यांना समजून चुकले आहे. ऑनलाईनला पर्याय नाही, हे टॅक्सीवाल्यांच्या गळी उतरवण्याचे काम त्यांना करणे कठीण वाटू लागल्यानेच त्यांनी संताप व्यक्त केल्याचे मानले जातेय.

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: लोबोंच्या दोरीउड्या...

नगरसेवकाच्या कारनाम्याची चर्चा!

पणजीतील प्रभागांतून स्वच्छता व इतर कामे करण्यासाठी महानगरपालिकेचे कामगार काम करताना दिसतात. मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी पुरुष व महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महानगरपालिकेत प्रभागात कामगार मिळत नाहीत, म्हणून काही नगरसेवकांचा आक्षेप असतो, परंतु सध्या महानगरपालिकेत वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. विशेष बाब म्हणजे एका प्रभागात आम्हाला कामाला पाठवू नका, म्हणून महिला कर्मचाऱ्यांनीच वरिष्ठांना सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे या सर्व महिला कर्मचारी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडे जाणार होत्या, परंतु त्या अजून गेलेल्या नाहीत. त्या प्रभागाच्या नगरसेवकाचे महिला कर्मचाऱ्यांशी आक्षेपार्ह वर्तनाचे कारनामे वाढल्याने त्या महिलांनीच एका सुपरवायझरकडे तक्रार केली आहे. महानगरपालिकेत या प्रकरणाची खमंगदार चर्चा सुरू झाल्याने आता त्या प्रभागात कामांसाठी केवळ पुरुषांनाच पाठवणार काय? हे लवकरच कळेल.

भाजप मेळाव्यात जनतेच्या अपेक्षा

राजाकडून प्रजेने अपेक्षा ठेवायलाच हव्यात. मात्र, जनतेच्या अपेक्षांची पुर्तता करणे हे राजाचे कर्तव्य असते. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक कुंकळ्ळीतील भाजप कार्यकर्त्यांना भाजप मेळाव्यात संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्र्यांकडून स्थानिक जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील सतरा वर्षे पडून असलेल्या घातक कचऱ्याची विल्हेवाट कधी लागणार? औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण कायमचे थांबणार का? कुंकळ्ळीचा कायापालट होणार म्हणून जनतेच्या विरोधाला न जुमानता स्थापन केलेल्या ‘एनआयटी’त स्थानिकांना नोकऱ्या मिळणार का? नोकऱ्या मिळाल्या तर किती मिळाल्या? आमदार व नेता नसलेल्या अनाथ स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळणार का? सध्या ‘स्लीप मोड’ मध्ये असलेल्या स्थानिक भाजपला नव संजीवनी देण्यासाठी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष एखादा मंत्र देणार का? या अपेक्षांची सहा जूनला पुर्तता होईल, अशी भाजप कार्यकर्त्यांना आशा आहे.आता पाहूया घोडा मैदान जवळच आहे.

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: रवींचे ‘एका दगडात दोन पक्षी’

सुदेश भिसे खुश !

आपल्या मनासारखे झाले व स्वप्नपूर्ती झाली तर आनंद होणारच. कुंकळ्ळी मतदारसंघात भाजप ‘विनेबिलिटी’ असलेल्या उमेदवाराच्या शोधात आहे. सुदेश भिसे गेल्या दहा वर्षांपासून भाजपात काम करीत आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारीवर दावा केला होता. सुदेश भिसेंबरोबर संतोष फळ देसाई, विशाल देसाई व माजी आमदार क्लाफास डायस हेही भाजपाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करताहेत. मात्र, सुदेश भिसे सध्या खुश आहेत. कारण भाजपाचा शुक्रवारी कुंकळ्ळीत मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी लावलेल्या पोस्टर व बॅनरमध्ये मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याबरोबर सुदेश भिसेंचा फोटोही लागला आहे. सुदेश भिसे भाजपाचा ‘पोस्टर बॉय’ बनल्यामुळे जाम खुश आहेत.

देवाचा कोप झाला

सध्या वादात सापडलेल्या राजकारण्याविषयी अनेक चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे देव चुलत भावाच्या घरात असतात. ते त्यांचे मूळ घर. चुलत भावाला संपवण्यासाठी राजकारण्याने कंबर कसली. नाव न घेता जाहीर आरोप केले. चुलत भावाने एका मंत्र्याच्या आशीर्वादाने संरक्षक भिंतीचे काम हाती घेतले. या राजकारण्याने काम बंद पाडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र डाळ शिजली नाही. आता त्या चुलत भावाच्या घरात असलेल्या देवांचा कोप झाला आणि राजकारण्याला पळता भुई थोडी झाली, अशी चर्चा आहे.

क्‍लाफासची दिल्‍लीतही चर्चा

कुंकळ्‍ळीचे भाजपचे माजी आमदार क्‍लाफास डायस हे सध्‍या भाजप कार्यकर्त्‍यांपेक्षा आम आदमी पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांबरोबर जास्‍त दिसतात. अशा आशयाची ‘खरी कुजबूज’ काल आम्‍ही प्रसिद्ध केली होती. त्‍यात क्‍लाफासची पावले आम आदमी पक्षाकडे वळणार तर नाहीत ना? अशीही शक्‍यता व्‍यक्‍त केली होती. त्‍यामुळे सध्‍या क्‍लाफासच्‍या या ‘आप’ प्रेमाची सगळीकडे चर्चा चालू असून दिल्‍लीतील ‘आप’च्‍या केंद्रीय नेत्‍यांनीही त्‍याची दखल घेतली आहे. ‘गोमन्‍तक’मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्‍या कुजबूजची दखल दिल्‍लीतील ‘आप’ नेत्‍यांनी घेतली असून क्‍लाफास ‘आप’च्‍या गळाला लागू शकतात का? याची चाचपणीही करण्‍यास सांगितले आहे असे म्‍हणतात.‘गोमन्‍तक’च्‍या ‘खरी कुजबूज’ची चर्चा आता दिल्‍लीतही होऊ लागली आहे. यावरुन तिचा दबदबा किती, हे स्‍पष्‍ट होत नाही का? ∙∙∙

‘देवाचो मनीस’ म्हटलं, वाईट का वाटावं?

२०२२ साली कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून दिगंबर कामत यांना ‘देवाचो मनीस’ असे  संबोधले जाते. त्यामागचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. सुरवातीला असे संबोधल्याने दिगंबरबाब कधीच हताश होत नसत. पण परवा पणजीत ते पत्रकारांवर भलतेच भडकले. आपल्याला देवाचा मनीस म्हणून देवाचा अपमान करु नका. आपल्याला पाहिजे ते वाईट शब्द बोला असे त्यांनी ठणकावून सांगितले. २०२२ साली वाढदिनी मुख्यमंत्री, खासदार तानावडे, नरेंद्र सावईकर यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी ‘देवाचो मनीस’ म्हणून दिगंबरबाब यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षावच केला होता. तेव्हा दिगंबरबाब नगराध्यक्षांवर गरजले नाहीत. वरून ते स्वतःला धन्य मानून घेताना दिसत होते. आताच असे काय घडले. कोकणीत एक म्हण आहे ‘कुचकुचता एककडेन, खरपिता दुसरेकडेन’ अशातला तर हा प्रकार नव्हे का!

प्रकरण मिटणार होते, पण..

कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे प्रकरणावर पडदा पाडण्याची सारी तयारी झाली होती. गावडे यांनी दिलगिरी व्यक्त करून ते प्रकरण मिटवण्यापर्यंत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची प्रगती झाली होती. त्यातच गावडे यांच्या समर्थनार्थ फर्मागुढी येथे सभा झाली. तेथे वक्त्यांनी भाजप आणि संघाच्या शिस्तीलाच आव्हान दिले. तेथील आक्रमक भाषेतील आशय दिल्लीपर्यंत पोचला आणि कारवाईची थांबणारी चक्रे पुन्हा फिरू लागली. ती सभा झाली नसती तर कारवाई थांबली असती. त्यामुळे गावडे यांना अडचणीत आणण्यासाठीच सभा घेतली होती की काय, अशी शंका काहीजण व्यक्त करू लागले आहेत. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे प्रकरणावर पडदा पाडण्याची सारी तयारी झाली होती. गावडे यांनी दिलगिरी व्यक्त करून ते प्रकरण मिटवण्यापर्यंत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची प्रगती झाली होती. त्यातच गावडे यांच्या समर्थनार्थ फर्मागुढी येथे सभा झाली. तेथे वक्त्यांनी भाजप आणि संघाच्या शिस्तीलाच आव्हान दिले. तेथील आक्रमक भाषेतील आशय दिल्लीपर्यंत पोचला आणि कारवाईची थांबणारी चक्रे पुन्हा फिरू लागली. ती सभा झाली नसती तर कारवाई थांबली असती. त्यामुळे गावडे यांना अडचणीत आणण्यासाठीच सभा घेतली होती की काय, अशी शंका काहीजण व्यक्त करू लागले आहेत.

सप्रेंची ‘कामगिरी’ अन् ‘पीएमओ’चा फोन

काही सामाजिक कार्यकर्ते असे असतात, की ते कोणतीही सामाजिक समस्या सोडविण्याचा आपल्या रितीने प्रयत्न करत असतात. फोंड्याचे विराज सप्रे हे अशापैकीच एक. ‘व्हॉइस ऑफ फोंडा’ या संस्थेतर्फे ते विविध प्रकारचे सामाजिक कार्य करताना दिसतात. फोंड्याच्या उपजिल्हा इस्पितळात सर्जन नाही, ही तशी जुनी समस्या. पण सप्रेंनी थेट पंतप्रधानांना या समस्येबाबत पत्र पाठविले. आणि पंतप्रधानांच्या कार्यालयाने दखल घेऊन ही समस्या सोडवलीही. हे एवढ्यावरच थांबले नाही पंतप्रधानांच्या कार्यालयातून सप्रेंना फोनवरून समस्या सुटली की नाही, आपण समाधानी आहात का, अशा प्रकारची विचारणाही करण्यात आली. त्यामुळे सप्रे सध्या ‘सातवे आसमान''वर विहार करायल लागलेत. त्यांनी या फोनची साऊंड क्लिप व्हायरल केली असून त्याची चर्चा फोंडा शहरात सुरू झाली आहे. आता सप्रे फोंड्यातील इतर समस्यांबाबतही म्हणे पंतप्रधानानाच पत्र पाठवणार आहेत. काही का असेना, सप्रेंची ही कामगिरी समस्यांनी त्रस्त झालेल्यांना दिलासा देणारी आहे. ∙∙∙

गृह प्रवेश नडला

चांगला प्रशस्त बंगला असताना दुसऱ्या गावात राजकारण्याने बंगला घेतला. मोजक्याच जणांच्या उपस्थितीत गृह प्रवेश केला. त्याची वार्ता कुणाला कळणार नाही याची काळजीही घेतली. त्या नव्या घरात त्याची आई जाण्यास तयार होईना. तिचे त्याबाबतचे मत वेगळे होते. राजकारणी तेथे राहण्यास गेला आणि ४८ तासात वक्तव्य करून अडचणीत आला. आता खुलासे करत फिरताना नाकी नऊ आले आहेत. त्यामुळे गृहप्रवेश नडल्याची चर्चा सुरु झाली आहे. दिलेल्या बिल्डरने बऱ्या मनाने बंगला दिला नसावा, अशीही चर्चा आहे.

काही शाळांत ‘छत्री’ची गरज

राज्यात शाळा सुरू होत असून पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजणार आहेत. पण, या उत्साहात एक मोठी चिंता डोकावत आहे, ती म्हणजे शाळांच्या दुरुस्तीची अपूर्ण असलेली कामे, असे पालक बोलू लागले आहेत. अनेक शाळांमध्ये कामं अर्धवट राहिलीत, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, असे पालक चिंतेने बोलतात. या परिस्थितीमुळे, राज्यातील काही शाळांमध्ये मुलांना ‘छत्री घेऊन बसावं लागेल’ अशी चर्चा सुरू झाली आहे. दुरुस्ती अपूर्ण असल्याने पावसाळ्यात पाणी गळती किंवा इतर अडचणी येऊ शकतात, अशी भीती पालकांना वाटत आहे. आता या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने ‘सुरक्षित’ वातावरणात शिक्षण मिळते की, त्यांना पावसाळ्यात त्रासाला सामोरे जावे लागते, हे येत्या काही दिवसांत दिसेलच. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com