Pramod Sawant: नाताळ शिष्टाचार 'खरी कुजबूज'

Pramod Sawant: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नाताळाचा उपयोग सासष्टीतील ख्रिस्ती आमदारांच्या घरी भेट देण्यासाठी केला.
Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Pramod Sawant: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नाताळाचा उपयोग सासष्टीतील ख्रिस्ती आमदारांच्या घरी भेट देण्यासाठी केला. ते प्रामुख्याने आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा यांना भेटले. हे दोन्ही आमदार सरकारला निकट असल्‍याची चर्चा सुरू आहेच. त्यामुळे भाजपचे तेथील पडेल उमेदवार सावियो रॉड्रिगीस नाराज झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरेही ओढले आहेत.

परंतु आम आदमी पक्षाचे आमदार पक्षाबरोबर कमीच आहेत, अशी चर्चा सध्या सुरू आहे. पक्ष कार्यात तर ते कधी दिसतही नाहीत. पक्षाचे इतर नेतेही आपल्या वैयक्तिक व्यवसायात गुंतल्याने या पक्षाचा योग्य असा परिणाम दिसत नाही. मुख्यमंत्री सावंत हे चर्चिल आलेमाव, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्‍स, बाबाशान, आलेक्स सिक्वेरा, नीलेश काब्राल यांच्याही घरी जाऊन त्यांना नाताळाच्या शुभेच्छा देऊन आले.

सिक्वेरांना नाताळ 'गिफ्‍ट'

मंत्रिमंडळात कोणा एकाला डच्चू देऊन आलेक्स सिक्वेरा यांची वर्णी लागणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. आलेक्स सिक्वेरा यांनी तीन महिन्यांपूर्वीच आपल्या स्टाईलचा शर्ट व पँट शिवून घेतली होती. शर्ट-इनशर्ट करून ते खांद्यापर्यंत बेल्ट लटकवतात. ही वेशभूषा मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर करण्याचे त्यांनी लागलीच ठरवले होते.

परंतु आठ दिवसांत होणार असलेला शपथविधी तीन महिने लोटला तरी होत नाही. वरून मुख्यमंत्र्यांसह कोणीच आपली साधी विचारपूस करीत नाही, म्हणून सिक्वेरासह अनेकजण अस्वस्थ बनले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी नाताळ दिनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. ‘तुमचे काम मी आता नक्कीच करतो’ असे सांगून मुख्यमंत्री परतले आणि दुसऱ्या दिवशी ते थेट दिल्लीला रवाना झाले.

Pramod Sawant
Goa Petrol Price : नवीन वर्षात कसे असणार पेट्रोल-डिझेलचे दर? वाचा गोव्यातील इंधनाचा आजचा भाव

आठ नवागतांसाठी ‘गुड न्‍यूज’

मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीला गेले आहेत, ही बातमी अनेकांसाठी महत्त्वाची आहे. त्यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा अधिवेशन सोडून दिल्लीला गेल्यामुळे कोविडसंदर्भातील ही बैठक नाही ना, अशी चर्चा चालली होती. परंतु केंद्रीय मंत्र्यांनी सर्व आरोग्यमंत्र्यांबरोबर हल्लीच आभासी बैठक घेतली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बदल हा एकच विषय त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर असू शकतो.

महाराष्ट्रामध्येही मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. गोव्यात आठ नवागतांना प्रवेश देऊनही त्यांना लटकवून ठेवल्यामुळे पक्षाच्या विरोधात असंतोष निर्माण झाला होता. लोक सरकारवर नाराज बनले होते. ही वार्ता दिल्लीला गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांना तातडीने बोलावून घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

भाजप नेत्‍यांचे अल्‍पसंख्‍याक प्रेम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा भेटीत राज्यातील नेत्यांना अल्पसंख्यांक समाजाला जवळ जा असा सल्ला दिला होता. तो आता मंत्र्यांनी अत्यंत गंभीरपणे घेतलेला दिसतो. दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे सपत्नीक आर्चबिशपना भेटून आले.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पंतप्रधानांवरील ‘मोदी@20’ हे पुस्तक पाद्रींना भेट दिले. ते नाताळाच्या दिवशी सुकूर, पणजी, साळगाव, सांतआंद्रे, सांताक्रुझ अशा बऱ्याच चर्चमध्ये जाऊनही आले. मंत्र्यांनी दाखविलेल्या या तत्परतेचे भाजपमध्येही कौतुक होत आहे. मोदींवरील पुस्तकात 20 तज्‍ज्ञांनी आपले अनुभव व्यक्त केले आहेत. या प्रती चर्च संघटनेत जाणे महत्त्वाचे होते, असे भाजपच्या संघटनेचेही मत बनले आहे.

अल्पसंख्यांकाच्या दारात निवडणुकीच्याच काळात का जावे, सदैव त्यांच्या संपर्कात राहणे उचित असल्याचे पंतप्रधानांनी सांगितल्यावरच नेत्यांचे डोळे उघडले, अशी एक भावनाही पक्षात तरळते आहे. वास्तविक विश्‍वजीत आणि खंवटे यांचा पाद्रींबरोबर संपर्क होताच. इतरांचे काय, असाही प्रश्‍न उपस्थित झाला.

खाणचालकांची चतुराई

गोव्यातील खाणपट्ट्यांचा लिलाव सुरळीत पडला व या सर्व खाणी गोव्यातीलच निर्यातदारांनी काबिज केल्या. परंतु राज्यभर यासंदर्भात सुरू झालेली चर्चा मात्र निश्‍चितच गंभीर आहे. काही खाणचालकांनी 98 व 99 टक्के बोली लावून या खाणी प्राप्त केल्या. शिरगाव पट्ट्यातील खाण 116 टक्के बोलीवर प्राप्त झाली. 98 ते 100 टक्के महसूल राज्याकडे सोपवून या कंपन्या काय नफा कमावतील, असा प्रश्‍न सध्या चर्चिला जात आहे.

यावर तज्‍ज्ञांचे मत असे की या खाणी ज्यांच्या ताब्यात होत्या, त्यांना तेथे उपलब्ध असलेल्या मालाचा दर्जा व उपलब्धता माहीत आहे. त्यामुळे राज्याला 100 टक्के महसूल देऊनही आपण बक्कळ नफा कमावू शकतो, असे त्यांना मनोमन वाटते. एकूण काय तर गोव्यातील या खनिज निर्यातदारांनी एकत्र येऊन बाहेरच्या मारवाडी कंपन्यांना हातोहात फसविले, तीही चर्चा राज्यात जोरात सुरू आहे.

Pramod Sawant
Goa: गोवा राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची 'विशेष शाळांमध्‍ये समुपदेशक' नेमण्याची सरकारकडे मागणी

नटसम्राटाचेही शासनाला विस्मरण?

ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकार आहे, ज्याने हयातभर शंभरेक नाटकांत भूमिका करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. आजही आपल्या संस्थेतर्फे हा रंगकर्मी कोकणी, मराठी नाट्यस्पर्धेत काम करतोच. आपलं नाटक झाल्यावर व्रतस्थासारखं इतर सर्वांची नाटकं बघत बसतो. ही नाट्यभक्ती व कलासक्ती. हे रंगकर्मी म्हणजे अजित केरकर. कला अकादमीच्या रंगभूमी दिवशी पुरस्कार दिले जातात. चार नाटकांत पार्ट केलेल्यांनासुद्धा खिरापत वाटण्यात येते.

आजतागायत अजितरावांना हा बहुमान देण्यात आलेला नाही. कला अकादमी स्टेज गाजवणाऱ्या या महान नटाचाच संस्थेला विसर? अक्षम्य! गोवा कोकणी अकादमीने कोकणी नाटकाला उंची देण्याच्या त्यांच्या योगदानाची दखल घेतलेली नाही. कला-संस्कृती खात्यानेही त्यांना कधी पुरस्कार निवड समितीवर घेतले नाही.

त्यांना ही जबाबदारी दिली असती तर सध्‍या पुरस्कारांवरून जी नाचक्की, नामुष्की आणि नालस्ती चाललीय ती खचितच टळली असती. कारण अजितरावांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याची ग्वाही सिद्ध केली आहे, असे सुज्ञ साहित्‍यिक, कलाकार, रसिक कुजबुजत आहेत.

गिरीश सरांना झाली उपरती!

राजकारण पुरे झाले म्हणून आपले गिरीश सर शिक्षकी पेशाकडे वळले खरे, पण त्यांचे मन तेथे रमत नसावे व म्हणून ऊठसूठ ते राजकीय निवेदने करत असावेत. हल्ली त्यांनी सभापती रमेश सरांबाबत केलेले वक्तव्य पुन्हा राजकीय वादळ उठविणारे ठरले आहे.

सभापती हा पक्षातीत असावा हे खरेच, पण गोव्यातील सभापतींचा एकंदर कारभार पाहिला आणि गोपाळ आपा कामत सोडले तर कोणीच त्या पदावर आल्यावर पक्षाचे लेबल काढून टाकलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. काहींनी दिलेले निवाडेसुद्धा त्यामुळे विवादास्पद ठरले आहेत. खरे तर गिरीश सरांचा पक्ष राज्यात दीर्घ काळ सत्तेवर होता. पण तोही त्‍यास अपवाद ठरला नाही. मग आत्ताच सभापतींवर ठपका का, अशी पृच्‍छा होऊ लागली आहे.

‘सनबर्न’वर विरोधकही फिदा?

‘सनबर्न’ आजपासून वागातोर येथे सुरू होत आहे. सरकारने त्यांच्यासाठी पायघड्या घातलेल्याच आहेत. जे नेते अमलीपदार्थ, ड्र्ग्स पार्ट्या, नाईट क्लब यासंदर्भात बोलत होते, त्यांची अळीमिळी गुपचिळी चालू आहे. तेच कशाला विरोधी पक्षाचे नेतेही मूग गिळून गप्प आहेत. कारण सगळ्यांचेच डोळे या महोत्सवाकडे लागलेले असतात.

दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारे या महोत्सवात कोणी तरी मृत्यूमुखी पडतोच. परंतु विरोधी नेत्यांनी सध्या त्याबाबत बोलणे बंद केले असावे. एकूणच सगळ्या आमदारांकडे तरुण मुले सनबर्नचे पास मागत फिरत असतात. त्यामुळे आयोजक एकतर पास पाठवितात किंवा पाकिटे. आजपासून उत्तर गोव्याच्या या भागात प्रचंड गर्दीचा माहोल असणार आहे, एवढे मात्र निश्‍चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com