
मडगाव: गोव्यात कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून रुग्णांची ही वाढती संख्या गोव्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. गोव्यात दरवर्षी सुमारे १५०० कॅन्सर रुग्ण आढळून येत असून त्यापैकी ३०० प्रकरणे ही ब्रेस्ट कॅन्सरची असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. असे जरी असले तरी या रोगाचे पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्येच निदान होण्याच्याही प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे मृतांची संख्या त्यामानाने बरीच नियंत्रणात असल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळाली आहे.
४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जात असल्याने गाेव्यातील स्थितीबद्दल आढावा घेतला असता, गोव्यात रुग्णांची संख्या चिंताजनक असली तरी इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात उपचार पद्धती चांगली असून त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे, अशी माहिती कॅन्सर तज्ज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी दिली.
आकडेवारीचा आढावा घेतल्यास गोव्यात दरवर्षी सुमारे १५०० नवीन कर्करोग रुग्ण आढळतात. दरवर्षी त्यात ५ ते ६ टक्क्यांनी वाढ होते. गोव्यातील प्रतिलाख लोकसंख्येमागे शंभर लोकांना कर्करोगाची बाधा होत असून हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा किंचित जास्त आहे.
राष्ट्रीय स्तरावर प्रतिलाख लोकसंख्येमागे सुमारे ९० ते ९५ जणांना कॅन्सरची बाधा होत असते. मात्र, केरळपेक्षा हे प्रमाण खूपच कमी आहे. केरळात प्रतिलाख लोकसंख्येमागे १३० जणांना कॅन्सर होत असल्याचे आढळून आले आहे.
डॉ. साळकर म्हणाले, गाेव्यात कॅन्सरचे रुग्ण आढळून येतात ते प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आहे. गोव्यात शहरी भागात जास्त कॅन्सर रुग्ण सापडतात. मात्र, संपूर्ण गोवाच शहरीकरणाकडे वळल्यामुळे गोव्यात सगळीचकडे कॅन्सर रुग्ण दिसून येऊ लागले आहेत. यातील चिंताजनक बाब म्हणजे, आता ३० ते ४० वयोगटातही कॅन्सरचा प्रभाव दिसून येऊ लागला आहे. बदलती जीवनशैली गोव्यातील वाढत्या कॅन्सरची मूळ कारणे आहेत. आहारात बदल, व्यायामाचा अभाव, उशिरा होणारी लग्ने आणि कमी मुले जन्माला घालण्याची प्रवृत्ती यामुळे कॅन्सर रुग्ण वाढत आहे.
गोव्यात लोकसंख्येचा विचार करता स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य प्रकार आहे. त्यानंतर तोंडाचा कर्करोग येतो. गोव्यात सर्व कर्करोगांपैकी तोंडाचा कर्करोग सुमारे २० ते २५ टक्के आहे, जो इतर उत्तरेकडील राज्यांपेक्षा खूपच कमी आहे, जिथे तो सुमारे ४० टक्के आहे. गेल्या ३० वर्षांत गोव्यात तंबाखूच्या वापरात घट झाल्यामुळे ही घट झाली आहे. प्रभावी उपचार पद्धती आणि लोकांमध्ये केली गेलेली प्रभावी जागृती यामुळे हे प्रमाण कमी झाल्याची माहिती डॉ. साळकर यांनी दिली.
गोव्यातील लोक कर्करोगाबद्दल आणि त्यांच्या शरीरात कोणत्या लक्षणांवर लक्ष ठेवावे याबद्दल किती जागरूक आहेत असे विचारले असता, डॉ. शेखर साळकर म्हणाले की, सामान्यतः लोक जागरूक असतात; परंतु चाचण्या करण्यास घाबरतात. रोग लवकर शोधण्यासाठी दरवर्षी तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे. लवकर निदान झाल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो आणि त्याचे आरोग्यही सुदृढ राहू शकते.
१ कॅन्सर नियंत्रणात ठेवायचे असल्यास काेणते उपाय घेतले पाहिजेत असे विचारले असता डॉ. साळकर यांनी सांगितले की, धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या वाईट सवयींपासून दूर राहणे, रोज ३० मिनिटे चालणे किंवा साधा व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. भरपूर पालेभाज्या खा आणि शक्य तितके लाल मांस खाण्याचे टाळा.
२ ब्रेस्ट कॅन्सर नियंत्रणात आणायचा असेल तर, महिलांचे २५ ते २७ वर्षांत लग्न हाेणे आवश्यक असून त्यांना किमान दोन अपत्ये झाल्यास आणि त्या अपत्यांना चांगले स्तनपान केल्यास ब्रेस्ट कॅन्सर बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात येऊ शकतो.
कर्करोगाचा सामना करण्याचा मार्ग म्हणजे कर्करोगाची नोंदणी करणे, जेणेकरून योग्य डेटा उपलब्ध असेल. पुढील २० वर्षांसाठी आपल्याला सांख्यिकीयदृष्ट्या एक लाख लोकसंख्येचा समूह अभ्यास करावा लागेल, जेणेकरून आपल्याला सर्व असंसर्गजन्य रोगांची आणि त्यांच्या प्रसाराची चांगली कल्पना येईल व आपण लोकांना आहार, व्यायाम इत्यादींबद्दल योग्य मार्गदर्शक तत्त्वे जारी करू शकू.
डॉ. शेखर साळकर, गोवा कॅन्सर सोसायटीचे संयुक्त सचिव
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.