पणजी, दक्षिण गोव्यातील समुद्रकिनारी मृत आढळलेल्या सागरी पक्ष्यांचे शवविच्छेदन झाले असते तर त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले असते.
समुद्रात तेलगळती, उपासमार किंवा विषारी पदार्थांचे सेवन यामुळे या समुद्री पक्ष्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पक्षीअभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी बाणवली समुद्रकिनारी सुमारे १३ ते १४ सागरी पक्षी मृतावस्थेत आढळून आले होते. या पक्ष्यांच्या मृत्यूमागील संभाव्य कारणे काय असू शकतात, याबाबत आता प्रश्न आणि चर्चा सुरू आहे.
पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रणॉय वैद्य म्हणाले की, ही घटना चकावून टाकणारी आहे. या पक्ष्यांचे शवविच्छेदन झाले नसल्याने त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण सांगणे कठीण आहे. परंतु त्यांच्या मृत्यूमागील संभाव्य कारणे रोग, भूक, समुद्रातील पाण्याच्या तापमानात बदल, विषबाधा आदी असू शकतात.
प्राणी संरक्षक पूजा मित्रा यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, अलीकडे गोव्याच्या किनारपट्टीवरील ''ग्रेटर क्रेस्टेड टर्न’चे मृत्यू ही चिंतेची बाब आहे. पक्ष्यांच्या मृत्यूची कारणे वेगवेगळी असू शकतात.
समुद्राच्या पाण्याचे तापमान, प्रदूषण, हवामान, अन्नाची अनुपलब्धता, रोग आदी कारणांचा त्यात समावेश असू शकतो. जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी गोव्यात योग्य परिसंस्थेचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
या सागरी पक्ष्यांचा मृत्यू तेलगळती किंवा काही विषारी पदार्थांच्या सेवनामुळे झाला असावा. वाढते प्रदूषण, वातावरणातील बदल, प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे.
- जलमेश कारापूरकर, पक्षीअभ्यासक
समुद्री पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मी पशुवैद्यकीय विभागाला पक्ष्यांचे शवविच्छेदन करण्याची विनंती केली आहे. पण असे समजले की, एका मच्छीमाराने हे मृत समुद्री पक्षी जमिनीत पुरले. त्यामुळे शवविच्छेदन होऊ शकले नाही.
- पराग रांगणेकर, पर्यावरणप्रेमी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.