राज्यात 115 स्टार्टअप्स आहेत. गोवा स्टार्टअप पॉलिसी अंतर्गत सरकारने त्यांना 3.27 कोटी रूपयांचे अर्थसाह्य केले आहे. गोवा स्टार्टअप पॉलिसीसाठी फुलटाईम सीईओ आहे. आयटी पॉलिसीअंतर्गत 15 युनिट्सना 80 लाख रूपये दिले गेले आहेत, अशी माहिती आयटी मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
रोहन खंवटे म्हणाले, केंद्र सरकारच्या सहकार्याने ग्रामीण भागात ग्रामीण मित्र या उपक्रमाची सुरवात करणार आहे. यात गावातील बेरोजगार तरूणांना सहभागी करून घेतले जाईल. यातून स्थानिक तरूणांना पाठबळ मिळेल. त्यांना स्वयंरोजगार करता येईल.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, आम्ही चिखलकालो फेस्टिव्हल केला. गोविंद गावडे यांच्या मतदारसंघात चिखलकालो आयोजित केला होता. त्यातून आम्ही पर्यटनाचा एक वेगळा फ्लेवर दाखवून दिला. की, जर स्पेनमध्ये टोमॅटिनो सारखा फेस्टिव्हल असेल तर आमच्याकडे चिखलकालो आहे. आपण मातीतून येतो आणि मातीतच परत जातो.
हे केवळ चिखलात खेळणे नाही. माती ही आपली संस्कृती आहे. वीरभद्र, साव जावो अशा महोत्सवांनाही मोठे स्वरूप देण्याचा विचार आहे. रापणकरांचे फेस्ट करण्याचाही विचार आहे. जबाबदार आणि शाश्वत पर्यटन हे आमचे ध्येय आहे.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, मॉडेल शॅक म्हणजे आम्ही एक शॅक उभारून दाखवू. त्यातून तुम्हाला सर्व प्रकारची कल्पना येईल. त्यातून व्यवसाय कसा करावा, साईज कशी असावी यासाठी आम्ही हे मॉडेल शॅक करायचे ठरवले. मॉडेल शॅक पॉलिसी असू शकते, हे मला आजच कळले.
वॉटरस्पोर्ट्स आणि शॅक हे गोयंकारांचे धंदे आहेत आणि ते गोयंकारांकडेच राहतील. हे धंदे बाहेरच्या लोकांकडे जाणार नाहीत. शॅकसाठी सिंगल विंडो क्लियरन्स दिला जाईल. 10 वर्षाहुन अधिक काळ या व्यवसायात असलेल्या गोयंकारांना 50 टक्के प्राधान्य दिले जाईल.
युरी आलेमाव म्हणाले की, गोव्यातील विविध फेस्टिव्हलचे कॅलेंडर निश्चित्त असले पाहिजे. त्याची माहिती पर्यटकांना आधीच कळाली तर पर्यटनाला त्याचा लाभ होईल. चांदोर हे हेरिटेज व्हिलेश डेस्टिनेशन आहे. तिथे अनेक महोत्सव होतात. हेरिटेज पॉलिसी देखील असायला हवी.
पारंपरिक शॅक धोरणाबाबत ते म्हणाले की, पारंपरिक शॅक व्यावसायिकांना त्यांचे भविष्य, त्यांच्या व्यवसायाचे भविष्य कसे असणार आहे तेच माहिती नाही. शॅक व्यवसायात सबलिजिंगला बंदी असली पाहिजे. शॅक व्यवसायात कुणीही परदेशी व्यक्ती असता कामा नये.
विजय सरदेसाई म्हणाले, बीच क्लिनिंगबाबत काही न बोललेच बरे. बीच क्लिनिंग हा एक इव्हेंट झाला आहे. बीच क्लिनिंगसाठी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची पत्नी आली होती. त्या इव्हेंटसाठी कितीतरी पैसे खर्च केले गेले. एवढे पैसे खर्च करण्याची गरज नव्हती. लाख-कोटी रूपये खर्च झाले पण काहीही फरक पडला नाही.
कोट्यवधी रक्कमही त्यांना लहानच वाटते. सभापती महोदय हे काय चालले आहे? रोहन खंवटेंकडून हे अपेक्षित नाही. मला त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. रोहन खंवटे यांनी कांदवाल येथील रूट चेंज केला. त्यामुळे अपघात वाढले. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीही त्या रस्त्याला नावे ठेवली.
आता किमान पाच हायमास्ट दिवे तरी द्यावेत. आध्यात्मिक पर्यटनाला चालना द्यावी. सर्व गॅझेट कोकणीत भाषांतरीत करावीत, असे मागेच सांगितले होते. ते कधी होणार आहे? बायोडायव्हर्सिटी पार्कचे काय झाले?
विजय सरदेसाई म्हणाले, रेल्वे स्टेशन, एअरपोर्टवर पर्यटकांची नोंदणी ठेवावी. उत्तर गोव्यात मोपा एअरपोर्ट झाले. त्यामुळे तिकडे पर्यटकांचा ओढा वाढेल. पण दक्षिण गोव्यातही पर्यटकांसाठी काही गोष्टी करता येतील. बेतुल किल्ला येथे हेलिपॅड करा.
याशिवाय दक्षिण गोव्यात मिनिएचर पार्क करता येईल. डिस्नीलँडसाठी प्रयत्न करा. वॉटरपार्क, अॅम्युझमेंट पार्कसाठी प्रयत्न करा. मॉरिशसमध्ये शुगर म्युझियम आहे. तसे कोकोनट, काजू म्युझियम बनवा. राष्ट्रीय महामार्गावर रेस्ट रूम कराव्यात.
मडगाव हे कोकण रेल्वेचे महत्वाचे स्टेशन आहे. येथे दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. मडगाव येथे पर्यटकांसाठी आकर्षक असे काहीतरी करायला हवे. पर्यटकांना येथे आल्यावर गोव्याची अनुभूती मिळावी, या दृष्टीने स्टेशनबाहेर सौंदर्यीकरण करावे.
आमदार देविया राणे म्हणाल्या की, प्रत्येक धबधबा, प्रत्येक वॉटर बॉडी अशा ठिकाणी पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा विकसित करायला हव्यात. अशा ठिकाणी लाखो पर्यटक भेट देत असतात. पण तिथे चेंजिंग रूम, टॉईलेट्स, लाईफगार्ड्स नाहीत. आमच्या भागात समुद्र नाही. पण जंगल आहे, धबधबे आहेत. अंतर्गत भागातील (हिंटरलँड) पर्यटनासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये म्हणाले, डिचोलीमध्ये मये तलाव, सप्तकोटीश्वर मंदीर, आमठाणे डॅम, पांडव लेणी, फार्म हाऊसेस आहेत. या सर्व पर्यटन स्थळांचे टुरीस्ट सर्किट झाले तर पर्यटनाला आणखी हातभर लागेल. गोवा बियाँड बीचेस हा येथे आहे.
आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, गोव्यात गुन्हेगारी कृत्ये वाढत चालली आहेत. टाऊट्स आणि हॉकर्स यांच्याविषयीच्या तक्रारी यापुर्वी केल्या गेल्या आहेत. वारंवार तक्रारी केल्या आहेत. पण त्याचा काहीच फायदा झालेला नाही. आमच्याकडे पोलिस नाहीत, असे कळवूनही त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही.
आमची, माझी स्वतःची गाडी अडवून टाऊट्स ने मला विचारले की, तुमको लडकी चाहिए क्या? अशी परिस्थिती गोव्यात आहे. बर आमच्या गाडीवर गोव्याचा नंबर आहे. आमची गाडी बाहेरील राज्यातील नव्हती. तरी टाऊट्स येऊन असे विचारत आहेत.
मसाज पार्लरना कुणाचा पाठिंबा आहे? गोवा गर्ल्स नावाच्या अशा अनेक वेबसाईट्स आहेत. त्यांना कुणाचे पाठबळ आहे. आमच्या महिला, मुलींची नावे यातून बदनाम होत आहे.
सभागृहात विरोधी पक्षाला देण्यात येणाऱ्या वेळेवरून चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री सावंत यांनी मध्यस्थी केली. सावंत यांनी प्रत्येक पक्षाला किती वेळ दिला जावा याचा निर्णय सभापतींना घ्यावा आणि वेळ विभागून घेण्याची विनंती केली.
दरम्यान, यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी प्रश्न विचारून सभागृहात जायचे नाही तर उत्तर ऐकायला देखील थांबायला हवे असे म्हणाले. त्यावर विजय सरदेसाई आक्रमक होत. "तुम्ही उत्तर देणार नसाल तर आम्ही कशाला थांबू सभागृहात? झक मारली मग आम्ही जातो घरी." असे म्हणाले.
लक्षवेधी दरम्यान राज्यातील वीज समस्येवर चर्चा सुरू झाली. यावेळी विविध मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आमदरांनी वीजेची समस्या मांडली. वारंवार होणार वीजेचा खंडीत वीज पुरवठा, भूमीगत वीज वाहिनी आणि कामगारांची कमतरता याबाबत आमदारांनी समस्या मांडल्या.
पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवसापूर्वी कला अकादमीचा एक भाग कोसळला. यामुळे पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ झाला. आणि विरोधकांनी भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, गावडे यांनी कोसळलेला भाग अकादमीचा नाही असे स्पष्टीकरण मंत्र्यांनी दिले होते.
याबाबत आता आमदार विजय सरदेसाई यांनी व्हिडिओ पुरावा सादर केला असून, कोसळलेला तो भाग कला अकादमीचाच असल्याचे म्हटले आहे.
राज्यातील सर्व माध्यमिक विद्यालयांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. शाळांमधील साहित्य आणि साधन यांचा आढावा घेतला जाईल असे सावंत म्हणाले.
आयटीआयचा स्कोप वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे सावंत म्हणाले. दहावीनंतर दोन वर्षांचा आयटीआय बारावीच्या समांतर आहे असेही सावंत म्हणाले.
बंद पडलेल्या सरकारी शाळांमध्ये अंगणवाडी स्थलांतरित करणार. एकही अंगणवाडी भाड्याच्या घरात राहू देणार नाही अशी सावंत यांनी ग्वाही सभागृहात दिली.
प्रत्येक मतदारसंघात 40 कोटींची वीज संबधित कामे हाती घेतल्याची माहिती वीज खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर यांनी सभागृहात दिली. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी विचारलेल्या प्रश्नाला ढवळीकर उत्तर देते होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.