सांगे: शेती म्हटली की, त्याला दुय्यम दर्जा दिला जायचा. आता ही परिस्थिती बदलली आहे. शेतीकडे उद्योग म्हणून पाहा. कोणत्याही परिस्थितीत जगण्याचा आधार शेतीच देऊ शकते. याचा प्रत्यय प्रत्येक महामारीप्रसंगी आला आहे. आज मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग शेती बागायतींकडे आकृष्ट होत आहे. युवकांनी शेतीकडे अर्धवेळ शेती म्हणून नव्हे, तर उद्योग म्हणून उतरावे, असे आवाहन कृषी अधिकारी गौरी प्रभुदेसाई यांनी शेतकऱ्यांबरोबर वार्तालापप्रसंगी केले. तसेच सांगेतील सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, स्वयंसाहाय्य गटाच्या महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पारंपरिक शेती - बागायतीबरोबर बदलत्या परिस्थितीनुसार आणि ठिकठिकाणच्या पोषक हवामानाचा अंदाज घेऊन कृषी उत्पन्न घेतल्यास उत्पन्नाचा समतोल राखला जाऊ शकतो. एकच उत्पादन घेतले आणि परिस्थितीनुसार त्यात नुकसान सोसावे लागले, तर शेती - बागायतीत घेतले जाणारे दुसरे उत्पादन सावरू शकेल. या दृष्टीने विचार करून वाटचाल केल्यास लाभदायक ठरू शकते, असे कृषी अधिकारी गौरी प्रभुदेसाई यांनी सांगितले.
बासमती तांदळाचा प्रयोग यशस्वी
कृषी खाते आता पूर्वीसारखे राहिले नसून बदलत्या काळात उत्पन्नवाढीसाठी बदल स्वीकारणे आवश्यक आहे. एक प्रयोग म्हणून सांगेतील थंड हवामान असलेल्या ठिकाणी भाताचा नवीन प्रयोग करण्याचे धाडस करून पहिले. साळजीणी या थंड हवेच्या गावात महिलांना एकत्र करून त्यांच्या स्वयंसाहाय्य गटातर्फे शेतीला सौरऊर्जा कुंपण घालून एक प्रयोग म्हणून बासमती या भाताचे बियाणे दिले. हेच बियाणे पंजाब कृषी विद्यापीठातून आणून ते नेत्रावळी येथील शेतकऱ्यांला उपलब्ध केले. त्यांनी एक काडी पद्धतीने लागवड करून दिलेले बियाणे साळजीणी, जुना व शिवसरे येथील शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिले. त्याचा फलित ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये नक्कीच समाधानकारक मिळेल. कारण, जेवढा हवेत गारवा येईल, तेवढा बासमती तांदूळला सुवासिकपणा अधिक येईल. तसेच धारगळ येथे तांदूळकांडप गिरण असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शक्य त्या ठिकाणी लागवड करण्यात येईल. तसेच भाटी आणि नुने येथे इंदा ही नवीन भात लागवड करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी नव्या भात जातीची वाढ समाधानकारक असल्याने शेतकरी उत्साही असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हळद लागवड
सांगेतील हवामानात वेगवेगळी पिके उत्पादित होऊ शकतात, याचा अंदाज घेऊन गावडोंगरी येथून हळद बियाणे आणण्यात आले. त्याची लागवड केली असून एका हळदीचे रोपटे साधारण अर्धा किलो उत्पादन देते. एक टन हळद लागवड केल्यास दहा टन हळद उत्पादन होऊ शकते. सांगेत लागवड केलेली हळद चांगल्या प्रकारे वाढ होऊ लागली आहे. आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही. हळदीचा कांदा काढण्यायोग्य तयार झाल्यावर खोदून काढून त्यावर गावठी पद्धतीने प्रक्रिया करण्यासारखे दिवस आता राहिलेले नाहीत. आयसीआर जुने गोवे येथे सर्व प्रक्रिया करणारी यंत्रणा असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात हळद लागवड होण्याचे मार्ग खुले झाले आहेत. हळदीची किंमत खऱ्या अर्थाने कोविड महामारीत चांगल्या पद्धतीने कळून आली आहे. याबरोबर आले (अद्रक) आणि हळद मिळून चार हेक्टर जमिनीत लागवड करण्यात आली आहे. ही सर्व लागवड सेंद्रीय पद्धतीने करण्यात आल्याने बाजारात भाव नक्कीच चांगला मिळेल, असेही प्रभुदेसाई म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.