गणेशोत्सव...काल आणि आज

गणेशोत्सव...काल आणि आज
गणेशोत्सव...काल आणि आजDainik Gomantak
Published on
Updated on

पर्यावरणाचे भान बहुतेक वेळा अजून तरी गोव्यात राखले जाते. सामाजिक जागृतता दिसून येते. सकारात्मक रीतीने गणेशोत्सवाकडे पाहिले जाते.भक्तिभाव, पावित्र्य राखण्याकडे कल दिसून येतो. तरीपण गोव्यात करोना आहे. सगळीकडे सारखाच आहे.त्यामुळे करोना काळातील निर्बंधांमुळे मोकळेपणा नेहमीसारखा मिळणार नाही.

फक्त घराघरांत प्रथेनुसार साजरा केली जाणारी श्रीगणेशाची उपासना ही कुटुंबापुरती मर्यादित होती. त्याला सामूहिक स्वरूप नव्हते. पण इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध लोकांमध्ये जर जागृती आणायची असेल तर लोक एकत्र येणे गरजेचे होते. ते धार्मिक उत्सवात एकत्र येऊ शकतात आणि धार्मिक गोष्टींमध्ये इंग्रज फारशी ढवळाढवळ करू शकणार नाहीत, असा लोकमान्य टिळकांचा कयास होता. म्हणून त्यांनी घरांपुरता मर्यादित असलेला गणेशोत्सव लोकसंग्रह, संघटन, जनजागृतीच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी आणून ठेवला.

स्वातंत्र्य चळवळीला बळकटी येण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. सर्व जातीपाती, गरीब-श्रीमंत, असे भेद विसरून लोक संघटित होऊ लागले. लोकमान्यांच्या प्रयत्नांना पाहिजे तसे यश मिळाले. नुसते एकत्र येऊन भागणार नव्हते. त्याबरोबर समाजात ठोस विचार रुजणे गरजेचे होते. त्यासाठी नेत्यांची व्याख्याने, किर्तने, इत्यादी कार्यक्रम सुरू झाले. स्वातंत्र्यवादी विचारांना चालना मिळाली. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजप्रबोधन करणारे देखावे सादर होऊ लागले. ते पहाण्यासाठी आणखी गर्दी जमू लागली. ईप्सित हेतू साध्य झाला. कालानुरूप सार्वजनिक गणपती उत्सवाचे स्वरूप बदलत चालले आहे.

अगदी गणेशआगमनापासून विसर्जनापर्यंत अनेक बदल झालेले आहेत. काळ बदलला तसा माणूस बदलला. तशी तशी संस्कृती पण बदलत जातेच. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला. तो उद्देश आता राहिला नाही कारण स्वातंत्र्यपूर्व काळातील गरज स्वातंत्र्यानंतर संपून गेली. त्यामुळे आपल्याला गणेशोत्सव बदलत गेलेला दिसतो. ते स्वाभाविक आहे. भक्ती पेक्षा शक्तिप्रदर्शन वाढले आहे. गर्दी वाढवण्यासाठी सार्वजनिक मंडळे तरुणांना आकर्षित करणारे कार्यक्रम ठेवतात. आता काही देवभक्तीच्या, अभंग, राष्ट्रीय कीर्तने असे कार्यक्रम हल्ली दिसत नाही, तरुणांना त्यांच्या आवडीप्रमाणे सर्वकाही प्रचंड प्रमाणात करायचे आहे. मूर्तीचा आकार, मंडप, सजावट खर्च, देखावे यात खूपच फरक पडला आहे.

पूर्वी देशभक्तिपर देखावे देवादिकांच्या गोष्टींचे देखावे केले जात आता तसे देखावे मंडपामध्ये फारच कमी दिसतात. बऱ्याच ठिकाणी तरुण कार्यकर्त्यांची ऊर्जा चुकीच्या गोष्टींकडे लावली जाते. त्यात राजकारणी मार्गदर्शक असतील तर त्यांना उत्सव नाहीतर महोत्सव करायचा असतो. गणेश मंडळांमध्ये गटबाजी, अमाप पैसा, राजकीय स्पर्धा यांचे दर्शन होताना दिसते. विद्वानांची व्याख्याने आता होत नाहीत. कीर्तनकार कीर्तने करताना दिसत नाहीत.

करमणुकीचे सवंग कार्यक्रम बाप्पाला तरी आवडत असतील काय? सामाजिक गोष्टींचे भान विसरल्यामुळे म्हातारे,आजारी यांना आवाजाचा त्रास होतो.कानठळ्या बसविणारे डी.जे.च्या तालावरचे संगीत, त्यावरचे डान्स यांचा शांतता, पावित्र्य,भारती, सकारात्मक शक्ती यांच्याशी सुतराम संबंध नसतो. ध्वनी प्रदूषण हा एक महत्त्वाचा मुद्दा विचार करण्यायोग्य आहे. कायदे जरी खूप केले असले तरी ते पाळले पाहिजेत ना! अनेक गोष्टींचे भान राहत नाही. शहाणपणाची उणीव भासते. फटाके, रोषणाई यामुळेजे वायुप्रदूषण होते सर्वांनाच त्रासदायक ठरते.

विशेषत: महानगरांमध्ये ही समस्या जास्त आहे. जल्लोषात सुध्दा सामाजिक भान आणि माणुसकी राखायलाच हवी. गोव्याच्या गणेशोत्सवाचा विचार करायचा झाला तर टिळकांनी महाराष्ट्रात इंग्रजांसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. तेव्हा तर गोव्यात पोर्तुगीज राजवट होती. त्यामुळे महाराष्ट्रात जसे सार्वजनिक गणेशोत्सव होऊ लागले तसे गोव्यात झाले नाही. गोव्यातला गणपती हा खरंतर घरगुती उत्सव म्हणूनच साजरा केला जात असे. गोव्यातल्या गणपती उत्सवात दूरवरचे आप्तेष्ट कुटुंबीय सुध्दा येत असत. म्हणजे कौटुंबिक असला तरी भरपूर नातेवाईक जमत असत. कधीकधी तुरळकपणे पोर्तुगीज शासनकर्ते अडचणी आणायचा प्रयत्न करीत असत. त्यांचा धाक असला तरीपण गोवेकरांनी गणेश उत्सव साजरा करण्याची चिकाटी मात्र सोडली नाही. जशी पोर्तुगिजांपासून मंदिरे वाचवली.दुसरीकडे हलवली. पण देव, धर्म सांभाळला. त्याचप्रमाणे गणपती उत्सव होतच राहिला. आनंद देत राहिला.

पोर्तुगीज गेल्यानंतर अजूनही कौटुंबिक स्वरूपातच विशेषतः गणपती बसवले जातात.पण सार्वजनिक गणपती बसवणे देवळातून काही प्रमाणात असले तरी हळूहळू निरनिराळी मंडळे स्थापून सार्वजनिक स्वरुपात गणपती बसवणे सुरू झाले. मग तऱ्हतऱ्हेचे देखावे करणे, वाद्यांच्या गजरात आरत्या, स्पर्धा असे कार्यक्रम वाढू लागले. पण गोव्यात आक्षेपार्ह गोष्टी फारशा कधी दिसल्या नाहीत. दिसत नाहीत.

हे कौतुकास्पद आहे. संगीत, गाणी, वाद्ये, रांगोळी स्पर्धा, फराळ, माटोळी, देखाव्यांच्या स्पर्धा घेतल्या जातात. यामधून कलाकार घडत जातात. कलेला वाव मिळतो. कलावंतांना संधी मिळते. विविध गुणदर्शनाला संधी मिळते. गोव्यात हिडीस नृत्ये, डीजेची कर्णकर्कश संगीतातील गाणी असले प्रकार फारसे बघायला मिळत नाहीत. ही मोठी जमेची बाज! पर्यावरणाचे भान बहुतेक वेळा अजून तरी गोव्यात राखले जाते. सामाजिक जागृतता दिसून येते. सकारात्मक रीतीने गणेशोत्सवाकडे पाहिले जाते.भक्तिभाव, पावित्र्य राखण्याकडे कल दिसून येतो. तरीपण गोव्यात करोना आहे. सगळीकडे सारखाच आहे.त्यामुळे करोना काळातील निर्बंधांमुळे मोकळेपणा नेहमीसारखा मिळणार नाही.

आता या वर्षीचा गणेशोत्सव २०२०हा मात्र जुन्या नव्या कोणत्याही व्याख्येत बसणारा नाही. गणेशोत्सव पुढ्यात येऊन ठेपलाय पण यंदा कधी नव्हे इतकी समाजाची अवस्था गोंधळलेली आहे. सगळे रितीरिवाज परंपरा करोनाच्या संकटकाळी कसे पार पाडायचे? कारण करोनाच्या सुरक्षेचे सर्व नियम हे माणसाला एकलकोंडे करणारे आहेत. मुक्तपणे सर्वांनी एकत्र येणे त्यात निषिद्ध आहे. अगदी केवळ पूजा अर्चना करायची म्हंटली तरी भट गुरुजींनी घरोघरी यावे तरी कसे? म्हणजे पूजाविधी ऑनलाइन वर विश्वासून करावे लागणार. पण कुटुंबीय तरी दरवर्षीप्रमाणे सण एकत्र येऊन कसा साजरा करणार?

आता करोनाच्या या संकटकाळात गणेशोत्सव साजरा करताना बऱ्याच गोष्टींमध्ये बदल करावा लागेल. अॅडजेस्टमेंट करावी लागेल. आणि ती आपण कशी स्वीकारतो.. म्हणजे कायदे, स्वच्छतेचे सर्व नियम पाळून, सुरक्षित अंतर राखून आपण ते आनंदाने कसे पार पाडतो हे फार महत्त्वाचे ठरेल. परिस्थितीप्रमाणे तडजोड करावीच लागते.ती करुनही माणसाला मनाचे समाधान ढळणार नाही एवढे पहावेच लागेल. एकीकडे देवाचे पण मनासारखे झाले पाहिजे. आपण माणसांची गर्दी टाळली पाहिजे. दरवर्षीप्रमाणे आप्तांच्या गाठीभेटी, गप्पागोष्टी, विचारपूस, आपलेपणाने एकमेकांना मदत करणे, एकत्र जमून उत्सवाचा आनंद घेणे यावेळी नाईलाज झाला तरी टाळावेच लागेल. आपल्याच भल्यासाठी आहे ते! जे उपलब्ध होईल त्यात सण साजरा करायला आता शिकायलाच हवे नाही का?

गणपती बाप्पांनाच प्रार्थना करायची.. ‘सगळे तुम्हीच सांभाळून घ्या’ म्हणून! भक्तीने आर्जव केली की तो सांभाळून घेईल हे मात्र खरे! ।।ॐ गं गणपतये नमः।।

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com