खरी कुजबुज: गणेश गावकर नॉट रिचेबल

Khari Kujbuj Political Satire: सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी सभापतिपदाचा अवमान झाल्याबद्दल मंगळवारी उद्वेग व्यक्त केला. मडगावात त्यांनी पत्रकार परिषद संबोधित केली.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

गणेश गावकर नॉट रिचेबल

सुदीप ताह्मणकर यांची पोलिस तक्रार आणि व्हायरल झालेली ध्वनीफित याचा धक्का भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना बसला आहे. ती ध्वनीफित केव्हाची आहे, याचा शोध त्यांनी घेतला तेव्हा ती जुनी असल्याचे त्यांना समजले. मात्र, आमदार गणेश गावकर यांनी बोलताना मोन्सेरातचे नाव का घेतले हे त्यांना समजून आले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा नोकऱ्या देण्यासाठी म्हणे मोन्सेरात पैसे घेत नाहीत. त्यामुळे ते पैसे मधल्या मध्ये कोणी घेतले असावेत का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. गावकर यांनी तो आवाज आपला नाही, असा खुलासाही अद्याप केलेला नाही. प्रदेश भाजपसाठीही ते बुधवारी दिवसभर उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे नॉट रिचेबल गावकर यांनी भाजपसाठी नवी डोकेदुखी निर्माण केल्याची भावना प्रदेश पातळीवर तयार झाली आहे. ∙∙∙

तोवर बाण सुटला होता...

सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी सभापतिपदाचा अवमान झाल्याबद्दल मंगळवारी उद्वेग व्यक्त केला. मडगावात त्यांनी पत्रकार परिषद संबोधित केली. एक मंत्री तर आपला दूरध्वनीही स्वीकारत नसल्याचे त्यांनी खेदपूर्वक नमूद केले. तवडकर यांची दिल्लीपर्यंत वट आहे. गोव्यातील आदिवासींचे नेते म्हणून केवळ तवडकर यांचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठाऊक आहे याची कल्पनाही भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे पत्रकार परिषद संपल्यावर काही तासातच त्यांच्याशी प्रदेश भाजपकडून संपर्क साधण्यात आला. ‘गोमन्तक’मध्ये त्या आधी तवडकर यांची मुलाखत छापून आली होती. ती या नेत्यांनी वाचली होती. तवडकर तो विषय मुलाखतीनंतर थांबवतील, असे त्यांना वाटले आणि ते गाफील राहिले. तवडकर यांनी आपल्या मनातील खदखदीला वाट करून दिली. प्रदेश भाजपकडून संपर्क साधला जाईपर्यंत तवडकर यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले होते. ∙∙∙

गोविंदराव तुम्ही गैर तर बोलला नाहीत ना...

फर्मागुढीत उटाचा महामेळावा झाला खरा पण या महामेळाव्यात कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी जे भाष्य केले त्याची खरेच गरज होती काय, असाही सवाल आता आदिवासी एकमेकांना विचारू लागले आहेत. गोविंद गावडे यांनी या महामेळाव्याच्या व्यासपीठावरून सभापती रमेश तवडकर यांच्यावर नथीतून तीर मारला आहे. तवडकरांचे नाव न घेता गोविंदरावांनी आवेशपूर्ण भाषण केले, त्यामुळे साहजिकच सभापती महोदयांचे आदिवासी निकटवर्तीय दुखावले आहेत. खरेतर अशा मेळाव्यात एकतेचे दर्शन व्हायला हवे होते, पण तसे न घडता गोविंदराव गैर तर बोलले नाहीत ना...शेवटी रमेश तवडकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेतच, शिवाय ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. गावडेंपेक्षा ज्येष्ठ आहेत. एसटी समाजात त्यांची मोठी वट आहे. त्यांचा असा अपमान करणे उचित नव्हते, असा एकूण सूर ऐकू येतो. ∙∙∙

हाती आले धुपाटणे!

कुचेली कोमुनिदादच्या संपादित केलेल्या सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या घरांवर प्रशासकीय बुलडोझर फिरवण्यात आला. हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना काही भामट्यांनी लाखो रुपयांना गंडा घातला. या लोकांनी भीतीपोटी नक्की कुणाला पैसे दिले, याची कारवाई होईपर्यंत त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही. कारण घरावर कारवाई होईल याची भीती त्यांना भेडसावत होती. मात्र, अखेर कारवाई झालीच. अशावेळी या लोकांना कष्टाच्या पैशांवर पाणी सोडण्याची सध्या वेळ आली आहे. तसे पाहता हा महाघोटाळाच आहे. गरिबांची आर्थिक फसवणूक करणारे बिनधास्त मोकाट फिरत आहेत. अशावेळी सरकार या नात्याने गरिबांची फसवणूक करणाऱ्यांना न्याय मिळवून देणार का? हा प्रश्न आहेच. मात्र, या कारवाईनंतर सध्या लोकांची परिस्थिती म्हणजे ‘तेल गेले, अन् तूपही गेले, हाती धुपाटणे आले’ अशी झाली आहे. त्यामुळे सरकारने हस्तक्षेप करून किमान लोकांना पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यांच्या दुःखावर फुंकर मारल्यासारखे होईल... ∙∙∙

गणेशभाऊ गाेत्‍यात?

सध्‍या संपूर्ण गोव्‍यात ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा गाजत असताना एका वृत्तवाहिनीने एक बरीच जुनी ऑडिओ क्लीप व्‍हायरल करून सगळीकडे खळबळ माजवून दिली आहे. या ऑडिओत एक व्‍यक्‍ती दुसऱ्या एका व्‍यक्‍तीला तुझ्‍या नोकरीसाठी आपण मोन्‍सेरात नावाच्‍या व्‍यक्‍तीला जे सहा लाख रुपये दिले. ते पैसे परत कर, असे सांगताना ऐकू येते. हा आवाज नेमका कुणाचा हे जरी अजून स्‍पष्‍ट झालेले नाही, तरी तो आवाज सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांच्‍या आवाजाशी मिळता जुळता आहे. त्‍यामुळे असेल कदाचित आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्‍हणकर यांनी गणेशभाऊंच्‍या विरोधात कुळे पोलिस स्‍थानकात तक्रार दिली आहे. आता ही तक्रार नाेंद केली जाणार की नाही, ही बाब अलहिदा असली तरी काही दिवसांपूर्वी दूधसागर प्रवासी गाड्या प्रकरणामुळे वादात सापडलेले गणेशभाऊ आता या नव्‍या ऑडिओमुळे पुन्‍हा एकदा वादात सापडले आहेत.या ऑडिओची म्‍हणे भाजप नेत्‍यांनीही गंभीर दखल घेतल्‍याने भाऊ गोत्‍यात तर येणार नाहीत ना? अशी चर्चा सावर्डे मतदारसंघात रंगली आहे. ∙∙∙

भाजपचे ‘ओरिजनल’ कार्यकर्ते खूष!

जे झाले ते योग्य झाले व चांगले झाले, असे आता भाजपचे ओरिजनल ( दुसऱ्या पक्षातून न आलेले) कार्यकर्ते म्हणू लागले आहेत. ‘कॅश फॉर जॉब’ या महाघोटाळ्यामुळे सरकारच्या व भाजपच्या प्रतिमेला तडा गेला आहे, असे आम्ही नव्हे हेच भाजपचे ओरिजनल कार्यकर्ते म्हणतात.पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य केलेल्या कार्यकर्त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या नाहीत, मात्र ज्यांनी पैसे दिले त्यांना नोकऱ्या मिळाल्या. या प्रकरणात मोठमोठे मासे असल्याचे कार्यकर्तेच म्हणायला लागले आहेत. ज्यांनी पैसे घेतले त्यांच्याकडून वसुली करून नोकरीसाठी पैसे दिलेल्यांचे पैसे परत करण्याचे वचन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, ते आयोग्य असल्याचा दावाही भाजपा कार्यकर्ते करतात. खरे म्हणजे नोकरीसाठी पैसे घेणारा व पैसे देणारा दोघेही दोषी असल्याचा दावा भाजपा कार्यकर्ते करतात. ‘कॅश फॉर जॉब’ भाजप संस्कृतीच्या विरोधात असल्याचा आरोप भाजप कार्यकर्तेच करताहेत. ∙∙∙

‘कॅश फॉर जॉब’; काहींचे तेरी भी चूप, मेरी भी...

सध्या गाजत असलेल्या कॅश फॉर जॉब प्रकरणात अनेक बडी धेंडे गुंतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नोकरीसाठी एखाद्या गरजूकडून लाखो रुपये घेतल्यानंतर त्याला नोकरी देण्याची जबाबदारी ही पैसे घेणाऱ्यावर असल्यामुळे संबंधिताने हे पैसे बड्या राजकीय असो किंवा प्रशासकीय धेंडांकडे पोचवले असावेत, असाही कयास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्या धरपकड होत असल्याने आणि चौकशीतून नावे बाहेर येत असल्याने अनेकजण ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असा पवित्रा घेऊन गप्प आहेत. तिकडे मुख्यमंत्री जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, त्यांनी तर सरळ अशा लोकांना माफी नाही, असे ठणकावून सांगितल्यामुळे अशा प्रकरणात गुंतलेल्यांची घाबरगुंडी उडाली आहे, हे पण तेवढेच खरे. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

हा तर अतिरेकी पवित्रा!

गोव्‍यातील भाषावाद संपवून सर्व गोवेकरांना एकत्र आणण्‍यासाठी पाहिजे तर मराठी आणि रोमी लिपीलाही राजभाषा कायद्यात स्‍थान द्यावे, अशी भूमिका ज्‍येष्‍ठ विचारवंत दत्ता नायक यांनी मांडल्‍यानंतर काही देवनागरी समर्थक नेत्‍यांनी दत्ता नायक यांच्‍या विरोधात एकप्रकारे उपटसुंभ मोहीम हाती घेतली आहे, असे वाटते. त्‍यात स्वतःला कोकणीचे भिष्माचार्य समजणाऱ्या उदय भेंब्रे यांचाही समावेश आहे. काल एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया देताना भेंब्रे यांनी दत्ता नायक यांच्‍यावर टीका करताना, ‘ही तर तत्‍वशून्‍यता’ अशी प्रतिक्रिया दिली. याचा समाचार क्‍लिओफात कुतिन्‍हो यांनी काल ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात घेतला. ते म्‍हणाले, १९३९ साली कोंकणी परिषदेने कदाचित एक भाषा एक लिपी हे तत्‍व स्‍वीकारले असेलही. पण आता परिस्‍थिती बदललेली आहे. सर्वसमावेशकता ही सध्‍याची गरज आहे. अशा परिस्‍थितीत विविधतेला विरोध करणारी उदय भेंब्रे यांची ही भूमिका काही प्रमाणात अतिरेकी (फॅनेटिक) अशीच वाटते, असे स्‍पष्‍ट मत त्‍यांनी मांडले. असे हे सर्वसमावेेशकता तत्त्व कोंकणी नेत्‍यांच्‍या पचनी पडेल का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com