गणराया...दूर कर हे कोरोनाचे विघ्न!

ganesh2
ganesh2

नरेंद्र तारी

कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचा सर्वांत मोठा गणेश चतुर्थीचा उत्सव पंधरवड्यावर आला आहे. यंदाची चतुर्थी मर्यादित स्वरुपात असेल हे नक्की, पण प्रत्येकाने खबरदारी ही घ्यायलाच हवी आणि सरकारने आताच मार्गदर्शक सूची जाहीर करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

कोरोनाचे पुराण काही संपता संपेना. आता पंधरवड्यावर गणेश चतुर्थी आली आहे. राज्यातील सर्वांत मोठा आणि उत्साहाचा हा सण. गावभर आणि देशभर विखुरलेल्या कुटुंबाला एकत्रित आणणारा हा सामाजिक बांधिलकी जपणारा गणरायाचा उत्सव. ब्रिटिश राजवट उलथून टाकण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना राबवली आणि यशस्वीही केली. आज सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना देशातील विविध राज्यात यशस्वीरीत्या रूजली आहे. कारण जात, धर्म, पंथ विसरून सगळेजण एकत्रित येऊन गणेशोत्सव साजरा करतात. उच नीचतेचा भाव इथे नसतो. पण, यंदा हे शक्‍य नाही. कारण, कोरोनाच्या महामारीचे सावट समोर उभे ठाकले असल्याने वैयक्तिक घरोघरी पूजला जाणारा गणपती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बऱ्याच अंशी बदलले जाणार आहे.

कोरोनाचा जागतिक पातळीवरचा धोका दूर झालेला नाही, आणि कोरोनाला सोबत घेऊन जगण्याशिवाय पर्याय नाही, हेही लोकांना माहीत झाले आहे. तरीपण सगळी भीस्त सरकारी यंत्रणेवर असल्याने कोरोनाच्या या महामारीत सरकारी यंत्रणेकडून दिलासा मिळणे आवश्‍यक आहे. पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका फार पूर्वीच व्यक्त करण्यात आला होता. तो खराही ठरला आहे, कारण राज्यातील बळींचा आकडाही पन्नाशी पार करून गेला आहे. गोव्यातच नव्हे तर देशात सगळीकडे हीच स्थिती आहे. कोरोनावरील लस शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा चालली आहे, मात्र दिलासा अजून मिळत नाही. आणखी किती दिवस वाट पहायची, हा विचार मेंदू कुरतडून टाकतोय, अशा परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण ठेवणे तरी आपल्या हाती आहे, त्यामुळे अजूनही आपण समंजसपणे आणि निर्धारपूर्वक जर कोरोनाच्या नियंत्रणासाठी नीतिनियम पाळले तर बऱ्याच अंशी कोरोनाला रोखू शकतो.

यंदाचा गणेशोत्सव हा लवकर आला आहे. पंधरवड्यावर चतुर्थी ठेपली आहे. बाजारात खरेदीसाठी नाही म्हटले तरी गर्दी होणार ही अटकळ बांधायलाच हवी. कोरोना संक्रमणाच्या काळात यंदाची चतुर्थी साधेपणाने साजरी होईल, हे मान्य, पण चार लोकांच्या चार तऱ्हा, त्यामुळे कोण कसा या सणावेळी वागेल, कोण कितपत उत्सवावर निर्बंध घालेल हा खरा प्रश्‍न आहे. मागे सरकारने तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला तर बाजारात चतुर्थीच्या खरेदीसारखी ही गर्दी. कुणाला काहीच पडलेले नाही. जो तो महिन्याभराची लॉकडाऊन असल्यासारखी घाई करीत असल्याचे निदर्शनास आले. अशा परिस्थितीत आता चतुर्थीच्या खरेदीसाठी जर आपण अशीच गर्दी केली, काहीही बिघडत नाही, म्हणून खबरदारी घेतली नाही, तर कोरोनाचा वाढलेला आकडा हातापार जाईल, हे नक्की.

सरकारकडून अजून तरी गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा करायचा, यासंबंधीची मार्गदर्शक सूची जाहीर झालेली नाही. घरोघरचे गणपती सोडाच, पण निदान सार्वजनिक गणेशोत्सवांच्याबाबतीत सजग राहणे आवश्‍यक आहे. सुदैवाने सरकारी सूचीअगोदरच केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील विविध भागात साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वतःहून काही निर्णय घेतले आहेत, काही निर्बंध घातले आहेत. हे निर्णय आणि निर्बंध कोरोनाची महामारी समोर ठेवून घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे अशा मंडळांचे अभिनंदन करणे आवश्‍यक आहे. राज्यातीलही बऱ्याच गणेशोत्सव मंडळांच्या मागच्या पंधरवड्याभरापासून बैठका होत आहेत. या बैठकांतील वृत्तान्‍त पाहिला तर काही मंडळांच्या बैठकांत अजूनही उत्सव साधेपणाने आणि कमी दिवसांचा साजरा करण्याबाबत एकवाक्‍यता झालेली दिसत नाही, अशा वेळेला सरकारी मार्गदर्शक सूचीच काम करू शकते, म्हणून शक्‍य तेवढ्या लवकर सरकारने ही मार्गदर्शक सूची जाहीर करण्यासाठी कार्यवाही करायला हवी.

सरकार काय सांगेल तेव्हा सांगेल, पण आपण स्वतः जबाबदारीने वागले पाहिजे, अशी भूमिका बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी घेतली आहे. मुंबईसारख्या भागात ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवात धूम असते, त्या ठिकाणी यंदा काही मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करता सहा महिन्यांनंतर येणाऱ्या माघी गणेश जयंतीला गणपतीपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या मंडळाने तर यंदा सर्व कार्यक्रमांना फाटा देताना आरोग्यविषयक उपक्रम साकारून रक्तदान तसेच अन्य आरोग्यासाठी उपयुक्त कार्यक्रमांवर भर दिला आहे. भल्या मोठ्या मूर्तींच्या जागी चार फुटांच्या मूर्तीला प्राधान्य दिले आहे. अन्य ठिकाणीही अशीच स्थिती आहे. फक्त भाविकांवर नियंत्रण ठेवायचे कसे, हा खरा प्रश्‍न आहे, आणि त्यासाठी प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने प्रभावी अंमलबजावणी करण्याची आज खरी गरज आहे.

गोव्याच्या शेजारच्या कोकणातील गणेशोत्सव तर आगळावेगळा. पुण्या, मुंबईसह इतर मोठ्या शहरात असलेले कोकणवासी गणपतीसाठी गावात येतात. त्यासाठी महिन्याभरापूर्वीच तयारी केली जाते, पण यंदा तसे होणार नाही. मागच्या वेळेला मुंबईहून कोकणात परतलेल्या बहुतेक चाकरमान्यांनी कोरोनाचा संसर्ग गावातील लोकांना दिला, त्यामुळे चतुर्थीसाठी यंदा सजग राहणे हे गरजेचे ठरले आहे. कोकण कशाला गोव्यातही काही अंशी अशीच स्थिती आहे. गावाकडे असलेल्या चार भावांपैकी तीन भाऊ वेगवेगळ्या शहरात नोकरीधंद्यानिमित्त स्थायिक झालेले आहेत. चतुर्थीसाठी हे तीनही भाऊ मूळ घरी परततात, पण यावेळेला घरी परतताना कोरोनाला सोबत घेऊन आले तर...! हा विचार गावातील मंडळींना सतावत आहे.

गणेशोत्सवातील पूजाविधीचे सोपस्कारही यावेळेला पुरते बदललेले असतील. गोव्यात घरोघर जाऊन गणेशपूजन करणाऱ्या भटजींनी एक बैठक घेऊन यंदा कुणाच्याही घरी पूजनासाठी जायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. एकाअर्थी हा निर्णय योग्य असाच आहे, पण गावातील काही ‘विद्वान’ मंडळींकडून अजूनही पूजेसंबंधी खल होत आहे. हे धर्माला अनुसरून आहे काय, ते धर्माला मान्य आहे काय, यासंबंधीचा हा खल ग्रामपातळीवर लोकांकडून होत असल्याने उगाच नाहक चर्चेला तोंड फुटत आहे. त्यामुळे भटजींकडून ऑनलाईन किंवा पूजेसंबंधीची कागदोपत्री समग्र माहिती उपलब्ध करून यजमानांकडून गणरायाची पूजा करण्यासंबंधीचाही विचार जोर धरत आहे, जे सध्याच्या परिस्थितीला अनुरूप आहे. शेवटी प्रत्येकाच्या मानण्यावर असते हो..! परमेश्‍वर आपल्याला हे कर आणि ते कर, म्हणून कधीच सांगत नाही, आपण आपल्यापरीने देवाला खूश करण्यासाठी नानाविध तऱ्हा करतो. आणखी काय...! शेवटी आस्तिक आणि नास्तिक नावाचे दोन प्राणी आहेत. प्रत्येकजण आपल्या म्हणण्यावर ठाम असतो, त्यामुळे कुणाचे म्हणणे खोडून काढणेही शक्‍य होत नाही. शेवटी ज्याचे त्याचे मत, मानण्यावर असते.

न भुतो न भविष्यती अशी पाळी आज लोकांवर आली आहे. कोरोनाची भीती, दुसरीकडे बेरोजगारी, खिशात पैशांची चणचण अशा स्थितीत कोरोनाचा मुक्काम किती दिवस लांबेल हे कुणी सांगू शकत नाही. त्यामुळे शक्‍य तेवढी काळजी घेणे हे आपल्या हाती आहे. त्यासाठी मनाची तयारीही तेवढीच महत्त्वाची असते. दरवर्षीप्रमाणे यंदा चतुर्थीचा थाट असणार नाही. आपणच तो मर्यादित करायला हवा. खरेदीसाठी गर्दी रोखली पाहिजे, संसर्गाचा धोका टाळला पाहिजे. कोरोनाची महामारी दूर होईलही. विघ्नहर्ता म्हणून आपण गणरायाला पूजतो ना..! मग यंदाच्या चतुर्थीनंतर सगळ्या जगावर आलेले हे विघ्न निश्‍चितच दूर होईल, नक्कीच हे वाईट दिवसही सरतील. सरकार आपल्यापरीने काम करतच राहणार आहे, त्यामुळे सरकारच्या नावाने ‘मोले घातले रडाया’ म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने घ्यायला हवी काळजी आणि वागायला हवे, जबाबदारीने!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com