निवृत्ती शिरोडकर
आपल्याला हात-पाय नाहीत म्हणून देवाला आणि नशिबाला दोष न देता जे परमेश्वराने दिले आहे, त्यातूनच आपली ओळख जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर दाखविणारी सुकाळे-कोरगाव येथील फुलराणी शंकर किनळेकर हिचे कौतुक करावे तेवढेच थोडे. या युवतीने अपंगत्वावर मात करून परिस्थितीला झुकविले आहे.
फुलराणी किनळेकर हिने बारावीपर्यंत शिक्षण बोर्डिंगमध्ये राहून घेतले. त्यानंतर तिने ओल्ड गोवा येथे कंत्राटी पद्धतीवर एका सरकारी शाळेत शिक्षकी पेशा स्वीकारला. परंतु कंत्राट संपल्यानंतर तिला नोकरीपासून दूर राहावं लागलं. तिने आपल्याकडे असलेल्या कलेतून शिवणकाम आणि इतर कला अपंग असूनही जोपासल्या व आपलं जीवन इतरांसाठी आदर्श बनावं यासाठी प्रयत्न केले.
आज तिला मदतीची गरज आहे. दोन्ही कृत्रिम पाय झिजून गेलेले आहेत. तिला पुन्हा या कृत्रिम पायांची गरज आहे. सरकारनेही तिच्या अपंगत्वावर मात करण्याच्या धडाडीचे कौतुक करून तिला अनुकंपा योजनेअंतर्गत रोजगार मिळवून द्यावा, अशी मागणी तिच्या आईने केली आहे.
फुलराणीच्या घरची आर्थिक स्थिती खूपच कमकुवत आहे. ती रोजगारासाठी घराबाहेर पडू इच्छिते. पण नोकरी नाही. मला सरकारी नोकरी देणे सरकारला जमत नसेल तर माझा भाऊ सुशिक्षित आहे. निदान त्याला तरी सरकारने नोकरी देऊन माझ्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मदत करावी, अशी आर्त हाक फुलराणीने मारली आहे.
दुःख किती म्हणून वाट्याला यावं?
याबाबत बोलताना फुलराणीच्या आईने सांगितले की, माझी मुलगी जन्मताच अपंग. तिला दोन्ही हात नाहीत व दोन्ही पायही नाहीत. तरी देखील तिने स्वतःची ओळख समाजात तयार केलेली आहे. आज तिला पूर्णपणे मदतीची गरज लागते. सरकारने आम्हाला न्याय द्यावा, असे सांगताना त्या माऊलीला आपल्या डोळ्यांतील अश्रू लपवता आले नाहीत. दुःख किती म्हणून वाट्याला यावं? दुःखालासुद्धा काही मर्यादा असतात, असेही ती म्हणाली.
केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येक घराचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतु अपंगत्वावर मात करणाऱ्या फुलराणी किनळेकर हिला अजूनपर्यंत सरकारने कोणताच आधार दिलेला नाही. तो दिला असता तर तिच्या घराला थोडाफार हातभार लागला असता.
- सीमा बेहेरे, मानवाधिकार संघटन राज्यप्रमुख
माझ्या नशिबात जे आलं आहे, जी आव्हाने आलेली आहेत, त्यास मी जिद्दीने तोंड देणार आहे. माझं ओझं माझ्या आईवर किंवा भावावर मला नको आहे. म्हणूनच मला रोजगार हवा आहे. मी परिस्थितीपुढे झुकणारी नाही. काही ना काही करत राहून कुटुंबाला हातभार लावणार. माझा भाऊ सुशिक्षित असूनही त्यालाही नोकरी नाही. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतेय.
- फुलराणी किनळेकर, सुकाळे-कोरगाव
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.