खाद्यभ्रमंती : अस्सल मॅक्सिकन ‘फ्रिडा कँटिना’

आपल्या सुदैवाने पणजीत - मिरामार रस्त्यावर ‘फ्रिडा कँटिना’ आहे, जे अस्सल मॅक्सिकन पदार्थांसाठी नावाजलेले आहे. चवीने खाणाऱ्याला चवीचे खायला मिळाले की काय होते तसे आमचे इथे गेल्यावर झाले.
Frida Cantina Panjim Goa
Frida Cantina Panjim GoaDainik Gomantak

मिरामार रस्त्यावरून जाताना सतत होणारे बदल डोळ्यांना जाणवतात. ‘फ्रिडा’ नावाची पाटी कायम लक्ष वेधून घ्यायची. रेस्टोरंट आहे हे दिसत होते, पण फ्रिडाच्या नावाने रेस्टोरंट म्हणजे नक्कीच मॅक्सिकन रेस्टोरंट असू शकते असे वाटायचे.

फ्रिडा काऊलो ही मॅक्सिकन. जगविख्यात चित्रकार. तिची ‘सेल्फपोट्रेट’ प्रसिद्ध आहेत. अशक्य असे जीवन ती जगली. फ्रिडा नाव उच्चारताच माझ्यासमोर तिचेच रूप, तिचीच चित्रे येतात. तिच्यासाठी म्हणून मिरामारच्या ‘फ्रिडा कँटिना’मध्ये जायचे असे ठरवले होते. काहीतरी वेगळे खाऊया म्हणून एकदा आम्ही फ्रिडामध्ये गेलो.

रात्रीची वेळ होती. सुंदरशा वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर हळू आवाजात लावलेले संगीत आवडले. बऱ्यापैकी गर्दी होती पण कोलाहल नव्हता. मॅक्सिकन पदार्थांची माझी ओळख टाको - टॉर्टियापर्यंतच होती. मिरामारच्या ‘फ्रिडा कँटिना’मध्ये जाणे म्हणजे एका वेगळ्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून घेण्यासारखे झाले.

अशा प्रकारच्या रेस्टोरन्टमध्ये गेल्यावर म्हणजे तिथल्या पदार्थांबद्दल फार माहिती नाही, ते पदार्थ कधी खाऊन बघितले नाहीत अशा रेस्टोरंटमध्ये गेल्यावर सरळ त्या रेस्टोरंटच्या शेफ किंवा मॅनेजरला बोलावून तिथे मिळणारे विशेष पदार्थ कोणते, हे जाणून घेते. फ्रिडा कँटिनामध्ये गेल्यावर आम्ही तेच केले.

आम्ही कधीच मॅक्सिकन पदार्थ खाल्ले नव्हते. ‘मॅक्सिकन पदार्थांची चव कळेल असे काही पदार्थ सुचवा’ असे आम्ही तिथल्या मॅनेजरला सांगितले. त्याने जी काही पदार्थांची नावे सांगितली तीदेखील आम्ही पहिल्यांदाच ऐकली. ऋत्विक कामत हे फ्रिडा कँटिनाचे मालक. ते त्या दिवशी बाहेरगावी गेले होते, पण मॅक्सिकन पदार्थांमध्ये जास्तच रस घेतेय म्हटल्यावर मॅनेजरने माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले.

मॅक्सिकन रेस्टोरंटच का सुरू केले, हा मला प्रश्न पडला होता. त्यांच्याशी फोनवर बोलताना या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ऋत्विक आणि त्यांची पत्नी बरीच वर्षे टेक्सासला होते. दोघांनाही मॅक्सिकन पदार्थ आवडतात. त्यांचे मॅक्सिकन पदार्थांवरील प्रेम त्यांच्या या ‘फ्रिडा कँटिना’मधून व्यक्त होते. टोस्टाडा / तोस्तादा या पदार्थांची नावे अशी की समोर काय येईल असे वाटत राहते. फ्रिडामधल्या मॅनेजरने आम्हांला टोस्टाडाचे संपूर्ण वर्णन करून सांगितले होते म्हणून आम्ही निश्चिंत होतो. तर टोस्टाडा हा प्रकार टॉर्टिला म्हणजेच मक्याची छोटीशी पोळी -चपातीपासून बनवला जातो आणि टोस्टाडाचा अर्थ ‘टोस्ट’ केलेला. मक्यापासून बनवलेल्या छोट्याशा पोळीला छान कुरकुरीत करून त्यावर वेगवेगळ्या प्रकारची चटपटीत मिश्रणे घातली जातात.

टॉर्टिला गव्हाच्या पिठाचीदेखील बनवतात पण टोस्टाडासाठी ती मक्याचीच वापरतात (कुरकुरीत व्हावी म्हणून). मी चिकन खात नाही म्हणून आम्ही प्रॉन्स असलेले टोस्टाडा आणायला सांगितले. समोर जी काही कलाकुसर केलेली डिश आली ती आम्ही बघतच राहिलो. छान कुरकुरीत केलेल्या टॉर्टिलावर बारीक चिरलेल्या जांभळा कोबी, टोमॅटो, कांदा यांच्यासोबत ऑलिव्ह, थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि बटर फ्राईड प्रॉन्स सेट करून या सगळ्यावर कॉटेज चीज घातले होते.

टॉर्टिलाचा कुरकुरीतपणा, कोबी-कांदा-टोमॅटो यांची मिश्र अशी आंबट गोड- तिखट चव, या सगळ्यात प्रॉन्स आणि कॉटेज चीजमुळे आलेला मुलायमपणा हे सगळे एक वेगळा अनुभव देणारे होते. एकावेळी अनेक चवींचा संगम होता. टाको विथ रेड स्नॅपर फिश मॅनेजरच्या लक्षात आले की आम्ही चवीने खाणारे आहोत. तो अधूनमधून येऊन आम्हांला वेगवेगळ्या पदार्थांची, त्यात वापरण्यात येणाऱ्या घटकांची माहिती देत होता. त्यानेच सुचवले म्हणून आम्ही टाको खायचे ठरवले. पण यात आम्हांला फिश असलेले फिलिंग (टाकोसोबत खाण्याचे मिश्रण) हवे होते. त्या दिवशी त्यांच्याकडे फ्रेश रेड स्नॅपर होता.

टाको आणि तामसो ही संगती छान वाटली. टाको हा मॅक्सिकोतला महत्त्वाचा पदार्थ. मक्याची पोळी आणि त्यात वेगवेगळ्या कच्च्या भाज्या, कांदा -टोमॅटो, वेगवेगळे बीन्स, चीज, अवाकाडो, लिंबाचा रस, मॅक्सिकन मिरची असे सगळ्यांचे मिश्रण असते. थोडक्यात काय तर आपल्याकडे जशी कोशिंबीर करतात तसाच प्रकार असतो. मग त्यात मुख्य घटक म्हणजे फ्राय फिश किंवा चिकन किंवा पोर्क असे काहीही निवडू शकता. आम्ही तामसो म्हणजे रेड स्नॅपरला निवडले होते. हा पदार्थदेखील फार आवडला. यापूर्वी एक दोन वेळा टाको खाल्ले होते, पण ‘फ्रिडा कँटिना’मधले टाको एकदम खात्रीलायक वाटले.

केसाडीला पदार्थ आम्ही मुद्दाम खाऊन बघावा असा शेफने येऊन आग्रह केला. खरे तर आधीचे दोन्ही पदार्थ खाऊन पोट भरले होते. पण शेफने फारच आग्रह केला. केसाडीलादेखील प्रसिद्ध आणि मागणी असणारा पदार्थ असून लोकांनी आपापल्या कल्पकतेने यात बदल केले आहेत. खुद्द मॅक्सिकोमध्ये हा पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. या पदार्थाचा बेसदेखील टॉर्टिला - मक्याची किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेली चपाती आहे.

टॉर्टिला अर्ध्यामध्ये दुमडले जाण्याइतपत मऊ करण्यासाठी गरम करतात आणि नंतर त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मिश्रण भरले जाते. जसे आपण पराठ्यात भरतो तसे. हे मिश्रण ओक्साका चीज ( क्वेसो ओक्साका ), पास्ता फिलाटा (फेटलेले दही) यांच्यामध्ये घालून केसाडीला बनवले जाते. ओक्साका हे एक कडक मेक्सिकन असून ते चीज पूर्णपणे वितळेपर्यंत केसाडीला मंद आचेवर बनवतात. तेलचा वापर नसतो. अनेकदा केसाडीला हिरव्या किंवा लाल साल्सासोबत सर्व्ह करतात. यामध्ये शिजवलेल्या भाज्या, जसे की चोरिझो, शिजवलेले मांसाचे विविध प्रकार, चिकन, चिरलेला कांदा, टोमॅटो, सेरानो चिली आणि कोथिंबीर,साल्सा अशा तर्‍हेतर्‍हेच्या मिश्रणाने केसाडीला बनतो.

प्लेटमध्ये आलेले त्रिकोणी केसाडीला बघून मला पटकन पराठ्यांची आठवण आली. पण चव पराठासारखी अजिबात नव्हती. ओक्साका चीजमुळे यातील मिश्रणाला फार वेगळीच चव आली होती.

ऋत्विक कामत यांनी ‘फ्रिडा कँटिना’मधल्या मॅक्सिकन पदार्थांच्या दर्जात कुठेही तडजोड केली नाही. मॅक्सिकन पदार्थ बनवण्यासाठी लागणारी मॅक्सिकन मिरची, कॉर्न माथा (मक्याचे ताजे दाणे भिजत घालून ते वाटून सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले पीठ) असे वैशिष्ट्यपूर्ण घटक ऋत्विक थेट मॅक्सिकोवरून मागवतात.

मॅक्सिकन मिरच्यांशिवाय साल्साला ती टिपिकल चव येणार नाही. अगदी पक्की मॅक्सिकन चव असलेले पदार्थ खायला मिळाले पाहिजे हीच यामागची ऋत्विक कामत यांची धडपड आहे. आपल्या सुदैवाने पणजीत - मिरामार रस्त्यावर ‘फ्रिडा कँटिना’ आहे, जे अस्सल मॅक्सिकन पदार्थांसाठी नावाजलेले आहे.

चवीने खाणाऱ्याला चवीचे खायला मिळाले की काय होते तसे आमचे इथे गेल्यावर झाले. भरपूर खाऊन आणि तृप्त मनाने बिल देऊन आम्ही तिथून समाधानाने बाहेर पडलो. ती रात्र माझी आवडती मॅक्सिकन चित्रकार फ्रिडा काऊलोची आठवण जागवणारी होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com