Flashback 2022 : गोव्याच्या सांस्कृतिक विश्वात वर्षभरात चर्चेत राहिलेल्या घटना

वर्ष संपता संपता राजधानी पणजी शहर विविध कलांच्या आविष्काराचे बिलोरी झुंबर बनले होते. अदभुत सादरीकरणांद्वारे अंगोपांग तृप्त करणाऱ्या सेरेंडिपिटी कला महोत्सवाच्या बोटाला धरून वर्ष समाप्तीच्या रेषेवर पोचावे, यासारखे ‘कॅथार्टिक’ समाधान दुसरे कुठले असेल?
Serendipity Art Festival
Serendipity Art Festival Dainik Gomantak

सेरेंडिपीटी कला महोत्सवाला तरुण रसिकांची लाभणारी मोठ्या संख्येतली उत्साही हजेरी, हे त्या महोत्सवाचे यश मोजण्याचे सर्वांत महत्त्वाचे परिमाण मानायला हवे. नाट्य-नृत्य-संगीत-चित्रकला-पब्लिक आर्ट-पाककला या साऱ्या कलांचा हा चित्तवेधक संगम-सोहळा होता. वर्षभरात गोव्यात आयोजित झालेल्या महोत्सवांमध्ये हा महोत्सव सर्वच बाबतीत उच्च दर्जाचा ठरला.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI)

पैशांच्या वारेमाप पाठबळावर दिसा-मासा-वर्षांनी वाढत जाणाऱ्या या महोत्सवाचे यंदाचे अंदाजपत्रक विक्रमीच होते. बाकी, या महोत्सवासाठी होणाऱ्या पैशांच्या उधळपट्टीने नेमके काय साध्य होत असते, याबद्दल सामान्यजन अनभिज्ञ असले तरी तिच्या आयोजनाशी संबंधित असलेली मंडळी मात्र अंदाजपत्रकाच्या फुगणाऱ्या आकड्यांवर बेहद खुश असतात. अर्थात, सिनेमाशी संबंध राखून असणाऱ्या प्रेक्षकांना यंदा या महोत्सवात दर्जेदार चित्रपट पाहायला मिळाले, याबद्दल दुमत नसावे.

जाता जाता वादाचे गालबोट

इफ्फीच्या स्पर्धा विभागाच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष नादाव लापीड यांनी ‘दि काश्मीर फाइल्स’ या विवादास्पद सिनेमाला महोत्सवाच्या स्पर्धा विभागात स्थान दिल्याबद्दल केलेली टीका ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजवणारी ठरली. ‘राजकीय प्रचारपट’ आणि ‘अशिष्ट’ (वल्गर) अशा शब्दांत, महोत्सवाच्या समारोप समारंभाच्या मंचावरून केलेली ही टीका अनेकांच्या जिव्हारी लागली, तर काहींनी त्याचे समर्थनही केले.

काणकोणचा ज्ञानवर्धक लोकोत्सव

आदिवासी लोककलाकारांचा सहभाग असणारा काणकोणचा लोकोत्सव हा त्यातील लोककलांच्या आणि पारंपरिक ज्ञानप्रदर्शनाने दरवर्षी लोकांना आकर्षित करत असतो. यंदाच्या महोत्सवात देखील लोककला, वनौषधी प्रदर्शन, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला, कंदमुळे प्रदर्शन, स्थानिक साहसी खेळ इत्यादी वैशिष्ट्यांची रेलचेल होती. त्यामुळे यंदाचा हा लोकोत्सवही दरवर्षीप्रमाणे उपस्थितांना समाधान देणारा ठरला.

तियात्रांसाठी ‘थोडा गम, थोडी खुशी’

कोरोनाची दोन वर्षे सर्वात अधिक मारक ठरली ती गोव्यातील तियात्र कलाकारांसाठी. कोरोना काळात त्यांची ससेहोलपट झाली. कामचलाऊ मदतीचे आश्वासन देणाऱ्या कला आणि संस्कृती खात्याने आपल्या त्या आश्वासनाला सराईतपणे हरताळ फासला. या वर्षात सुरू झालेल्या तियात्रांमुळे अनेक तियात्रिस्टांच्या जीवात जीव आला असला तरी नाट्यगृहांची अनुपलब्धता, हा सर्वात मोठा अडथळा तर अजूनही दूर झालेला नाही. कला अकादमीची दुरुस्ती, मडगावच्या रवींद्र भवनात असलेल्या वातानुकूलित व्यवस्थेचा खेळखंडोबा, दुरावस्थेमुळे वास्कोच्या रवींद्र भवनचे बंद असणे अशाच अडथळ्यांच्या वाटेवरूनच अजूनही तियात्र आपली वाटचाल करते आहे.

तियात्रांमधली ‘सेंच्युरी’

‘किंग ऑफ सेंच्युरी’ अशी उपाधी लाभलेल्या रोजफर्न या प्रसिद्ध तियात्र दिग्दर्शक-निर्मात्याने ‘आमचे मोदे जियेता’ हा आपला शंभरावा तियात्र यावर्षी 21 ऑगस्ट रोजी रंगमंचावर आणला. 100 तियात्रांचे लेखन, दिग्दर्शन व निर्मिती करणारा रोजफर्न हे इतिहास मधले पहिले तियात्रिस्ट ठरले.

Serendipity Art Festival
Flashback 2022 : गोव्याच्या खाण व्यवसायात वर्षभरात काय घडलं?

‘सुनापरान्त’, ‘मोग’चे महत्त्वपूर्ण योगदान

खासगी पातळीवर सातत्याने दर्जेदार कला प्रदर्शने, संवाद, चर्चासत्रे घडवून आणणाऱ्या गोव्यातल्या आणखी दोन संस्था म्हणजे आल्तिनो, पणजी येथील ‘सुनापरान्त गोवा सेंटर फॉर द आर्टस्‌’ आणि पिळर्ण येथील ‘म्युझियम ऑफ गोवा’ (मोग). आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कलाकारांच्या कलाकृतींची प्रदर्शने तर ‘सुनापरान्त’मध्ये यावर्षी एका मागोमाग एक आयोजित झाली. ही सारी प्रदर्शने अनोखी व समकालीन जागतिक चित्रकलेची ओळख करून देणारी होती.

‘मोग संडे’चा प्रभाव कायम

रोहित चावला या जगप्रसिद्ध छायाचित्रकाराच्या पोर्ट्रेट छायाचित्र प्रदर्शनाद्वारे ‘मोग’मधील उपक्रमांची सुरुवात यावर्षी झाली. जागतिक दर्जाचे गोमंतकीय चित्रकार एफ. एन. सोझा यांच्या चित्रांचे प्रदर्शनही ‘मोग’मध्ये आयोजित केले गेले. ‘मोग संडे’ या त्यांच्या उपक्रमात दर रविवारी वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या प्रतिभावंतांच्या व्याख्यानातून नव्या विचारांची ओळख श्रोत्यांना होत असते. ‘मोग संडे’चा प्रवाह वर्षभर चालू राहिला.

संगीत क्षेत्रात ‘स्वस्तिक’चा ठसा

पणजीतील ‘स्वस्तिक’ ही संस्था सातत्याने दर्जेदार संगीत कार्यक्रम घडवून आणते. त्यांच्या ‘दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत समारोह’ची प्रतिक्षा गोमंतकीय रसिकांना असते. यंदाही हा महोत्सव प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत पार पडला. या संस्थेमार्फत दरवर्षी आयोजित होणाऱ्या ‘स्वरयज्ञ’ तसेच त्यांच्या संजीवन अकादमीतर्फे होणाऱ्या ‘परंपरा’ या मासिक कार्यक्रमांनाही भरभरून प्रतिसाद लाभला.

सरकारी पातळीवर मात्र तेच ते

कला अकादमी आणि कला सांस्कृतिक संचालनालय या गोमंतकीय कला क्षेत्रात वावरणाऱ्या दोन उच्चस्तरीय सरकारी संस्था. ‘कलेच्या जोपासनेसाठी आणि विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’ हे वाक्य त्यांचे सर्वाधिकारी नित्य फेकत असतात; पण ठरलेल्या वार्षिक स्पर्धा घेणे व ठरलेलेच वार्षिक महोत्सव आयोजित करणे यापुरताच त्यांचा कलेशी वेळापत्रकी संबंध राहिला आहे. त्यानुसार यंदाही त्यांनी कर्तव्य धारणेने त्यांचे सारे कार्यक्रम पार पाडले. ‘प्रयोगसांज’ हा कला आणि संस्कृती खात्याचा एक चांगला उपक्रम आहे. तो नित्यनेमाने पार पडतो इतकेच.

शहाण्याने चढू नये, न्यायालयाची पायरी पण...

कला अकादमीच्या ‘कॉलेज ऑफ थिएटर आर्ट’च्या प्रभारी प्राचार्यांना एका अनिष्ट कारणाने पदच्युत व्हावे लागले, ही लाजीरवाणी घटना यंदा घडली. एका भ्रष्ट कार्यपद्धतीचेच ते उदाहरण होते. कला अकादमीच्या अखत्यारीत येणाऱ्या कलाशिक्षण व्यवस्थेत जो गोंधळ पूर्वीपासून चालत आला आहे, त्याचाच तो परिपाक होता. न्यायालयापर्यंत गेलेले हे पहिलेच प्रकरण जरी असले तरी आणखीही काही प्रकरणे न्यायालयापर्यंत जाऊ शकतात, अशीही शक्यता आहे. ज्या प्रकारे, आदल्या ‘नाट्य डिप्लोमा कोर्स’ची वाताहत होऊन तो बंद झाला, तोच प्रकार कॉलेजचा कारभार जबाबदारीपूर्वक सांभाळला गेला नाही तर पुन्हा घडण्याची शक्यता आहे. खरे तर या कॉलेजची जबाबदारी सरकारने आपल्या हाती घेऊन त्याला योग्य दिशा देणे ही काळाची अत्यंत आवश्यक गरज बनली आहे. कला अकादमीची नाट्य रिपर्टरी कंपनी बंद पडल्यातच जमा आहे. ही देखील आणखीन एक दुर्दैवी गोष्ट आहे. कला अकादमीची वास्तू येत्या वर्षात नवीन रूप घेऊन येते आहे. तिच्या नव्या रूपाबरोबरच अकादमीच्या कार्यपद्धतीतही स्वागतार्ह बदल घडेल काय हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com