वास्को: मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी मच्छीमारांच्या मागण्यांचे निवेदन मत्स्य व्यवसाय मंत्री निळकंठ हळर्णकर यांना दिले. या निवेदनात मच्छीमारांची घरे नियमित करणे, रॅम्प उभारणे, अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्या, लोडिंग पॉईंट्स, जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी शेड, तसेच समुद्रात येणारे सांडपाणी समस्या सोडवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची विनंती केली.
मत्स्य व्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी संपूर्ण गोव्यातील मंत्र्यांच्या तालुका निहाय भेटीचा एक भाग म्हणून वास्को व मुरगावला भेट दिली. यावेळी त्यांनी रवींद्र भवन बायणा येथे उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्याशी संवाद साधत समस्या समजून घेतल्या.
पारंपारिक मच्छीमार सतत भीतीच्या छायेत
दरम्यानच्या काळात मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या समावेत वास्को, बायणा येथील मासेमारी सोसायटीच्या कार्यालयाला भेट देत बैठक घेतली. यावेळी मच्छीमारी बांधवांच्या समस्या ऐकून घेतल्या. यात पारंपारिक मच्छीमार सतत भीतीच्या वातावरणात जगत आहेत. कारण त्यांना अनेक प्रसंगी विविध विभागाकडून निष्कासनाच्या नोटिसा प्राप्त होत आहे. याची पाहणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी पावसाळ्यात कॅनो (होडी) मालकांना त्यांच्या डिंगींना वेलसांव, होलांत इत्यादी दूरच्या भागात शोधणे भाग पडते. त्यामुळे देस्तेरो आणि बायणा बीचच्या किनाऱ्यावरील कोणत्याही पॉईंटवर कॅनो पार्क करण्यासाठी रॅम्पसह ब्रेक वॉटर बांधण्याचा प्रस्ताव कॅनोमालकांनी मत्स्य व्यवसाय विभागाला दिला आहे.
दरम्यान पारंपारिक मच्छीमारांना बायना समुद्रकिनारी लोडिंग पॉईंट, खरेदी केंद्राची नितांत गरज आहे. कारण पारंपारिक मच्छीमार सामान्यत: दररोज ताज्या माशांच्या विक्रीवर जगतात. असे असताना लोडिंग पॉईंट म्हणून काम करू शकणारी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने मच्छीमारांनी आपली ही समस्या निदर्शनास आणून दिली.
खरेदी केंद्र उभारण्याची गरज
मच्छीमारांसाठी एक खरेदी केंद्र असण्याची गरज व्यक्त केली आहे. जिथे ते संभाव्य खरेदीदारांना त्याची मासळी विकू शकतील. कारण तालुक्यातील इतर बाजारपेठेत त्यांना त्यांच्या मासळीसाठी योग्य दर मिळत नाही. मच्छीमारांनी नेट बॅंडिंगसाठी शेड व इतर कामासाठी शेड तयार करण्याचा प्रस्तावही यावेळी मांडला.
सांडपाणी थेट समुद्रात सोडले
दरम्यान नजीकच्या मलनिस्सारण विभागाकडून सांडपाणी उघड्यावरच समुद्रात सोडले जाते. सांडपाणी सोडण्यात आल्याने मच्छीमार आणि सागरी पर्यावरणाची समस्या निर्माण झाली आहे. या सांडपाण्यामुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या स्थानिक 'शेवटो' सारख्या माशांच्या जाती आता नष्ट झाल्या आहेत. असे काहीही यावेळी मच्छीमारांनी सांगितले हा प्रश्न संबंधित विभागाकडे घेऊन तो प्राधान्याने सोडवावा अशी मागणी मच्छीमारांनी मत्स्य विभागाकडे केली असल्याचे सांगितले. यावेळी मंत्र्यासोबत वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मोरगाव पालिका नगराध्यक्ष लिओ रॉड्रिक्स व इतर मान्यवर उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.