पाळी: राज्यातील पहिलावहिला उत्तर व दक्षिण गोवा जोडणारा आणि खाण कंपन्यांना वरदान ठरलेला उसगावच्या भामई येथील चौपदरी पुलाचे भाग्य उजळले आहे. तब्बल बारा वर्षांनी या पुलाची व्यवस्थित डागडुजी, रंगकाम आणि विशेष म्हणजे पथदीप बसवण्यात आल्याने हा पूल सध्या उजळून निघाला आहे. रात्रीच्यावेळी या पुलावर कायम अंधाराचे साम्राज्य असायचे, ते आता दूर झाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्यातील खाणव्याप्त भाग असलेल्या पाळीत खाण व्यवसाय जोरात चालत होता, त्यावेळेला उसगावच्या एकेरी वाहतुकीच्या पुलावर कायम ताण यायचा. पोर्तुगिजांना गोव्यातून हाकलून लावल्यानंतर त्यांनी जाताना उसगावचा पूल पाडला, पण गोवा मुक्तीनंतर भामई येथील हा पूल पुन्हा एकदा उभारण्यात आला.
या अजोड पुलावरून त्यानंतर अविरत वाहतूक सुरू झाली. खनिज मालाची वाहतूक धारबांदोडा - उसगाव मार्गे होत असल्याने शेकडो ट्रकांना याच एकेरी उसगाव पुलाचा आधार होता, पण वाहतूक वाढल्यामुळे शेवटी दुसऱ्या पुलाची गरज भासली आणि राज्यातील खाण मालकांच्या संघटनेने स्वतः खर्च करून जुन्या उसगाव पुलाला समांतर चौपदरी पूल उभारला. पूर्णपणे लोखंडी ट्रसवर असलेला हा पूल राज्यातील पहिलाच चौपदरी पूल ठरला.
या पुलाचे लोकार्पण 2009 साली तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात आले. पण दुर्दैवाची बाब म्हणजे तीनच वर्षांनी राज्यातील खाण उद्योगावर न्यायालयाचा हातोडा पडला. खाण व्यवसायातील अंदाधुंदीमुळे खाण बंदी आल्यानंतर ज्या उद्देशाने खाण मालकांनी चौपदरी पूल उभारला त्याचा वापरच झाला नाही. तरीपण नंतरच्या काळात खनिज मालाचा लीलाव तसेच स्वामित्व धन अदा केलेल्या खनिज मालाची वाहतूक करण्यासाठी या पुलाचा वापर करण्यात आला, पण 2000 ते 2011 पर्यंत जो खाण उद्योग एकदम सुसाट चालला होता, त्याला चाप लागल्यानंतर या पुलाचा वापरच थंडावला.
खाण उद्योग थंडावल्यामुळे उसगावच्या चौपदरी पुलाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. विशेष म्हणजे या पुलावरील पथदीप लागत नसल्याने अपघातांचे सत्रच या पुलावर व जोडरस्त्यावर सुरू झाले. गोमंतकीय सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीलाही पुलावरील पथदीप उजळले नाहीत, पण आता बारा वर्षांनी पुलाचे भाग्य उजळले असून खाण व्यवसायातून करोडो रुपये कमावले, मग खाण उद्योग बंद झाल्यानंतर पुलाकडे दुर्लक्ष का, असा सवाल करून या पुलाच्या देखभालीकडे व्यवस्थित लक्ष द्या, अशा प्रतिक्रिया उसगाव - पाळीतील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.