Fire In Goa: आगीची धग राज्यभर, 18 ठिकाणी अग्नितांडव सुरूच

वनमंत्र्यांनी केली हवाई पाहणी
Fire in Goa File Photo
Fire in Goa File PhotoDainik Gomantak

Fire In Goa राज्यभरात तब्‍बल 18 ठिकाणी अग्नितांडव सुरू असल्याचे आज (बुधवारी) सकाळी स्पष्ट झाले. वनमंत्री विश्वजीत राणे आणि पश्चिम विभाग नौदलप्रमुख रिअर ॲडमिरल विक्रम मेनन यांनी केलेल्या हवाई पाहणीत ही बाब स्पष्ट झाली. गेल्‍या शनिवारी म्हादई खोऱ्यात लागलेली आग अजूनही धुमसतेय.

आज तेथे 9 ठिकाणी आगीच्‍या ज्‍वाळा दिसून आल्‍या. आग विझविण्यासाठी नौदलासह हवाई दलाची मदत घेण्यात येत आहे. सध्या दोन हेलिकॉप्टरसह कर्नाटकातील आणखी एक हेलिकॉप्टर राज्यात दाखल झाले आहे, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली.

वनभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. यावेळी मुख्य प्रधान वनसंरक्षक राजीवकुमार गुप्ता, मुख्य वनसंरक्षक सौरभ कुमार उपस्थित होते. राणे म्हणाले की, आग विझविण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले असून त्‍यासाठी नौदल आणि हवाई दलाची मदत घेण्यात येत आहे.

संरक्षण मंत्रालयाशीही या विषयावर चर्चा झाली आहे. कर्नाटकातून हेलिकॉप्‍टर मागवण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात लागलेली आग लवकरच आटोक्यात येईल, अशी अपेक्षा आहे. या संपूर्ण घटनांची चौकशी करण्याचे आदेशही वन संरक्षकांना दिले असून, येत्या दहा दिवसांत ते अहवाल सादर करतील.

म्हादई अभयारण्यात जाण्यास निर्बंध

राज्यात सुरू असलेल्या अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर म्हादई अभयारण्यात जाण्यास निर्बंध घातले आहेत. शिवाय अभयारण्यातील काजू बागायतींमध्येही आग लावण्यास बंदी घातली आहे. यासाठी वनसंरक्षक कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अभयारण्यातील पहारा वाढविला आहे, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली.

आतापर्यंतच्या आगीच्या दुर्घटनांचा अभ्यास करता यामागे षड्‌यंत्र असण्‍याची शंका आहे. कारण आग रात्रीच्‍या वेळी डोंगरमाथ्यावरच का लागते, हा संशोधनाचा विषय आहे. शिवाय हे प्रकार संशयास्पदही आहेत. या घटना मानवनिर्मित असल्यास दोषींवर विविध कायद्यांनुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. - विश्‍‍वजीत राणे, वनमंत्री.

म्हादई खोऱ्यासाठी 16 टन पाण्याचा वापर

म्हादई खोऱ्यात लागलेली आग विझवण्यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरने आज (बुधवारी) 16 टन पाण्याचा वापर करून ठिकठिकाणची आग विझवण्याचा प्रयत्न केला. यापुढेही नौदलाच्या हेलिकॉप्टरमार्फत ही मोहीम सुरूच राहणार असून आवश्‍यकता भासल्यास हवाई दलाचे आणि कर्नाटकातील हेलिकॉप्टरही या मोहिमेसाठी तैनात करण्यात येईल, असे वनमंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले.

Fire in Goa File Photo
Goa Accident: पठ्ठ्यानं हेलमेट सोबत घेतलं, पण डोक्यावर नाही घातलं; अन्...

आग लावणाऱ्यांना अटक करा!

सध्या म्हादई खोऱ्यात आणि खासगी जागांमध्ये आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. आग लावण्याचा प्रयत्न करणारा आढळल्यास कुणाचाही मुलाहिजा न बाळगता अटक करण्याचे आदेश आपण वन विभागाला दिले आहेत, असे सांगत राणे म्हणाले, यासाठी जिल्हाधिकारी आणि मामलेदारांकडून वन कायद्याच्या आणि नव्याने जारी केलेल्या परिपत्रकाच्या प्रती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Fire in Goa File Photo
WHO च्या 'या' मार्गदर्शक तत्वांची काळजी घेतल्यास होणार नाही मधुमेह अन् उच्च रक्तदाबाचा त्रास

बोरी, काणकोणातही आगीच्या दुर्घटना

वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी आज केलेल्या हवाई पाहणीत काणकोण, बोरीपासून अनेक ठिकाणी आगीच्या घटना समोर आल्या आहेत. ही आग कोणी व का लावली, याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि मामलेदारांना दिले आहेत. सध्या आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले असून तापमान वाढले आहे. अशा परिस्थितीत कोणीही खासगी वा सरकारी जागेत आग लावू नये, यासाठी वनसंरक्षक कायदा 1972ची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्‍याचे राणे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com