सासष्टी, मडगावच्या रवीन्द्र भवनातील कॉन्फरन्स सभागृहात १९ लाख रुपये खर्चून चित्रपट प्रदर्शन सुविधा कार्यान्वित करण्यात आली. या सुविधेचा शुभारंभ मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी माजी आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस, दामोदर नाईक, भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक, उपाध्यक्ष मनोहर बोरकर, सदस्य सचिव आग्नेल फर्नांडिस तसेच चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बिपीन खेडेकर, रुपेश माने आदी मान्यवर उपस्थित होते.
आजपासून भवनमध्ये फिल्म क्लब सुरू करण्यात आला असून सदस्यांच्या नावनोंदणीला प्रारंभ झाल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभेच्या निवडणुकांनंतर पाच दिवसांचा चित्रपट महोत्सव आयोजित करण्याचे ठरविण्यात आल्याचे रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी यावेळी जाहीर केले.
या सुविधेमध्ये नवीन स्क्रीन, ध्वनी यंत्रणा यांचा समावेश आहे. आमदार दिगंबर कामत यानी सांगितले की, मडगावचे रवींद्र भवन दक्षिण गोव्यातील कला व संस्कृतीचे एक केंद्र व्हावे याचा विचार करूनच त्याची रचना करण्यात आली आहे.
रवीन्द्र भवनचे लवकरच दुरुस्ती व नूतनीकरणही केले जाईल. लवकरच एक बैठक बोलावून त्यासाठी कोणकोणती कामे हातात घेतली जातील याची एक यादीच तयार केली जाईल, असेही कामत यानी सांगितले.
माजी आमदार तथा भवनचे माजी अध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले, की चित्रपट प्रदर्शन सुविधा उपलब्ध करण्याचा हा जरी पहिलाच प्रयत्न असला तरी त्यात जर काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील.
भवनचे सदस्य सचिव आग्नेल फर्नांडिस यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष मनोहर बोरकर यांनी आभार मानले.
‘फेडरेशन आॅफ फिल्म सोसायटी’ची मान्यता !
गेले वर्ष भर या सुविधेसाठी आम्ही प्रयत्नशील होतो. जानेवारीत झालेल्या बुलबुल बाल चित्रपट महोत्सवामुळे या कामाला गती मिळाली. चित्रपट प्रदर्शनासाठी ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज वेस्टर्न रिजन’ची मान्यता मिळाली असून भवनमध्ये आता चित्रपट प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,असे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी सांगितले.
तियात्रिस्तांनी थोडी कळ सोसावी ः तालक
मुख्य सभागृहाची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत सुरू करण्यात येणार असल्याने हे सभागृह १५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. तियात्र निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांना विचारूनच ही दुरुस्ती हातात घेतली जात आहे.
त्यांच्याच तक्रारी होत्या की रंगमंच योग्य नाही. ध्वनी यंत्रणा बिनकामाची आहे, खुर्च्या मोडलेल्या आहेत. हे सर्व लक्षात ठेवूनच त्यांच्याच भल्यासाठी ही दुरुस्ती हातात घेतली जात आहे. जर आताच रंगमंचाची दुरुस्ती केली नाही तर लांब काळासाठी सभागृह बंद करावे लागणार आहे. त्यामुळे तियात्रिस्तांनी थोडी कळ सोसावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.