Goa Kulagar Farming: गोव्यातील जनजीवनाचा कुळागर हा एक अविभाज्य घटक आहे. धारबांदोडामधील दाभाळ येथील कुळागर बागायतदार सध्या मोठ्या अडचणीत सापडले असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरड्या पडलेल्या जमिनींमुळे शेतमालक चिंतेत पडले आहेत.
परिसरात असलेल्या खाण उद्योगाने बारमाही पाणी पुरवठा करणारे झरे नष्ट केले असताना, खाण कंपन्यांनी खुल्या खाण खड्ड्यांतून कुळागरांना सिंचनासाठी पाणी देऊन नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे जुनी कुळागर प्रणाली धोक्यापासून याआधी वाचली असली तरी समस्या पूर्णपणे संपली नाहीय.
(Goa Kulagar Farming in danger due to lack of irrigation)
कुळागरे सिंचनाअभावी संपुष्टात येण्याची भीती..!
आता खाणी सरकारच्या ताब्यात असल्याने कुळागर सिंचनाअभावी संपुष्टात येण्याची भीती तिथल्या शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. सरकारकडे वारंवार विनंती करूनही केवळ खोटी आश्वासने मिळत असल्याचे शेतमालकांचे म्हणणे आहे.
कुळागर ही लागवडीची एक पारंपारिक पद्धत आहे ज्यामध्ये पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोताने सिंचन केलेल्या जमिनीवर मसाले आणि फळांपासून ते नगदी पिके, फुले आणि औषधी वनस्पतींपर्यंत अनेक प्रकारची पिके घेतली जातात.
तिथले शेतकरी संतोष प्रभू यांनी TOI ला दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या दूधसागर नदीला जोडणाऱ्या हूड नदीवरील बंधारा, कोरडा पडल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. ते म्हणाले की सुमारे 50 एकर क्षेत्रावर पसरलेल्या दाभाळमधील 32 कुळागरे यावर अवलंबून आहेत, जी आता पाण्याअभावी सुकून चालली आहेत. इथे प्रामुख्याने पिकवल्या जाणार्या सुपारी पिकाचे नुकसान होत आहे. खाणकामामुळे भूजल पातळीत लक्षणीय घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले. कुळागरांपर्यंत पाण्याची वाहिनी टाकण्याची सध्या गरज आहे.
त्यामुळे या बंधाऱ्यावरील कुळागरांना सिंचनासाठी पाण्यापासून वंचित रहावे लागत आहेत. पण जोपर्यंत खाणी चालू होत्या, तोपर्यंत आम्हाला काळजी करण्याची गरज नव्हती कारण खाण कंपन्या कुळागरांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करायचे. खाणींची मालकी आता सरकारकडे सोपवण्यात आल्याने, कुळागर मालक हतबल झाले आहेत.
यावर संतोष प्रभू पुढे म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या धारबांदोडा येथील 'सरकार तुमच्या दारी' कार्यक्रमात भेटलो. दाभाळ येथे असलेले सर्व 10-12 खाण खड्डे पाण्याने भरलेले आहेत. फक्त हे पाणी कुळागरांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, जसे खाण कंपन्या याआधी करत होत्या.
सरकारने त्वरित याकडे लक्ष द्यावे...
तिथलेच आणखी एक शेतकरी शुगर तेंडुलकर म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून बहुतांश शेतांना सिंचन व्यवस्था करता आलेली नाही. त्यामुळे आपल्या डोळ्यांसमोर पीक उद्ध्वस्त होताना पाहणे खरंच खूप वेदनादायक आहे.
त्यामुळे स्थानिक शेतकरी सरकारने या समस्येकडे लक्ष देऊन लवकरात लवकर कुळागरांना पाणीपुरवठा करण्यासाठी तरतूद करण्याची मागणी करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.