डॉ. रंगनाथन म्हणजे शियाली रामामृतन रंगनाथन होय. त्यांचा जन्म मद्रास प्रांतातील (सध्याचे चेन्नई) तंजावर जिल्ह्यातील शियाली या छोट्याशा गावात १२ ऑगस्ट १८९२ साली झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण शियाली येथील हिंदू हायस्कूलमध्ये झाले. विद्यार्थीदशेपासून त्यांनी संस्कृत वाङ्मयाचे अध्ययन सुरू केले होते. नंतर मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंग्रजी विषयात बी.ए.ची पदवी प्राप्त केली.
शिक्षण मिळविणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे, हे लक्षात आल्यानंतर त्या शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवून अध्यापनशास्त्राची ‘एल. टी.’परीक्षा उत्तीर्ण केली आणि गणिताचे प्राध्यापक झाले. नंतर प्राध्यापकाची नोकरी सोडून ते मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहू लागले. ग्रंथालय शास्त्राच्या शिक्षणासाठी मद्रास विद्यापीठाने आपल्या स्वखर्चाने त्यांना ‘स्कूल ऑफ लायब्ररीयनशिप’साठी लंडनला पाठविले होते. लंडन विद्यापीठाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते पुन्हा मायदेशी परतले. सार्वजनिक ग्रंथालयाची गरज ओळखून ३० जानेवारी १९२८ रोजी त्यांनी ‘मद्रास ग्रंथालय संघाची’ स्थापना केली. नंतर ग्रंथालयांची झपाट्याने प्रगती झाली. सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याचे महत्त्व डॉ. रंगनाथन यांनी सर्वप्रथम पटवून दिले. त्यासाठी ग्रंथालयांचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करून द्यायला हवी, यासोबत वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी जनतेला प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार डॉ. रंगनाथन यांनीच सर्वप्रथम देशात रुजवला.
आधुनिक भारतातील ग्रंथालयांच्या विकासात डॉ. रंगनाथन ह्यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन ह्यांनीच रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. डॉ. रंगनाथन यांनी मांडलेले पाच पुस्तकालय विज्ञान सिद्धान्त हे भारतीय पुस्तकालय विज्ञानाचा पाया समजले जातात. डॉ. रंगनाथन ह्यांचा वाढदिवस भारतात ‘ग्रंथपाल दिन' म्हणून साजरा केला जातो.
ज्या काळात भारतात ग्रंथालयांना फारस महत्त्व नव्हते, त्याकाळात बी. ए.ला इंग्रजी विषय घेऊन ते पहिला वर्ग मिळवलेले, गणित विषय घेऊन एम.ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालेले आणि एल. टी. म्हणजे आताची बी. एड. परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालेले रंगनाथन यांनी जेव्हा मद्रास विद्यापापीठाचे ग्रंथपालपद स्वीकारले तेव्हा सर्वांनांच आश्चर्य वाटले. पण, शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी ज्या निष्ठेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानाची उपासना केली व ग्रंथ हेच आपले गुरू मानले. प्राध्यापकापेक्षा ग्रंथपाल होणे त्यांनी पसंत केले, याचे कारण ते ज्ञानप्रसाराचे एक प्रभावी माध्यम आहे व त्याद्वारे आपल्याला ज्ञानप्रसाराचे कार्य करता येईल, अशी त्यांची धारणा होती. त्यांचा ग्रंथपाल होण्याचा निर्णय ग्रंथालय शास्त्राच्या व ग्रंथालय चळवळीच्या दृष्टीने भाग्याचा ठरला.
रजा न घेणारे ग्रंथपाल
१९२४ साली डॉ. रंगनाथन यांनी मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल म्हणून नेमणूक झाल्यावर त्यांना विद्यापीठाने लंडन विद्यापीठात स्कूल ऑफ लायब्ररी सायन्स या संस्थेत ग्रंथपालनाचे शिक्षण घ्यायला पाठविले. त्या काळात ग्रंथालय शास्त्राचे शिक्षण देणारी ही जगातील एकमेव संस्था होते. तेथे त्यांनी विविध ग्रंथालयांना भेट देऊन ग्रंथालय शास्त्रांचे ज्ञान घेतले. तेथील कार्यपद्धती, ग्रंथालय वर्गीकरण पद्धती, तालिकीकरणांचा तौलानिक अभ्यास केला. एडवर्ड व डब्लू सी बार्विक सेयर्स यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या प्रेरणेने स्वतःची वर्गीकरण व तालिकीकरणांची पद्धत विकसित केली. त्यानंतर भारत परतल्यानंतर मंद्रास विद्यापीठात कार्यरत राहिले. २० वर्षात एकदाही रजा घेतली नाही. दररोज सर्वांत प्रथम ते येत व शेवटी जात होते. दररोज बारा तास ते काम करीत होते. त्यांनी ग्रंथालयाचा वापर विद्यार्थी, शिक्षकांबरोबरच नागरिकांनाही खुला केला. मद्रास विद्यापीठातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठात कार्य केले.
ग्रंथालय शास्त्राचे प्रणेते
विद्यापीठात काम करताना त्यांनी ग्रंथालय शास्त्राचा विकास केला, या ज्ञानाचा प्रसार केला. मद्रास विद्यापीठात पहिल्या ग्रंथालय संघाची स्थापना केली. ग्रंथालयशास्त्र शिक्षणाची सोय केली आणि देशात पहिल्या ग्रंथालय शिक्षणाचा पाया घातला. मद्रास विद्यापीठात १९३१ मध्ये पहिला ग्रंथालय शास्त्राच्या पदवी अभ्यासक्रम सुरू केला. त्यानंतर १९३७ मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला. त्यानंतर १९४२ मध्ये बनारस विद्यापीठात ग्रंथालय शास्त्र विभाग सुरू केला. दिल्ली विद्यापीठात ग्रंथालय शास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केला. १९४८ साली पदव्युत्तर व १९५० साली पीएच. डी. अभ्यासक्रम सुरू केला. अमेरिका सोडली तर ग्रंथालय शास्त्रात पीएच. डी. अभ्यासक्रम सुरू करणारा जगातील पहिला देश भारतच आहे. वेगळ्या पद्धतीची, भारतीय तत्त्वांचा आणि जगाला दिशा देणारा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला. त्यामुळे ग्रंथालय शास्त्राला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले. त्याचे श्रेय हे फक्त रंगनाथन यांनाच जाते.
अमूल्य लेखन
डॉ. रंगनाथन यांनी विपुल प्रमाणात लेखन केले. ग्रंथपालनासंबंधी ५० पुस्तके लिहिली असून किमान ५०० लेख लिहिले आहेत. त्यांची भाषांतरे जगभरातील अनेक भाषांतून करण्यात आली आहेत. ग्रंथालयशास्त्राचे पाच सिद्धान्त, द्विबिंदू वर्गीकरण या पुस्तकांशिवाय ग्रंथालय शास्त्राचा अभ्यास पूर्ण होत नाही. या पुस्तकाची जगाने दखल घेतली असून आजच्या माहितीयुगातही या पुस्तकांचा वापर केला जात आहे. ग्रंथालय शास्त्राचे पाच सिद्धान्त या ग्रंथात अगदी सोप्या भाषेत आदर्श ग्रंथालय व ग्रंथापालासाठी उपयोगी माहिती आहे. ही तत्त्वे, नियम म्हणजे ग्रंथपालाच्या व्यावसायिक जीवनातील मार्गदर्शक व उपयोगी तत्वे आहेत. द्विबिंदू वर्गीकरणामुळे ज्ञानाच्या वर्गीकरणाला एक वेगळी दिशा मिळाली. सूक्ष्मातिसूक्ष्म अशा ज्ञानाच्या वर्गीकरणाची सोय पद्धतीद्वारे करता येते. ही रंगनाथन यांनी केल्यामुळे जागतिक स्तरावर त्यांची दखल घेण्यात आली.
ग्रंथालय कायदा
देशातील ग्रंथालय चळवलीला कायद्याचे संरक्षण असल्याशिवाय ती यशस्वी होणार नाही, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळेच त्यांनी १९४२ साली ग्रंथालय संघटनेतर्फे देशासाठी ‘आदर्श ग्रंथालय कायद्याचा मसुदा’ तयार केला आणि मद्रास प्रांतात १९४८ मध्ये पहिला ग्रंथालय कायदा लागू करण्यात आला. त्यानंतर त्यांनी अनेक राज्यासाठी कायदे तयार केले. अनेकांना मार्गदर्शन केले. परंतु काही राज्यात आजही हा ग्रंथालय कायदा लागू करण्यात आला नाही. ग्रंथालय चळवळीला त्यांनी वाहून घेतले होते. देश-विदेशात फक्त ग्रंथालयाच्या व्यवस्थापनासाठी, ज्ञानाच्या प्रचार, प्रसारासाठी ते झटले.
मान सन्मान
डॉ. रंगनाथन यांना अनेक मान सन्मान प्राप्त झाले. त्यांच्या हयातीत जेवढी लोकमान्यता व राजमान्यता त्यांना मिळाली तेवढी जगातील कोणत्याच ग्रंथपालाला मिळाली नाही. १९३५ साली ब्रिटिश सरकारने त्यांना ‘रावसाहेब’ हा किताब बहाल केला होता. १९४८ साली दिल्ली विद्यापीठाने ग्रंथालय शास्त्रांतील कामगिरीबद्दल त्यांना डी. लिट. पदवी दिली. १९५७ साली भारत सरकारने पद्मश्री हा बहुमान बहाल केला. १९६४ मध्ये भारत सरकारने ‘नॅशनल रिसर्च प्रोफेसर ऑफ लायब्ररी सायन्स’ ही मानाची जागी दिली. १९७० मध्ये अमेरिकेन लायब्ररी असोसिएशनने ‘मार्गारेट मॅन’हे सन्मानपत्र दिले. अमेरिकेबाहेर हे सन्मानपत्र प्रथमच दिले गेले, तेही भारतीय रंगनाथन यांना, हे विशेष आहे. त्यानंतर त्यांना १९६४ मध्ये ‘युनिव्हिर्सिटी ऑफ पिटस्बर्ग’तर्फे डी.लिट पदवी बहाल करण्यात आली.
अखेर
साधी राहणी असलेल्या या जागतिक किर्तीच्या व्यक्तिमत्वाचे अनेक गुणविशेष आहेत. एखाद्या ऋषिसारखे जीवन ते जगले. ते साध्या भाड्याच्या दोन खोल्यांत राहिले. अगदीच अल्प फर्निचर ठेवत होते. जमिनीवर बसून वाचणे, लिहिणे, चटईवर झोपणे, उशीऐवजी पाट घेणे, त्या पाटाचाच उपयोग लेखनासाठी करणे. चहा, कॉफीला कधीही स्पर्श केला नाही. पूर्ण शाकाहारी, दररोज फक्त एकदाच जेवणारे रंगनाथन होते. असे हे आगळे वेगळे, पण कुशाग्र बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्त्व होते. सतीचे वाण घेऊन डॉ. रंगनाथन यांनी आपले सारे आयुष्य ग्रंथालये, ग्रंथालयशास्त्र यासाठी वेचले आणि शेवटी २७ सप्टेंबर १९७२ रोजी वयाच्या ८०व्या वर्षी या जगाचा त्यांनी निरोप घेतला. |
|