वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे राज्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मद्यधुंद व भरधाव वेग ही अपघातांची मुख्य कारणे आहेत. पोलिसांकडून वेळोवेळी जागृती केली जाते. तसेच अचानक नाकाबंदी करून मद्यचाचणी, तपासणी केली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पोलिसांनी चारपटीने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याची प्रकरणे नोंदविली आहेत.
मात्र त्यातून काहीच बोध वाहनचालकांनी घेतला नसल्याचे दिसते. त्यामुळे मद्यधुंद चालकांचा परवाना कायमचा रद्द केल्याशिवाय ही शिस्त येणार नाही. केंद्र सरकारला कायद्यात दुरुस्ती करून कठोर कारवाईची तरतूद करावीच लागणार आहे. तरच कोठे बेशिस्त वाहतुकीला लगाम बसून अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते.
बाणास्तरी, वेर्णा व परवाच मांडवी पुलावर झालेल्या अपघातात मद्यधुंद चालकांमुळे निष्पाप लोकांना जीव गमावावा लागला. असे अपघात घडल्यावर समाजात काही दिवस हळहळ व्यक्त केली जाते व नंतर सर्व विसरले जाते. मात्र अशा अपघातांमुळे नाहक कोणाचा तरी बळी जातो व त्याच्या कुटुंबीयांवर कोसळणारे दुःख हे कधीही भरून न येणारे असते.
त्यामुळे रस्त्यावर वाहन घेऊन जाताना तुम्ही जरी नियमांच्या चौकटीत वाहन चालवत असाल तरी समोरून येणारा वाहनचालक कोणत्या मन:स्थितीत असेल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. साहजिकच प्रत्येकाने रस्त्यावर वाहन चालवताना आपली स्वतःची जबाबदारी सांभाळूनच वाहन चालविणे गरजेचे आहे.
वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीत कामाला आलेले कामगार खोलीत झोपेत असताना त्यांच्यावर मद्यधुंद वाहनचालकाच्या रूपाने काळाने घाला घातला. चार कामगारांना त्या बसचालकाने चिरडले होते. पणजी पुलावर काही दिवसांपूर्वीच मद्यधुंद चालकाने तीन मजुरांना काम करताना उडवले. त्यातील एकाचा बळी गेला. राज्यात एक तर रस्त्यावरील कामासाठी मजूर मिळत नाहीत.
त्यामुळेच परप्रांतीय मजूर कामानिमित्त येतात. ते आपले कुटुंब गावात ठेवून पोटापाण्यासाठी आलेले असतात. जेव्हा या निष्पाप मजुरांचा अपघातांत मृत्यू होतो, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देणारा पाठीमागे कोणीही नसतो. अशा या मदांध मद्यधुंद वाहनचालकांना रोखायचे असल्यास त्यांचा परवानाच कायमचा रद्द करणे हाच एकमेव उपाय होय.
सरकार व वाहतूक पोलिस अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वेळोवेळी अनेक अपघातप्रवण क्षेत्रांचा अभ्यास करून तेथे डागडुजी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ही प्रक्रिया लांबलचक व किचकट असल्याने ती पूर्ण करण्यास वेळ जातो.
यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी वाहतूक, पोलिस व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची समन्वयक बैठक घेऊन अपघात घडणारी ठिकाणे शोधून त्याचा अभ्यास करण्यास सांगितले होते. त्याचा आराखडाही तयार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र पुढे ते अधांतरीच राहिले. राज्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशा ही आता पावसाळा संपेपर्यंत राहणार आहे.
राज्यात येणारे पर्यटक हे गुगल मॅपवर बघून वाहने चालवतात. त्यातच ते मौजमजा करण्यास आलेले असल्याने रात्रीच्या पार्ट्यांमध्ये भरपूर दारू ढोसतात. रात्रीच्या वेळी त्यांना गोव्यातील रस्त्यांचा अंदाज नसतो. त्याचा परिणाम स्वयंअपघात किंवा वाहनावरील नियंत्रण जाऊन अपघातास कारणीभूत ठरतो. भाडेपट्टीवर घेतलेली वाहने असल्याने पर्यटकांना त्याचा फरक पडत नाही. गोव्यात आल्यानंतर त्यांना ते राहत असलेल्या हॉटेल व्यवस्थापनाने तसेच वाहने भाडेपट्टीववर देणाऱ्यांनी रस्त्यांबाबत प्राथमिक धडे तरी देण्याची गरज आहे.
राज्यात यावर्षी पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर लहानमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डेही अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजवण्याची जबाबदारी संबंधित भागाताली कंत्राटदार तसेच अभियंत्यावर सोपवली आहे. मात्र हे खड्डे बुजवण्यासाठी काही ठिकाणी हार्ड सिमेंट काँक्रीटचा वापर करतात. त्यावरूनच वाहने जात असल्याने ती जागा खडबडीत होते. त्यामुळे खड्डे परवडले, मात्र हा सिमेंट काँक्रीटचा थर नको, असे वाहनचालकांना वाटू लागले आहे. दुचाकी वाहने तर त्यावर जोराने आपटतात. त्यामुळे चालक तोल जाऊन पडण्याची भीती अधिक असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.