
मडगाव : फातोर्डा स्टेडियमवर सराव करणाऱ्या दोन लहानग्या खेळाडूंना व त्यांच्या प्रशिक्षकाला बुधवारी संध्याकाळी एका कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरातील पालक व क्रीडाप्रेमींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, १३ व १४ वर्षांची दोन मुले नेहमीप्रमाणे स्टेडियमबाहेरील ट्रॅकवर सराव करत होती. त्यांच्यासोबत त्यांना मार्गदर्शन करणारा २४ वर्षीय प्रशिक्षक देखील उपस्थित होता. त्याचवेळी एक इसम आपल्या सोबत आणलेल्या कुत्र्यासह तिथे आला.
अचानक या कुत्र्याने सराव करणाऱ्या मुलांवर उडी घेतली. त्यातील एका मुलाला कुत्र्याने चावा घेतला तर दुसऱ्या मुलाच्या हातावर नखांनी ओरबाडले.
या घटनेदरम्यान मुलांची सुटका करण्यासाठी प्रशिक्षकाने तत्परतेने धाव घेतली. मात्र, मुलांना वाचवताना त्या कुत्र्याने प्रशिक्षकाच्याही हाताला चावा घेतला. लगेचच मुलांनी व उपस्थितांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि तातडीने सर्वांना इस्पितळात नेण्यात आले.
जखमी तिघांनाही हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ रेबीजविरोधी इंजेक्शन दिले व प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडले. सुदैवाने गंभीर दुखापत झालेली नाही.
या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, सार्वजनिक ठिकाणी बेवारस अथवा बिनसंयम कुत्र्यांचा त्रास वाढत असल्याचं त्यांनी म्हटलंय. अशा घटना वारंवार घडत असल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.