Goa Temple: पेडणेची सतीयादेवी

Goa Temple: एका बाजूला नदी किनारीच झाडाला टेकून पाठमोरी बसलेली’ ती’ विचारात गढून गेली होती. तिचाही नवरा सर्वांबरोबर हुतात्मा झाला होता…त्याच्या चितेत तिलाही उडी घ्यावी लागणार होती…ती सती जाणारच होती.
Goa Temple
Goa TempleDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Temple: परिसर शांत…रमणीय…झाडाझुडुपांमध्ये पहुडलेला. साध्यासुध्या माणसांचा..त्यांच्या चांगुलपणामुळे आणि कष्टाळू वृत्तीने त्याला अधिकच झळाळी प्राप्त झालेली. ब्रिटिश इंडिया आणि पोर्तुगीज इंडिया अशा दोन राष्ट्रांना जोडणाऱ्या जीवनदायिनी तेरेखोल नदीच्या काठावर सतीयादेवीचे स्थान.या स्थानाची सर्वांनाच ओढ.

Goa Temple
Goa Mining Issue: जनतेचा खाणप्रश्‍नी लढा

म्हणूनच तर शिगमोत्सवात पेडणे,न्हयबाग परिसरातील बारा रोमटामेळ तिच्या भेटीसाठी येतात. अभूतपूर्व उत्साहात शिगमोत्सव संपन्न होतो. भाविकांची सतीयादेवीवर मनःपूर्वक श्रद्धा. तेरेखोल नदीच्या तीरावर तिचं स्थान. तिच्या काठाकाठानेच गाव वसलेला. इतिहास संस्कृती साहित्य यांचे असंख्य पदर उलगडून दाखवीत आहे.गेल्या कित्येक वर्षांची परंपरा जतन करीत सण उत्सवांच्या निमित्ताने एकोप्याचे दर्शन घडविणारा हा गाव.

आज आपली कात टाकून वेगळ्याच भौगोलिक परिस्थितीला सामोरा जात आहे. असे असले तरीही गावापासून दूर दूर पांगलेल्यानाही मातीची ओढ स्वस्थ बसू देत नाही. कितीही कामे असो ग्रामस्थांची पावले ग्रामदैवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी गावाकडे वळतातच! सतीयादेवी विषयी तर आबालवृद्धांची श्रध्दा मोठी. असे सांगितले जाते की कोणे एकेकाळी येथील पुरुषमंडळीना लढता लढता वीरमरण आले.

सर्वत्र हाहाःकार माजला. आकांत आक्रोशानी परिसर निनादून गेला.गावच जणू विखुरला गेला.गावावर दुःखाचे ढग दाटून आले.काय करावे?कसे जगावे? कोणा कोणाचे म्हणून सांत्वन करावे?पाचशे पेक्षा जास्त पुरुष हुतात्मा झाले अशी अफवा सर्वत्र पसरली.काय करावे? कोठे जावे?कसे जावे? कोणी काहीही बोलू शकत नव्हता,आपलं मत मांडू शकत नव्हता. कुणीकडून कोणाकडे बातमी पोहोचली होती हेही ठाऊक नव्हते.मात्र आक्रीत घडलं यावर सर्वांचा विश्वास बसला होता.

स्त्रियांचे तर अवघे भावजीवन, सांसारिक जीवन स्वतःच्या नवऱ्याशीच बांधले गेले होते.त्यामुळे आपले आयुष्य कुंकवाच्या धन्याशिवाय उपयोगाचे नाहीच, ते त्याच्या चितेवरच संपवायचे असा निर्धार त्यांच्या मनात पक्का होत होता. सभोवतालाचीही त्यांना सोबत होती.सती जाण्याची त्यांच्या मनाची तयारी झालीच होती.वातावरणात जीवघेणी स्तब्धता. बघता बघता आकाशाला भिडू पाहणाऱ्या आगीच्या ज्वाळानी सारा परिसर धगधगू लागला.

एक एक जीव स्वतःच्या शरीर मनाला आगीत झोकून देत होता.जमलेला समूह त्यांच्या नावाचा जयघोष करीत होता. मात्र एका बाजूला नदी किनारीच झाडाला टेकून पाठमोरी बसलेली ‘ती’ विचारात गढून गेली होती.तिचाही नवरा सर्वांबरोबर हुतात्मा झाला होता…त्याच्या चितेत तिलाही उडी घ्यावी लागणार होती…ती सती जाणारच होती.मात्र तिच्या पोटात त्याचा गर्भ वाढत होता..तिला स्वतःची नव्हे तर पोटातील बाळाची चिंता होती.

पतीच्या प्रेमाची ती खूण तिला जपायची होती. तिची गुंतागुंत वाढतच गेली.हे अगदी काही क्षणच..! दुसऱ्याच क्षणी ती उठली. तिच्या चेहऱ्यावर निर्धार, तर पावलात असीम बळ आलं होतं. झपाझप ती डोंगराच्या, गर्द झाडीच्या दिशेने चालत राहिली.तिनं सोबत विळी(आदोळी) घेतली होती.तिला कुठून एवढी शक्ती आली होती कुणास ठाऊक पण तिने त्या विळीवर आपले पोट कापले…पोटातून मुलाला बाहेर काढले..एकदा त्या जीवाला डोळे भरून पाहिले…अलगद नेऊन झाडीत ठेवले आणि झटक्यात त्याच स्थितीत ती धावत सुटली …पतीच्या चितेवर तिला स्वतःला झोकून द्यायचे होते..

त्या डोंगरावर एक गुराखी दर दिवशी गुरांना चरायला नेत असे.त्यातील एका गायीला या लहान बालकाचा शोध लागला.तिला त्याची दया आली.ती रोज त्याला आपला पान्हा पाजू लागली. एके दिवशी गुराखी गायीच्या मागावर गेला.त्याने जे दृश्य बघितले त्याने तो भारावून गेला… गायीनं मुलाच्या तोंडात पान्हा धरला होता…अन् ते छोटे बाळही दूध पित होते..गुराखी या दृश्याने अचंबित झाला होता. तो नतमस्तक झाला..गावात येऊन त्याने आपल्या मालकाला पाहिलेल्या त्या दृश्याविषयी सांगितले.

दुसऱ्या दिवशी मालकाला तिथं नेऊन ती जागा दाखविली. मालकाला त्या मुलाची काळजी वाटली..त्याने त्याला उचलले..गर्द राई आणि थंडगार पाणी जिथे आहे तिथे त्याला नेऊन ठेवले….तो सर्वांचा “मुळवीर”झाला.पेडणेच्या लोकमनात त्याला अढळ स्थान प्राप्त झाले.तो आदोळी. विळीवर स्थानापन्न म्हणून त्याच्या सन्मानासाठी त्या परिसरातील काही गावात विळीवर मासे कापत नाहीत.

मुलाला पोटातून धाडसाने कापून काढून..त्याला झाडीत ठेवून ती थेट निघाली ती चितेवर स्वतःला झोकून देण्यासाठीच..!त्या तिथं..सळसळत्या पिंपळ वृक्षाच्या छायेत…नदीकिनारी एका मोठ्या कातळात तिचं अस्तित्व लोकमानस मानते.तिच्या मुलाला गायीने पान्हा पाजला म्हणून एक गाय तिच्यासाठी.. सतीयादेवीसाठी सोडण्यात येऊ लागली…ती वाढायची…तिची पाडसे…एक एक करून वाढत जायची.

Goa Temple
Goa BJP: ध्वजारोहणावरून काँग्रेसचा भाजपवर जोरदार पलटवार!

कालांतराने गाय म्हातारी होऊन तर कधी आजारपणात मरून गेली की तिच्या नावाचे थडगे उभे राहायचे..पुन्हा नवी गाय…ही अशी कृतज्ञता! …गायीने माणसाच्या जीवाला जगवले. माणसांनी गायीला अंतःकरणात अढळपद दिले.ही अशी आत्मीयता …प्रेमाची कृतज्ञतेची वीण या परिसराला वेढून आहे.

माती संस्कृतीचे संचित मुळवीर रूपाने सभोवतालाला बहाल केलेले आहे.हे सतीयादेवीचे उपकार लोकमनाने जपले आहेत…. शिगमोत्सवात ही ओढ…जिव्हाळा जाणवतो.. वेळी अवेळी पिंपळ सळसळतो…सतीयादेवी सती जातानाची आठवण करून देतो. आजच्या विज्ञान युगात मनात प्रश्नांची वलये निर्माण होतात…कसं कापलं असेल विळीवर तिने आपले पोट..?तिच्या बरोबरीने सती जाणाऱ्या स्त्रिया पटापट स्वतःला ज्वाळामध्ये लपेटून घेत आहेत.

मात्र तीच एकटी विचारांच्या तंद्रीत…त्यावेळी तिला कोणीच हटकले नाही? त्या तशा अवघडल्या अवस्थेत तिची कोणाला दया आलीच नसेल का? ती गाय तिथंच कशी पोहोचली..?मुळवीर आज गर्द झाडीत…बारामाही वाहणाऱ्या पाण्याच्या स्रोतात भाविकांची प्रेरणा बनून आहे. तर सतीयादेवी विस्तीर्ण पसरलेल्या कातळात पिंपळ सावलीत..गूढत्वाच्या वलयात नदीकाठी अनाकलनीय वेदनेची खूण बनून सळसळत आहे…

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com