भारतीय संस्कृती एकवचनी नाही, ती बहुवचनी आहे. ‘ॐ सह नाववतु। सह नौ भुनक्तु। सह वीर्यं करवावहै। तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै॥’ असा तिचा उद्घोष आहे. भारतीय संस्कृतीने बौद्ध धर्माकडून सर्वमंगलाची संकल्पना घेतली आहे. ‘बहुजनहिताय, बहुजनसुखाय’, ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु’ ही या शतदल संस्कृती कमळाची प्रार्थना आहे.
पूर्वी परदेशी लोक भारताचा उल्लेख ‘इंडिया’ असा एकवचनात न करता ‘इंडियाज’ असा बहुवचनात करत असत. वैविध्य आणि बाहुल्य हे भारतीय संस्कृतीचे अंगभूत सामर्थ्य आहे. हे वैविध्य, हे बाहुल्य आपण साजरे केले पाहिजे.
राजकारण करणारा एक राजकीय पक्ष ‘एक देश, एक धर्म, एक भाषा, एक रंग’ असा आग्रह धरीत भारताला एकजिनसी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. त्या राजकीय पक्षाचा हा अजेंडा कुठल्याच उदारमतवादी नागरिकाला मान्य नाही. या पार्श्वभूमीवर गोव्याची संस्कृती एकवचनी करण्याचे पाप आपण करू नये. ‘माट्रयोश्का’ या रशियन बाहुलीत अनेक बाहुल्या असतात. त्याप्रमाणे एका गोव्यात अनेक गोवा, डाळिंबाच्या रसरशीत दाण्यासारखे नांदत आहेत.
१९३९साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय कोकणी परिषदेने कोकणी चळवळीला ‘एक भाषा एक लिपी’ हा मंत्र दिला - रोमी, कन्नड, मल्याळम लिपीत लिहिणाऱ्या कोकणी भाषिकांनी देवनागरी लिपीचा वापर करावा असा कोकणी परिषदेचा आग्रह होता. विशिष्ट काळाच्या संदर्भात तो योग्य असेल, पण आज तो संदर्भहीन व कालबाह्य झालेला आहे. जेव्हा कोकणी भाषेचे अस्तित्व धोयात होते तेव्हा भाषिक कडवेपणा क्षम्य होता.
पण आज कोकणी ही समृद्ध भारतीय भाषा बनली आहे. केंद्रीय साहित्य अकादमीने कोकणीला मान्यता दिली आहे. भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात कोकणीचा समावेश करण्यात आला आहे. कोकणी गोवा राज्याची राजभाषा आहे. दोन कोकणी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार, तर एका कोकणी साहित्यिकाला सरस्वती सन्मान मिळालेला आहे. दरवर्षी देवनागरी कोकणीत १५०-१७५ पुस्तके प्रसिद्ध होत असतात. एके काळी ‘इन्टेन्सिव्ह केअर युनिट’मध्ये असलेल्या कोकणी भाषेने आता बाळसे धरलेले आहे. आज कोकणीला मराठीची बोली असे कोणीच म्हणत नाही. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ज्ञानपीठकार मोदर मावजो यांचा सत्कार करणे म्हणजे मराठीने आपल्या कोकणी भगिनीला मानाचा पाटच देणे आहे.
ओपिनिअन पोलने गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे गोव्याला स्वतंत्र राजकीय अस्तित्व प्राप्त झाले आहे. हे सगळे कोकणी भाषेचे ‘जैत’ आहे! अशा श्रीमंत, शालीन, शिरवंत, गोड, मधाळ, रसाळ कोकणी भाषेचे लिपीवैविध्य आपण का नाकारावे?
कॅथलिक समाजातले बहुसंख्य लोक कोकणी लिहिताना रोमन लिपीचा वापर करतात. कोकणी तियात्राचे हस्तलिखित रोमन लिपीत असते. कॅथलिकाचे धार्मिक व्यवहार ‘रोमी कोकणी’तून होतात. रोमी कोकणीत ‘गुलाब’, ‘वावराड्यांचो इश्ट’ यांसारखी मासिके प्रसिद्ध होतात व त्यांचा खप प्रचंड आहे.
रोमी लिपीला नाकारल्यामुळे कोकणीमागे नेहमी उभा राहिलेला कॅथलिक समाज आज कोकणी चळवळीपासून दुरावला आहे. अतिउत्साहाच्या भरात काही महाभागांची मजल त्रिस्तांव ब्रागांझा कुन्ह यांच्या ‘डीनॅशनलाइझेशन ऑफ गोअन्स’ या पुस्तिकेचा चुकीच्या संदर्भाने उल्लेख करून कॅथलिक समाजावर अराष्ट्रीयतेचा शिक्का मारण्यापर्यंत गेलेली आहे. फादर मोईजिन आताईद, जुझे लॉरेन्स, सेराफिन कोता अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी माणसे सोडली तर कोकणी चळवळीच्या मंडपात कॅथलिक माणूस दिसत नाही.
कॅथलिक समाज केवळ कोकणी भाषेमागेच उभा राहिलेला नाही तर गोव्याच्या हिताच्या प्रत्येक चळवळीमागे विशेषतः पर्यावरणीय चळवळीमागे या समाजाने आपली शक्ती उभी केली आहे. भारतीय लष्करात मोठ्या हुद्द्यावर पोहोचलेल्या कॅथलिकांच्या तुलनेत हिंदूची संख्या नगण्य आहे. गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीपासून कला, संस्कृती, साहित्य या क्षेत्रात फ्रांसिस्को लुईस गोम्स, मिनेझिस ब्रागांझा, टीबी कुन्हा, पीटर आल्वारिस, चार्लस् कुर्रैया, मारियो मिरांडा, रेमो फर्नांडिस, वेन्डेल रॉड्रिग्ज, मारिया कोता यासारखे पुरुषार्थी गोमंतकीय तळपताना आपण पाहतो. शिक्षण, आरोग्य व समाजसेवा या क्षेत्रात कॅथलिक चर्च मिशनरि वृत्तीने काम करीत आहेत. ही वस्तुस्थिती आपण डोळ्यांआड करणार आहोत काय?
बहुसंख्य समाजाला नाकारण्याची जी घोडचूक संस्कृत भाषेने केली त्या घोडचुकीची फळे भोगत गीर्वाणभारती संस्कृत भाषा आज भारताच्या लोकव्यवहारातून लुप्त होऊन केवळ ग्रंथ भाषा म्हणून कशीबशी जिवंत आहे. जे पाप संस्कृत भाषेने केले तेच महापाप कोकणी चळवळीचे नेते करत आहेत. कारण ‘आपण काय करतो’ याचे भान आणि अवधान त्यांना राहिले नाही.
कॅथलिक समाजाने स्वखुषीने देवनागरीचा स्वीकार केला असता, तर ते स्वागतार्ह ठरले असते. किंबहुना कॅथलिक देवनागरीकडे वळवण्यात कोकणी चळवळीला गेल्या ६० वर्षांत दारुण अपयश आले आहे हे मान्य करावेच लागेल.
साहित्य अकादमीने पुरस्कारासाठी रोमी कोकणीतून प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांचा विचार करावा ही मागणी अनेक वर्षे सातत्याने होत आहे. साहित्य अकादमीने देवनागरीव्यतिरिक्त रोमी, कन्नड व मल्याळम भाषेत होणाऱ्या पुस्तकांचा विचार पुरस्कारासाठी करावा ही विनंती अखिल भारतीय कोकणी परिषद व कोकणी भाषा मंडळाने करायला हवी.
व्यावहारिक कारणे सांगून साहित्य अकादमी ही मागणी नाकारू शकते, पण ही अधिकृत मागणी केल्याने कोकणी चळवळीविषयी कॅथलिक समाजाला आपुलकी वाटू लागेल. साहित्य अकादमीने नकार दिल्यास रोमी, कन्नड व मल्याळम लिपीतून प्रसिद्ध होणाऱ्या उत्तमोत्तम पुस्तकांचे देवनागरी लिप्यंतर करण्याची योजना जोमाने राबवावी लागेल. याच वेळी देवनागरी कोकणीतील दर्जेदार पुस्तकांचे कोकणीच्या अन्य लिपीत लिप्यंतर करणे आवश्यक आहे. साहित्य अकादमीने पुरस्कारासाठी रोमी, कन्नड व मल्याळम लिपीतील पुस्तकांचा विचार केल्यास कोकणीच्या देवनागरी लिपीचे कोणतेच नुकसान होणार नाही.
रोमी कोकणीला गोव्याच्या राजभाषेचा दर्जा द्यावा अशी कॅथलिक समाजाची प्रामाणिक इच्छा आहे. आपण त्यांच्या भावनेचा आदर केला पाहिजे व राजभाषा कायद्यात बदल करून कोकणीच्या रोमी लिपीला राजभाषेचा दर्जा दिला पाहिजे. राजभाषा झाल्यानंतर देवनागरी कोकणीचा फारसा फायदा झालेला नाही. रोमी लिपीला राजभाषा केल्याने ना देवनागरीचे नुकसान होईल, ना रोमीचा फायदा. पण राजभाषेचा प्रश्न ही कॅथलिक समाजाची भावनिक गरज आहे, हे आपण विसरता कामा नये.
नेताजी सुभाषचंद्र सर्व भारतीय भाषांनी रोमी लिपीचा स्वीकार करावा, अशा मताचे होते. म्हणून नेताजी सुभाषचंद्र यांना अराष्ट्रीय ठरवण्याचे धारिष्ट किंवा मूर्खपणा कोण करेल काय? तुर्कस्थानाचे नेते मुस्तफा केमाल आतातुर्क पाशाने व्यावहारिक सोयीसाठी तुर्की भाषेसाठी अरेबियन लिपी सोडून रोमी लिपीचा वापर सुरू केला.
पाश्चात्त्य जगाने भारतात जन्मलेली शून्याची, दशमान पद्धतीची, त्रिकोणमितीची संकल्पना स्वीकारली आहे. आपण रोमन आकड्यांना बहिष्कृत मानीत नाही. शेवटी विविध संस्कृती एकमेकांत संवादसेतू बांधून सांस्कृतिक देवाणघेवाण करत असतात. रोमी लिपी परकी मानण्याचे कारण नाही. दस्तुरखुद्द महात्मा गांधी इंग्रजीला विरोध करत असल्याचे पाहून चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी महात्माजींना सुनावले, महात्माजी, इंग्रजी हीदेखील देवी सरस्वतीचीच दुहिता आहे.
रोमी लिपीच्या प्रश्नाची कोंडी फोडून कॅथलिक समाजाला पुनश्च कोकणी चळवळीकडे वळवणे ही कोकणी चळवळीच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. गोमंतकीय समाजातील हिंदू व कॅथलिक समाजात दुरावा निर्माण होता कामा नये. कॅथलिकांना कोकणीच्या बाजूने वळवण्याची कोणतीच पर्यायी योजना आपल्याकडे नाही. त्यामुळे भाषिक कडवेपणा सोडून कॅथलिक समाजाच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे.
ज्येष्ठ संस्कृत तज्ज्ञ डॉ. जुझे परेरा यांनी एकदा मला सांगितले, इस्लाममध्ये मक्का मानसिकता व मदिना मानसिकता अशा दोन मानसिकता आहेत. मदिनेत महंमद पैगंबर पराभूत होता. त्यामुळे मदिनेतला त्याचा उपदेश जहाल हाता. मक्केत पैगंबर विजयी झाला होता, त्यामुळे मक्केतील पैगंबराची शिकवण उदारमतवादी व सहिष्णू आहे.
कोकणीच्या पाठीवर बसलेल्या ‘मदिना मानसिकतेचे’ भूत आपण फेकून दिले पाहिजे. अस्मिता व सहिष्णुता या परस्परपूरक संकल्पना असत नाहीत. जेव्हा अस्मितेचा अतिरेक होतो तेव्हा समाज असहिष्णुतेकडे झुकतो आणि सहिष्णुता उतू जायला लागली की अस्मितेला ओहोटी लागते. कोकणी ‘अस्मितायेचे’ झेंडे फडकवताना कोकणी भक्त कॅथलिक समाजाबाबत उत्तरोत्तर असहिष्णू होत चालले आहेत. एका संपूर्ण समाजाला आपण भाषिक तथा संस्कृतीला कृष्णविवरात ढकलत आहोत. लिपीपेक्षा भाषा श्रेष्ठ असते.
भाषेपेक्षा भाषेतील साहित्य श्रेष्ठ असते. साहित्यापेक्षा जीवन श्रेष्ठ असते. जिवंत समाजाला नाकारून निर्जीव भाषा जगत नसते. ख्यातनाम शास्त्रज्ञ मॅस प्लॅन्क म्हणतात ‘सायन्स प्रॉग्रेसिस विथ एव्हरी फ्युनरल’. विज्ञानाला विरोध करणारी पिढी अस्तंगत होते तेव्हाच विज्ञानाचे पाऊल पुढे पडते. ओपिनिअन पोलपूर्व पिढी कोकणीच्या व्यासपीठावरून अस्तंगत झाल्याशिवाय कोकणीचे पाऊल पुढे पडणार नाही.
खूप विचारांती मी अशा निष्कर्षाकडे पोचलो आहे की गोमंतकीय समाज एकसंध करण्यासाठी भाषिक तंटे संपायला हवेत. मराठी ही गोव्याची राजभाषा व्हावी, असे हिंदू समाजातील काही घटकांना वाटते. आजवर मराठीच्या द्वेषावर कोकणी पोसली गेली. आज कोकणीला मराठीकडे वैमनस्य करायचे कारण नाही. मराठी भाषेचे गोव्यावर व कोकणी समाजावर फार मोठे ऋण आहे. पारतंत्र्याच्या काळात मराठी भाषेने राष्ट्रीयतेची ज्योत गोव्यात पेटती ठेवली आहे. मराठी भाषेकडूनच आपण प्रागतिक संस्कारांचे बाळकडू प्यालेलो आहोत.
मराठी भाषेचे ऋण आपण चक्रवाढ व्याजाने फेडण्याची वेळ आलेली आहे. मराठीला गोव्याच्या राजभाषेचा दर्जा देण्याला होकार देणे ही मराठीविषयी कोकणी समाजाची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. मराठीला गोव्याच्या राजभाषेचा दर्जा दिला तर कोकणी भाषेचे फारसे नुकसान होणार नाही. गोव्याच्या राजकीय अस्तित्वालाही काडीमात्र धक्का लागणार नाही. आज परत ओपिनिअन पोल घेतला तर कोकणी, मराठी भक्तांसहित ९९ टक्के गोमंतकीय गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव नाकारतील हे वास्तव आहे.
मराठीविषयी आत्यंतिक प्रेम असणारे मराठीभक्त ‘महाराष्ट्रवादी’ व पर्यायाने गोमंतकविरोधी नाहीत. ऐतिहासिक कारणामुळे त्यांना मराठीविषयी आत्मीयता वाटत आलेली आहे. आज प्रस्तुत लेखकासहित अनेक कोकणी लेखक मराठीतून प्रभावीपणे लिहीत आहेत. कोकणी लेखकांनी कोकणी, मराठीत विपुल साहित्य निर्माण व्हावे असा आपला हव्यास असायला हवा.
ऐन महाराष्ट्रवादाच्या काळात सुप्रसिद्ध लेखक ग. त्र्यं. माडखोलकर यांनी मागणी केली होती की महाराष्ट्रवादाच्या राजकीय प्रश्नाला भाषिक जोड देऊ नका. कोकणी मराठीची बोली आहे असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. उलट महाराष्ट्रात कोकणीचा योग्य सन्मान करेल असे जाहीर आश्वासन कोकणी भक्तांना द्या. असे आश्वासन दिले तर महाराष्ट्रातील विलीनीकरणाच्या समर्थनाला बळकटी येईल. ज्या उदारतमतवादी विचारधारेचा मी पाईक आहे ती उदारमतवादी विचारधारा (उदाहरणार्थ गौतम बुद्धाचे ईश्वराच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञेयवादी विचार) कधीच कोणतेच ठाम विधान करत नाही.
संदिग्धतेत फार मोठी लवचिकता आणि सामर्थ्य असते. त्यामुळे रोमी लिपीतील कोकणीला व मराठी भाषेला गोव्याच्या राजभाषेचा दर्जा द्यावा, असे ठाम विधान करण्याचा मोह मी जाणीवपूर्वक टाळतो. मी हळुवारपणे, नम्रपणे, अत्यंत प्रामाणिकपणे सुचवू पाहतो की आपण कोकणी भक्तांनी रोमी कोकणीकडे व मराठीकडे पाहताना आपल्या कावीळग्रस्त चष्म्याचे बिंग का बदलू नये? कोकणीत ‘मात्शें’ हा गोड शब्द आहे.
आम्ही ‘मात्सो’ वेगळा विचार करूया, एवढेच मी म्हणू इच्छितो. महाभारतात गंधर्वाबरोबर कौरव पांडवांचे भांडण झाले तेव्हा धर्मराज म्हणाला, ‘परस्परविरोधे तु वयं पंचश्चते शतम्। परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकं शतम्।।’ दुसऱ्याचे संकट आले असताना कौरव शंभर आणि पांडव पाच असणार नाहीत. आम्ही सगळे मिळून १०५ असू. गोव्यावर स्थलांतरितांचे, जमीन रूपांतरांचे संकट आल्यावेळी हिंदू समाजातील बहुजनसमाज, सारस्वत, कॅथलिक समाज हे सगळे ‘पंचाधिकम् शतम्’ व्हावेत.
कोकणीच्या रोमी लिपीला व मराठीला गोव्याच्या राजभाषेचा दर्जा देऊ नये, असे कोकणी चळवळीत काही नेत्यांना व समर्थकांना वाटते. या मताकडे ठाम असलेल्यांच्या भावनेचा मी अनादर करणार नाही. हे नेते, हे समर्थक विशिष्ट काळाचे अपत्य आहेत. त्यांना चूक ठरवून त्यांचा मी किंचितही अपमान करणार नाही. मी प्रांजळपणे एक विचार मांडतो आहे. एक ‘नॅरेटिव्ह’ मांडतो आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी म्हटल्याप्रमाणे आपण विचारकलहाला का भ्यावे? कोकणी समर्थकांनी माझ्या विचारांचे जरूर खंडनमंडन करावे. पण ते गंभीरतेने करावे. फेसबूक (खरे म्हणजे डीफेसबूक) सारख्या शेलया माध्यमाचा उपयोग करून वैयक्तिक टिंगल करू नये. विचाराचा प्रतिवाद विचाराने व्हावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.