पणजी: ‘ज्ञानपीठ’ विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना चालू एप्रिल महिन्यात होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. कोकणी साहित्यिकाला अशा मराठी साहित्य संमेलनात आमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे 22 ते 24 एप्रिल यादरम्यान हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रविवारी या सोहळ्याची माहिती स्वागताध्यक्ष संजय बनसोड यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तर समारोप समारंभाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो, संमेलनाध्यक्ष भारत सासणे, मावळते अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्यासह शिवराज पाटील चाकुरकर, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, भाषामंत्री सुभाष देसाई, पं. हृदयनाथ मंगेशकर यांची उपस्थिती असेल.
कोकणी साहित्यिकाला मराठी साहित्य संमेलन, जो मराठी सारस्वतांमधील एक सर्वांत मोठा महामेळावा मानला जातो तेथे आमंत्रित करणे गोव्यातील भाषावादाच्या संदर्भात खूप महत्त्वाचे मानले जाते. या संमेलनामध्ये यापूर्वी गोव्याच्या राजभाषेसंदर्भात महत्त्वाची भूमिका घेण्यात आली होती.
मराठी साहित्य संमेलनाने यापूर्वी नेहमीच प्रागतिक भूमिका घेतल्यामुळे देशामध्येही एकूण साहित्यिकांमध्ये या संमेलनाला खूप महत्त्वाचे स्थान लाभले आहे. स्वतः दामोदर मावजो गोव्यातील एक प्रगतिशील लेखक मानले जातात आणि त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात घेतलेल्या भूमिकेमुळे महत्त्वाचे स्थान प्राप्त केलेले आहे. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार लाभल्यानंतर ते सध्या देशभरातील वेगवेगळ्या साहित्य उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. नुकताच त्यांनी केरळचा दौरा केला व तेथील प्रमुख साहित्यिकांचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला. मराठी संमेलनातील आमंत्रणामुळे कोकणी साहित्यिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गोव्यातून कोकणी साहित्यिकांचा एक मोठा गट या संमेलनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र बदलत आहे याचे हे द्योतक: उदय भेंब्रे
मराठी संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानपीठकार दामोदर मावजो यांना जर निमंत्रण दिलेले असेल तर ते योग्यच म्हणावे लागेल. मात्र यातून एक जाणवून येते की महाराष्ट्राची कोकणीकडे पाहण्याची मानसिकता बदलू लागली आहे हे निश्चित. येथे एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल. गोव्यातील लोकांनी विलीनीकरणाला विरोध केला मराठी भाषेला कधीच विरोध केला नाही. उलट विस्तारवादी भूमिका असलेल्या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आणि साहित्यिकांनी कोकणी भाषेला विरोध केला. आज मराठी साहित्यात असलेले पुणेरी वर्चस्व कमी झालेले आहे, असे कोकणी चळवळीचे ज्येष्ठ नेते उदय भेंब्रे यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.