Dabolim Airport: ‘दाबोळी विमानतळ’ परिघातील नागरी वस्‍ती सुरक्षित? फनेल झोन, पक्षी, बांधकामांचा मुद्दा चर्चेत

Dabolim Airport Hazards: दाबोळी विमानतळ परिघात दाटीवाटीने लोकवस्‍ती आहे. फनेल क्षेत्रातही काही बांधकामे आक्षेपाच्‍या घेऱ्यात आहेत. दाबोळीवरून दररोज सुमारे ६५हून अधिक विमानांची ये-जा होते.
Dabolim Airport Runway
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: दाबोळी विमानतळ परिघात दाटीवाटीने लोकवस्‍ती आहे. फनेल क्षेत्रातही काही बांधकामे आक्षेपाच्‍या घेऱ्यात आहेत. दाबोळीवरून दररोज सुमारे ६५हून अधिक विमानांची ये-जा होते. जर एखादी अहमदाबादसारखी दुर्घटना घडल्‍यास काय होऊ शकते, याचीही चर्चा कालपासून सुरू झाली आहे. ऑक्टोबर २००२मध्ये दोन नौदलाच्या विमानांची हवेत टक्कर होऊन बारा क्रू मेंबर्ससहित सोळाजण मरण पावल्याची स्मृती जागृत झाल्या.

१ ऑक्टोबर २००२ रोजी रशियन बनावटीची नौदलाची दोन इल्युशिन-३८ औपचारिक उड्डाण सराव करीत होती. त्यावेळी ती दोन्ही विमाने हवेत एकमेकांवर आदळल्याने दुर्घटनाग्रस्त झाली होती. त्यापैकी एक विमान राष्ट्रीय महामार्गावर तर दुसरे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर कोसळले.

त्यामुळे त्या विमानातील सर्व क्रू मेंबर्स मरण पावले. त्याशिवाय ज्या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरू होते. तेथील चार कामगार मरण पावले. तर सोळाजण जखमी झाले होते, तो आतापर्यंतचा गोव्यातील सर्वांत मोठा अपघात होता.

या अपघातानंतर नौदलाच्या विमानांचा सराव चर्चेत आला होता. जेथे हा अपघात घडला होता तेथे आता मोठी लोकवस्‍ती आहे. या अपघातानंतर नौदलाची काही लढाऊ विमानेही दुर्घटनाग्रस्त होण्याच्या घटना घडल्या होत्या. तथापि, प्रत्येक वेळी वैमानिकांच्या प्रसंगावधनामुळे विमान नागरी वस्तीपासून दूर नेण्यात आले होते.

रस्‍त्‍याकडेला कचरा, पक्ष्यांचा धोका

दाबोळी विमानतळाच्या आसपास टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यातील अन्नपदार्थ खाण्यासाठी भटकी कुत्री, पक्षी तेथे जमा होत असत. विमानाला पक्ष्यांची धडक बसणे तसेच धावपट्टीवर कुत्रे येणे यामुळे काहीवेळा अपघात झाले होते.

दाबोळी विमानतळाच्या उड्डाणमार्गावरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने उद्योग सामाजिक जबाबदारीअंतर्गत १५ कोटी रुपये मंजूर केले होते. चार एमआरएफ शेड चिखली, चिकोळणा-बोगमाळो, सांकवाळ व दाबोळी विमानतळ येथे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे हा प्रश्न काहीसा दूर झाला आहे.

चिखली पंचायतीला तर बहुउद्देशीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा पुरस्कार मिळाला आहे. दाबोळी विमानतळालगतचा तसेच आसपासचा भाग कचरामुक्त राहावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

नौदलाची ‘ती’ उंच इमारत!

१.दाबोळी विमानतळापासून वीस किलोमीटर परिघामध्ये येणाऱ्या बांधकामांसाठी नौदलाचा आगाऊ ना हरकत दाखला घेतला पाहिजे, अशी भूमिका नौदलाने घेतली होती. मात्र, त्यानंतर आपल्या भूमिकेमध्ये बदल करताना फक्त चार किलोमीटर परिघामध्ये येणाऱ्या नवीन बांधकामासाठी दाखला घेतला पाहिजे, असा नियम केला होता. त्यामुळे या नियमाला बऱ्याच लोकांनी व लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता. मात्र, त्यातून काहीच साध्य झाले नाही.

२.या नियमामुळे बांधकामांवर मोठा परिणाम झाल्याचा दावा अद्याप करण्यात येत आहे. मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष क्लाफसियो डायस यांनी तर या नियमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, कोणीच सर्वोच्च न्यायालयात गेले नाही. सर्वसामान्यांना मात्र ठरावीक उंचीचे बांधकाम करण्याचा नियम केला गेला. त्यानंतर नौदलाने आपल्या वसाहतीमध्ये अनेक बहुमजली इमारती उभारल्या त्याचे काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत होते व आहेत.

‘फनेल झोन’मध्ये नियमबाह्य कामे?

फनेल झोनमध्ये नियमबाह्य कामे करून बांधण्यात आलेल्या काही घरांचे बांधकाम मुरगाव विकास व नियोजन प्राधिकरणाने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मोडले होते. इतर काहीजणांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने ती वाचली होती.

मात्र, ज्यांच्या घरांचे बांधकाम मोडण्यात आले होते. त्यांनी आमच्याकडे सर्व कागदपत्रे व परवाने असताना सुमारे पंधरा-वीस वर्षांनी अशी कृती करणे कितपत योग्य आहे, आमच्या घराच्या उंचीपेक्षा वीज खांब्याची उंची अधिक असते, तो का हटविला जात नाही, असा सवाल उपस्थित केला होता.

फनेल झोनमध्ये बांधकामे येऊ नयेत, निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीची बांधकामे होऊ नयेत, यासाठी नौदल दक्षता घेत आहे. मात्र, काहीजण निरनिराळ्या युक्त्या वापरून बांधकामे करीत आहेत. काहीजणांनी एकमजली बांधकाम होईल, इतका डोंगर पोखरून तेथे तळमजला बांधून त्यावर एक मजला चढविला आहे. निर्धारित उंचीमध्ये ती बांधकामे येत असल्याचे समजते.

येथे चिखली-बोगमाळो ते एमईएस चौकदरम्यान उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलाच्या खांबांची उंची अधिक असल्याने विमान वैमानिकांना अडचणीचे व अपघाताला आमंत्रण देण्याचे ठरू शकते यासाठी काहीजणांनी न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. त्यानंतर संबंधितांनी तेथील काही खांबांची उंची कमी करण्याचे मान्य केले.

मात्र, हे बांधकाम करण्यापूर्वी संबंधितांनी भारतीय नौदलाकडून परवाना घेतला नसल्याचे उघडकीस आले होते. एका सरकारी कामासाठी नियमांकडे कसा कानाडोळा करण्यात येतो याचे हे चांगले उदाहरण आहे. जर तेथे ‘एनजीओ’नी हरकत घेतली नसती आणि तेथे एखादी विमान दुर्घटना झाली असती तर कोण जबाबदार ठरले असते, हा प्रश्न निर्माण झाला असता.

सध्या बांधकामांची संख्या वाढत आहे. मात्र, संबंधितांनी आपला विचार न करता ‘फनेल झोन’चा विचार केला पाहिजे. ‘फनेल झोन’च्या लगत बांधकाम केले तर काय झाले, ही विचारधारणा दूर करण्याची गरज आहे.

Dabolim Airport Runway
Ahmedabad Flight: अपघात झालेले विमान उतरणार होते 'मोपा'वर! लंडनहून येणार होते गोव्याला; अहमदाबाद दुर्घटनेनंतर वेळापत्रकात बदल

दाबोळी भागात झालेले काही अपघात

१.३ जानेवारी २०१८ ला भारतीय नौदलाच्या हंस विमान तळाच्या धावपट्टीवरून उड्डाण करताना एका मिग २९-केचे चाक घसरून धावपट्टीपासून दूर गेले होते. यावेळी शिकाऊ पायलटाने प्रसंगावधान राखत इजेक्ट केल्याने तो सुखरूप राहिला. मात्र, विमानाच्या इंजिनाने पेट घेतल्याने नौदलाच्या अग्निशमनने ती आटोक्‍यात आणली होती.

२. या घटनेनंतर ८ जून २०१९ ला सरावासाठी निघालेल्या मिग २९-के विमानाची अतिरिक्त इंधन टाकी धावपट्टीवरून कोसळून मोठा भडका उडाला होता. त्यामुळे दाबोळी विमानतळावरील नागरी विमानसेवा तीन तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. या अपघातात विमान व वैमानिक सुखरूप राहिले होते.

३. १६ नोव्हेंबर २०१९ ला भारतीय नौदलाच्या दाबोळीच्या हंस विमानतळावरून नियमित सरावासाठी उड्डाण केलेल्या मिग२९-के ट्रेनर विमानाला पक्ष्यांचा थवा धडकून इंजिनाला आग लागल्याने विमान वेर्णा पठारावर कोसळले होते. या विमानातील कॅप्टन मृगांक शैखंड व लेप्ट कमांडर दीपक यादव यांनी प्रसंगावधान राखून विमान लोकवस्तीपासून दूर नेले होते. त्यांनी ‘इजेक्ट’ केल्यावर विमान तसेच पुढे जाऊन वेर्णाच्या माळरानावर कोसळले. प्रसंगावधान राखून विमान नागरी वस्तीपासून दूर नेल्याबद्दल कॅप्टन शैखंड यांना शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

Dabolim Airport Runway
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात कोकणची लेक हरपली; क्रू मेंबर अपर्णा महाडिकचा मृत्यू , खासदाराशी होतं जवळचं नातं

४. २७ नोब्हेंबर २०२०ला भारतीय नौदलाचे मिग-२९ के हे दोन आसनी ट्रेनर विमान अरबी समुद्रामध्ये दुर्घटनाग्रस्त झाले होते. या विमानातील दोनपैकी एका वैमानिकाला सुखरूपपणे वाचविले तर दुसरा वैमानिक कमांडर निशांत सिंग बेपत्ता होता. तब्बल अकरा दिवसांनी त्यांचा मृतदेह हाती लागला होता.

५. २३ फेब्रुवारी २०२०२ ला भारतीय नौदलाच्या हंस तळावरून नियमित सरावासाठी उड्डाण केलेले एकआसनी दोन मशिने असलेले मिग २९ के विमान अरबी समुद्रात अपघातग्रस्त झाले होते. या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिक ‘इजेक्ट’ करून विमानातून सुखरूपणे बाहेर पडला होता.

६.ऑक्टोबर २०२२ सराव उड्डाणानंतर हंस नाविक तळाकडे परतत असलेल्या एका मिग २९ के या लढाऊ विमानाला अपघात झाला होता. वैमानिकाला सुखरूपपणे वाचविण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com