खांडोळा
विविध सण, उत्सव, धार्मिक विधी यांच्या माध्यमातून सात्त्विक समाज निर्मिती व्हावी, मनुष्याला आवश्यक असणारे शाश्वत समाधान प्राप्त व्हावे यानिमित्ताने ऋषिमुनींनी विविध संस्कार व धार्मिक विधींची मांडणी हिंदूधर्मात केलेली आहे. यापैकी "यज्ञोपवीत धारण विधी" वैदिक काळापासून मनुष्याच्या कल्याणासाठी ऋषिमुनींनी सांगितलेला आहे, असे मत ब्रह्मेशानंदाचार्य यांनी तपोभूमीवर व्यक्त केले.
३ रोजी श्रवण नक्षत्रावर हिंदूंच्या घरोघरी जानव्याचा संस्कार संपन्न झाला. याप्रसंगी तपोभूमी गुरुपीठावरुन पूज्य स्वामीजी ऑनलाइन माध्यमातून यज्ञोपवीत विधीसंदर्भात मार्गदर्शन केले.
ते पुढे म्हणाले, आज सर्वांनी घरोघरी जानवे धारण केले आणि आज हिंदू घर जानव्याने देवाशी जोडले आहे. हिंदू धर्मातील सण उत्सव हे पर्यावरणाशी निगडित असल्याने यातून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिलेला आहे. सर्व हिंदू धर्मीयांनी हिंदू म्हणून एकत्रित यावे. प्रत्येक हिंदू बांधवाने शिखा (शेंडी) ठेवली पाहिजे. धर्म, देश, पुरुषत्व, सात्त्विक कुळ, सज्जन समाज, पर्यावरण संरक्षण यांची रक्षा करण्याची जाणीव करून देणारे सूत्र म्हणजे यज्ञोपवीत. ही एक जबाबदारी आहे जी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. हा उत्सव जबाबदारीची भावना देतो. म्हणूनच आपली बहीण सुद्धा यादिवशी आपल्या भावाला रक्षाबंधन करीत असते. हिंदू घर जानव्याच्या धाग्याने बांधले गेले आहे.
श्रावणी विधीसाठी तपोभूमीवर दरवर्षी हजारोंच्या संख्येने हिंदूधर्मिय एकत्रित येत होते. परंतु यावर्षी कोरोना-१९ महामारी सर्वत्र पसरलेली असताना हा विधी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी घरोघरी यज्ञोपवीत धारण विधी हिंदू धर्मियांनी केला. भारत तसेच इटली, अमेरिका, दुबई, जर्मनी, ओमान अशा देश विदेशातून अनेक हिंदूधर्मिय सोशल मिडियाच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
Editing _ Sanjay Ghugretkar
|