Goa Consumer Court : एटीएम घोटाळा; जबाबदारी झटकणाऱ्या बँकेला दणका
‘‘ग्राहकाने आम्हाला त्याचे जुने एटीएमकार्ड ब्लॉक करण्याची कोणतीही सूचना केली नव्हती. त्यामुळे ते एटीएमकार्ड तसेच पिन नंबर वापरून काढल्या गेलेल्या पैशांची परतफेड करण्याची कुठलीही जबाबदारी बँकेवर नाही’’ अशी भूमिका घेणाऱ्या कॅनरा बँकेच्या नावेली शाखेला गोवा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मोठा दणका दिला आहे.
बनावटगिरी करून काढले गेलेले ग्राहकाचे १ लाख २० हजार रुपये ६ टक्के व्याजाने फेडण्याबरोबरच त्याला झालेल्या मन:स्तापाबद्दल ५० हजारांची अतिरिक्त नुकसान भरपाई तसेच दाव्याच्या खर्चापोटी आणखी १५ हजार रुपये देण्याचा आदेश मंचने दिला.
गोवा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या प्रभारी अध्यक्ष वर्षा बाळे यांनी वरील आदेश दिला. नागेश कोलवाळकर आणि रचना गोन्साल्विस हे या आयोगाचे अन्य दोन सदस्य आहेत.
आके-बायश येथील बसवराज होर्की या ग्राहकाने आयोगासमोर आपला दावा सादर केला होता. त्यापूर्वी त्याने दक्षिण गोवा जिल्हा आयोगाकडे आपला दावा सादर केला असता त्याला ५५ हजार रुपयांची परतफेड आणि १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला होता.
या आदेशाला होर्की यांनी गोवा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे आव्हान दिले होते.
घटनेची अशी आहे पार्श्वभूमी
ग्राहक होर्की हे बर्मुडा (युके) येथे कामाला असतात. नावेलीच्या कॅनरा बँकेत त्यांचे खाते होते. २२ नोव्हेंबर २०१६ या दिवशी ते कोल्हापूर येथे गेले असता त्यांचे पाकीट हरवले. त्या पाकिटात या एटीएमकार्डचाही समावेश होता.
ग्राहकाने केलेल्या दाव्याप्रमाणे, त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून देत आपले कार्ड ब्लॉक करण्याची विनंती केली होती.
त्यानंतर २७ नोव्हेंबरला गोव्यात आल्यावर नावेली शाखेत जाऊन आपले कार्ड हरवल्याची रीतसर तक्रार नोंदवून त्यांनी नवीन एटीएमकार्ड करून घेतले होते. त्यानंतर ते युकेमध्ये कामाला गेले.
१८ मार्च २०१७ रोजी त्यांनी आपले बँक खाते तपासून पाहिले असता त्यात फक्त १०१८ रुपये शिल्लक असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला.
बँकेत याबाबत चौकशी केली असता त्यांच्या हरवलेल्या त्या एटीएमकार्डचा वापर करून कुणीतरी १.२० लाख रुपयांची रक्कम काढल्याचे स्पष्ट झाले.
कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करूनही बँकेने ते ब्लॉक न केल्याने मला हे नुकसान सोसावे लागले असा दावा करून ग्राहक होर्की यांनी बँकेने आपल्याला ही रक्कम फेडावी अशी मागणी केली.
मात्र कार्डचा पिन क्रमांक वापरून हे पैसे काढले गेले आहेत आणि हा क्रमांक फक्त खातेदारालाच माहीत असतो, त्यामुळे ही तक्रारच खोटी असा दावा करून बँकेने ही मागणी फेटाळली.
त्यानंतर ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर दावा पेश केला. त्यावर खातेदाराने आम्हाला कार्ड ब्लॉक करण्याची कोणतीही सूचना केली नव्हती असा पवित्रा बँकेने घेतला.
परंतु ज्यावेळी कार्ड हरवले असे सूचित करून नवीन एटीएमकार्ड दिले जाते, त्यावेळी जुने कार्ड ब्लॉक करण्याची जबाबदारी बँकेवर असते.
बँकेच्या याच हलगर्जीपणामुळे खातेदाराच्या खात्यातून पैसे गेले असे नमूद करून गेलेले सर्व पैसे बँकेने व्याजासकट परत करावेत असा आदेश आयोगाने दिला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.